गेले काही दिवस बीसीसीआयच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्याची अखेर काल रॉजर बिन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून झाली. या सगळ्या गोंधळात बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. क्रिकेटच्या आणि विशेषतः गांगुलीच्या बऱ्याच चाहत्यांना त्याचं काय चुकलं? त्याला पुन्हा बीसीसीआयचा अध्यक्ष का बनवलं नाही? असे प्रश्न पडले. याला काही प्रमाणात बीसीसीआय क्रिकेतपटूंनी चालवली पाहिजे, राजकारणी लोक नकोत असे मतप्रवाह कारणीभूत आहेत. एक खेळाडू आणि गांगुलीसारखा चांगला कर्णधार चांगला प्रशासक होऊ शकेलच असे नाही असा विचार बरेचजण करताना दिसत नाहीत. गांगुलीबाबत लोकांना आशा होती. त्यानेही बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर बऱ्याच मोठ्या गप्पा मारल्या होत्या. पण त्याचं चुकलही तेवढंच. त्याच्या अशा काय चूका झाल्या ?
किट स्पॉन्सरचा घोळ
याअगोदर भारतीय क्रिकेट संघाचा किट स्पॉन्सर नाईके ही कंपनी असे. आता एमपीएल ही कंपनी संघाची किट स्पॉन्सर आहे. एमपीएलला ऑनबोर्ड आणताना बीसीसीआयने कुठलेही टेंडर, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अशी प्रक्रिया राबवल्याचे मला तरी आठवत नाही. मुळात एमपीएल ही एक इंटरनेट गेमिंग, फॅन्टसी गेमिंग कंपनी आहे. पण बीसीसीआयचे निकष पूर्ण करायला त्यांनी मर्चंडाईज बिझनेस सुरू केला. तसे दाखवले आणि आपण बीसीसीआयचा निकष पूर्ण करतोय याची काळजी घेतली आणि किट स्पॉन्सर बनले.
गांगुली आणि माय11सर्कल
गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदी असताना माय11सर्कलची जाहिरात करत होता. ही सुद्धा फॅन्टसी गेमिंग कंपनी आहे. ते त्यांच्या जाहिरातीत असेही सांगतात की या गेममध्ये आर्थिक धोका आहे आणि याचे व्यसन लागू शकते. तरीही गांगुलीने ती जाहिरात केली. इतरही क्रिकेटपटू वेगवेगळ्या फॅन्टसी गेमिंग कंपनीची जाहिरात करताना दिसतात. अगदी सगळ्यांचा लाडका धोनीसुद्धा. पण अध्यक्षच जाहिरात करतोय तर खेळाडूंना कोण बोलणार?
याशिवाय एमपीएल आणि माय11सर्कल या एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या. त्यामुळे गांगुलीने माय11सर्कलची जाहिरात करणे एमपीएलला साहजिकच आवडणार नव्हते. विरोधात गेले.
गांगुली आणि विराट कोहली
विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत झालेला गोंधळ आजवर कुठल्याच भारतीय कर्णधाराबाबत झाला नसेल. गांगुलीने तेव्हा काही स्टेटमेंट असे केले की विराटला अखेर समोर येऊन असे घडलेच नाही हे स्पष्ट करावे लागले. एकुणात या प्रकरणात बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटची बरीच छी थू झाली.
गांगुली आणि पत्रकार
बीसीसीआयच्या आतल्या गोटातील अनेक बातम्या इतर मीडियाला समजण्याआधीच काही ठराविक पत्रकारांना कळत. यातही बंगालमधील एक पत्रकार आघाडीवर असे. तो आधीच ट्विट करून या बातम्या लिक करे. तो पत्रकार गांगुलीचा खास आहे हे सर्वश्रुत आहे. हे गंभीर आणि तितकेच चुकीचे आहे.
बंगालचा खेळाडू वृद्धीमान साहाने तर पब्लिक स्टेटमेंट देत गांगुलीवर आगपाखड केली. मी बीसीसीआय अध्यक्ष असेपर्यंत तुला भारतीय कसोटी संघात स्थान असेल असे आपल्याला गांगुलीने सांगितले होते असे तो म्हणाला. यात पुढे साहाने त्या प्रसिद्ध पत्रकाराला इंटरव्ह्यू नाकारला म्हणून मोठा गदारोळ झाला. तू कसा भारताकडून खेळतो बघतोच अशी धमकी देणारा मेसेजच साहाने व्हायरल केला. जरी साहाने पत्रकारचे नाव घेतले नसले तरी तो स्वतःच नंतर पुढे आला. त्यामुळे हा पत्रकार कोण आहे यावरही शिक्कामोर्तब झाले. एखादा पत्रकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला अशी धमकी कशी देऊ शकतो? हा प्रश्न अनुत्तरित राहिला. नंतर बीसीसीआयने त्या पत्रकारावर काही काळासाठी बंदी घातली.
हा सगळा कशाचा परिणाम म्हणायचा? तर बीसीसीआयमध्ये आणि मीडियामध्ये नसलेल्या संवादाचा. हे कोहली प्रकरण, साहा प्रकरण बीसीसीआयला खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आले असते. एक प्रशासक म्हणून, अध्यक्ष म्हणून दादा यात अयशस्वी झाला.
प्रशासक गांगुली
गांगुली स्वतः एक क्रिकेटपटू असल्याने तो भारतीय क्रिकेटपटूसाठी काहीतरी भरीव कामगिरी करेल असा सगळ्यांनाच विश्वास होता. किमान तशी अपेक्षा होती. गांगुलीनेसुद्धा अध्यक्ष झाल्यावर फर्स्ट क्लास क्रिकेटपटूना बीसीसीआय करारबद्ध करणार अशी घोषणा केली होती. ती साध्यातरी एक वलग्नाच ठरली आहे.
महिलांची आयपीएल
पुरुषांची आयपीएल चौदा वर्षे होत असून महिलांची आयपीएल मात्र अजूनही प्रायोगिक स्वरूपातच आहे. दुबईमध्ये जे चॅलेंज झाले त्यासाठी आधी 4 संघ असणार असे सांगून अखेरच्या क्षणी तीनच संघ खेळवले. ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या खेळाडू बिग बॅश लीगमध्ये खेळायला जातात. मग बीसीसीआय सारख्या श्रीमंत बोर्डाला महिलांची आयपीएल इतकी वर्षे का घेता येऊ नये?
या सगळ्यात बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गांगुली अपयशीच ठरला असे म्हणावे लागेल. हे अपयश त्याचे एकट्याचे नसले तरी अध्यक्ष नात्याने त्याची जबाबदारी ठरते. एवढे होऊनही गांगुलीला आणखी एक टर्म अध्यक्षपद हवे होते. बीसीसीआयचा मावळता अध्यक्ष नव्या अध्यक्षाचे नाव सुचवतो असा शिरस्ता आहे. गांगुलीने मात्र बिन्नी याचे नाव सुचवलेच नाही. त्याच्या या वागण्याकडेही इतर राज्य संघटनांनी चांगल्या दृष्टीने पाहिले नाही. हे सगळे घटक त्याला आणखी एक टर्म अध्यक्ष म्हणून देण्याच्या विरोधात गेले. याशिवाय यामागे अमित शहा आणि बीजेपी फॅक्टर आहे असाही एक मतप्रवाह आहे. खरेखोटे बाहेर येईलच असे नाही. या निमित्ताने अजूनही गांगुलीच्या प्रेमात असलेल्या त्याच्या चाहत्यांना एक रिऍलिटी चेक देण्याचा प्रयत्न केला इतकेच.