शिट्टीपुराण..

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये ‘कलोपासक’ म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असत. अशाच एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार राम कदम हे जुन्नरमध्ये आले होते.

राम कदम हे त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या हमखास पडत. कार्यक्रम रंगात येऊ लागला तसं लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. मी नुकताच शिट्टी वाजवायला शिकलो होतो. मग इतरांकडे बघून मलाही हुक्की आली आणि मीही शिट्टी वाजवू लागलो. नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला आपण जोरात शिट्टी वाजवू शकतो याची मजा वाटली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. पहिला तास पार पडला. दुसरा तास सुरू झाला.

“गुंड उभा रहा.” वर्गात येताच बाईंनी माझ्याकडे बघत आज्ञा केली. (माझ्या संपूर्ण शालेय जीवनात फक्त एक किंवा दोन शिक्षकांनी मला माझ्या नावाने हाक मारली असेल. बाकी सगळे गुंडच म्हणत. असो)

मी गोंधळतच उभा राहिलो. आल्या आल्या बाईंनी आपल्याला का उभं केलंय हे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं.

“तुझ्यासारख्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती.”

“मी काय केलं बाई?” अजूनही काही न कळलेला मी विचारता झालो.

“अरे तूच मला विचारतोस? नीट विचार करून बघ.” इति बाई..

मी पुन्हा आपला ढिम्म उभा.

“कालच्या कार्यक्रमात तू शिट्ट्या वाजवत होतास. सबंध कार्यकम संपेपर्यंत तुझा थिल्लरपणा सुरू होता.”

मग माझी ट्यूब पेटली. कलोपासकच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग होत असे.कार्यक्रम संपल्यानंतर केबल ऑपरेटर ती कॅसेट केबलवर लावत असे. शूटिंग करणाऱ्या माणसाने नेमका मी शिट्टी वाजवत असताना कॅमेरा माझ्यावर फोकस केला होता. त्यामुळे माझी शिट्टी वाजवण्याची कला सबंध जुन्नर शहराला दिसली होती. आणि नेमकं तेच माझ्यावर शेकलं होतं. याच बाईंनी तास संपल्यानंतर मला शिक्षक खोलीमध्ये बोलवून सगळ्या शिक्षकांसमोर माझी खरडपट्टी काढली.

तसं पहायला गेलं तर मी मजा म्हणून शिट्टी वाजवीत होतो. त्याचा असा काही परीणाम होईल हे माझ्या गावीही नव्हते. आपल्याला शिट्टी वाजवता आली पाहिजे असा साधा विचार माझ्या डोक्यात होता. आणि नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शिकलेले कसब आजमावयाची संधी मिळाली होती. शिक्षक खोलीतून बाहेर पडताना एका शिक्षकांनी, “एवढंच ना!” असं म्हणून हसल्याचंही मला आठवतंय.

बाकी शिट्टी मात्र वाजवता आलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. ती एक कला आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र सोनू माळवे एका बोटाने सुद्धा शिट्टी वाजवीत असे. काही लोक तर बोटांचा वापर न करतादेखील जोरात शिट्टी वाजवतात. आजकालच्या पोरांना शिट्टी वाजव म्हटलं तर खुशाल ‘मला नाही येत’ म्हणून मोकळे होतात. या शिट्टी वाजविण्यामुळे अजून मी अजून एका कचाट्यात सापडलो होतो. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.