अभ्यासासाठीचा रॉंग नंबर

मी दहावीत होतो तेव्हाची गोष्ट. त्यावेळी पहाटे लवकर उठून अभ्यास करायचो मी. दहावीचं वर्ष असल्यानं हे रोजच चालायचं. पहाटेच्या शांततेत अभ्यासात इतर काही व्यत्यय येत नसे. असाच एक दिवस अभ्यास करत बसलो होतो. साधारण चारच्या सुमारास अचानक कोणीतरी माईकवर बोलत असल्याचं जाणवलं. 
 
“मंडळी, चार वाजले, उठा.”
 
एवढं होऊन शांतता. थोड्या वेळात पुन्हा तोच आवाज,
 
“मंडळी, चला लवकर उठा. बरोबर ५ वाजता आपण काकडा सुरु करणार आहोत.”
 
थोडा वेळ गेला आणि पुन्हा तेच. हा माणूस पहाटे उठून माईक हातात धरून त्याच्या सहकाऱ्यांना उठवत होता. माझ्या लक्षात आलं की कुठल्यातरी मंदिरात किंवा आश्रमात हा काकड आरतीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त भजन किर्तन वगैरे कार्यक्रम या लोकांनी आयोजित केले होते आणि त्याच घोळक्यातल्या एका स्थानिक पुढाऱ्याला माईक हातात आल्यावर चेव चढला होता. इतका की वेळेचं भान न ठेवता तो खुशाल इतक्या पहाटे माईकवर बोलत होता. 
 
एव्हाना माझं अभ्यासातलं लक्ष उडालं होतं. दादांना सांगितलं तर ते म्हणाले होईल बंद थोड्या वेळात. मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली तोवर ह्याच्या अजून दोन तीन आरोळ्या देऊन झाल्या होत्या. मग ५ वाजता आरती सुरु झाली. ती सुद्धा माईकवर. मी आपलं दुर्लक्ष करत अभ्यास सुरु ठेवला. 
 
दुसऱ्या दिवशी परत पहिले पाढे पंचावन्न. भल्या पहाटे कालचाच माणूस पुन्हा माईक हातात घेऊन लोकांना झोपेतून उठवू लागला. हे असं रोजच चालू राहिलं तर आपल्या अभ्यासाची वाट लागेल हे माझ्या एव्हाना ध्यानात आलं. परत दादांकडे मोर्चा वळवला. त्यांनी पुन्हा मला तेच सांगितलं. 
 
तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. मग मात्र मी दादांना म्हटलं, 
 
“या माणसाला काहीतरी करा.”
 
दादांनीसुद्धा विचार केला असेल, 
 
“हे रोजच चालू राहिलं तर मोठा त्रास आहेच.”
 
त्यावेळेस मोबाईल नव्हतेच. दादा उठून फोनकडे गेले. टेलिफोन डिरेक्टरी उघडून त्या मंदिराचा/ आश्रमाचा नंबर शोधला. फोन लावला. पलिकडून कोणीतरी फोन उचलला. 
 
“हॅलो, कोण बोलतंय?”
 
“मी जुन्नर पोलिस स्टेशनमधून बोलतोय. कोण बुवा आहे तिथं ओरडतोय? त्याला गप्प बसव. लोकांच्या तक्रारी आल्यात. च्यायला आमच्याबी झोपा उडवल्यात तुम्ही. ते स्पीकर बंद झालं पाहिजे लगेच.” दादाच हिय्या करून फोनवर हे बोलले आणि फोन ठेवून दिला. 
 
फोन ठेवल्यावर फारतर ३ मिनिटं गेली असतील आणि स्पीकर बंद झाला. आणि बंद झाला तो कायमचाच. माझ्या अभ्यासात येणारा व्यत्यय दादांनी असा सोडवला. 

 

सांगायचं मुद्दा काय तर तुमच्या भक्तीला आमचा विरोध नाही. पण भावभक्तीच्या नावाखाली कल्ला करू नका. मग ते मंदिर असो की अजून काही, शांततेत देवही सापडतो आणि आमच्यासारख्या पोरांचा अभ्यासही होतो. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.