विन्या

“लोड नको घेऊ रे तू. होतंय सगळं.”
एखाद्या जटिल प्रश्नावर आम्ही सगळे बसून डोकेफोड करत असताना विन्या सहज असं बोलून जायचा. आयुष्याकडे सहजपणे बघा, पुढे चालत रहा, मार्ग दिसत राहील असा साधासुधा फंडा होता त्याचा.
३१ डिसेंबर २००७  ला विन्या गेला. आजही अगदी ठळकपणे आठवतोय तो दिवस. माझा डिझाईनचा पेपर देऊन मी बाहेर आलो. फोन चालु केला आणि लगेचच मेसेज आला. आदित्यचा मेसेज होता तो. लगेच फोन करायला सांगितलं होतं मला. त्याने फोनवर मला सांगितलं,
“विन्या मेजर सिरीयस आहे. तू हॉस्पिटलला ये.”
क्षणभर सुन्न झालो मी. पुसटशी कल्पना सुद्धा आली मला.पण अजून वेळ वाया न घालवता लगेच गाडीला किक मारून निघालो. विचारांच्या तंद्रीत हॉस्पिटलला कसा पोहोचलो माझे मलाच कळले नाही. तिथे गेल्यावर इतका वेळ इतरांना धीर देत असलेल्या आदित्यने मला मिठी मारली. त्याला स्वतःला सावरायला सांगून मी आतमध्ये गेलो. तिथले दृश्य अतिशय विदारक होतं. काका काकूंनी मला पाहुन पुन्हा एकदा आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. गणेश त्यांना सावरत होता. बाजूला विन्या शांतपणे पहुडला होता. नेहमीच हसतमुख असणारा त्याचा चेहरा आजही अगदी तसाच हसतमुख होता.
विन्या आणि मी जवळ आलो ते साधारण दहावीच्या सुमारास. दर शनिवारी आम्ही शनी मंदिरात जात असू. देवदेव करणारे नव्हतो आम्ही. पण त्या निमित्ताने शनीला येणाऱ्या मुलीही दिसत आणि आम्ही सगळेजण एकमेकांना भेटत असू. मंदिरात जाऊन आलं की विन्याच्या घराबाहेर आमचा कट्टा ठरलेला असे. सगळे मिळून सात आठ जण असू आम्ही. दर १५- २० मिनटाला विन्याची आई आम्हाला म्हणत असे, “अरे आतमध्ये येउन बसा.” आणि मग विन्याचे वडील त्यांना म्हणत, “आतमध्ये आले तर शनिमंदिरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुली कशा दिसतील त्यांना.” साधारण एक तासभर तिथे थांबून आम्ही मग फिरायला जात असू. हा दर शनिवारचा कार्यक्रम पुढची काही वर्षे न चुकता चालू राहिला.
विन्या सतत सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असायचा. अगदी दहावीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत प्रत्येक परीक्षेच्या आधी त्याचा फोन यायचा.
“यार बेकार टेन्शन आलयं. काय करावं काही सुचत नाहीये.” आणि मग पुढची १०-१५ मिनिटे मी त्याला कसा त्याचा अभ्यास झालेला आहे हे पटवून देत असे. मग मात्र स्वारी खुश असे. पुढे कॉलेजला गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी असंच त्याला परीक्षेचं टेन्शन आलं.
“मी काही आता परीक्षा देत नाही. माझा काही अभ्यास झाला नाहीये. मी यावर्षी ड्रॉप घेतो.”
पोरगं असं करायला लागल्यावर त्याच्या वडिलांनी आम्हाला बोलावून घेतलं. परत एकदा आधीसारखी आम्ही विन्याची समजूत घातली आणि त्याला परीक्षेला बसवला. मार्कही चांगले पडले त्याला त्या वर्षी.
गणपतीच्या दिवसांत त्याच्या उत्साहाला काही सीमा नसे. घरचा गणपती आणि पेठेचा गणपती या दोन्हीमध्ये अगदी खंदा कार्यकर्ता असे तो. शेवटच्या दिवशीच्या मिरवणुकीमध्ये नाचावं ते त्यानेच. कुठला शर्ट घालायचा इथपासून त्याची तयारी असे. गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ झाली की आम्हाला सगळ्यांना विन्याच्या आईने बनवलेल्या बटाटा वड्यांचे वेध लागत. त्याच्या घरी जाऊन काकूंच्या हातचे गरम गरम वडे खाऊन आम्हे पुन्हा नाचायला जात असू.
विन्याची उंची हा कायम आमच्या चर्चेचा विषय असे. त्याच्या घरातले सगळे जण ६ फुटापेक्षा जास्त उंचीवाले होते. विन्या एकटाच ठेंगू होता. इतका की दहावीपर्यंत तो पहिल्या बाकावर बसत असे. अकरावीत गेल्यावर अचानक त्याची उंची वाढली आणि तोही सहा फुटांच्या वर गेला. त्याची उंची अशी अचानक कशी वाढली यावर आम्ही चर्चा करत असू. रोज कॉलेजला जाण्याआधी विन्या माझ्या घरी येत असे. आमच्या घरात त्याची खुर्चीसुद्धा ठरलेली असे. ती खुर्ची सोडून इतर कुठे तो कधीच बसला नाही.
बारावीनंतर पुण्यात यायला मिळालं नाही म्हणून तो काहीसा निराश झाला होता. पण काही दिवसातच त्याने त्याच्या कॉलेजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा मनमिळाउ स्वभाव त्याला तिथे कामाला आला. पण पुण्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसे. जरा कुठे सुट्टी मिळाली की विन्या गाडी पकडून पुण्याला येत असे. २-३ दिवस आमच्याबरोबर पुण्यात मजा करून जात असे.
आपल्या दहावीच्या बॅचचं गेटटुगेदर करायचं असं विन्या कायम म्हणायचा. माझ्याकडे आणि डॉक्टरकडे (आदित्य कुलकर्णी) त्याने बऱ्याचदा हा विषय काढला होता. पण आम्हे नेहमी काही ना काही कारण सांगून तो विषय टाळत असू. नेमकं तेव्हाच आम्ही आमच्या होस्टेलच्या मित्रांचा एक स्वेटशर्ट बनवला होता. तो पाहिल्यावर आपण आपल्या गेटटुगेदरला असाच एक टीशर्ट बनवू अशी त्याची टिमकी सुरु झाली होती.
एकदा जुन्नरहून पुण्याला येत असताना आदित्यने माझ्याकडे गेटटुगेदरचा विषय काढला.
“गुंड्या आपण गेटटुगेदर केलं पाहिजे.”
“अरे मग करू की. घाई काय आहे एवढी?”
“घाई आहे.”
“का काय झालं असं?”
“विन्या फार दिवस राहील असं वाटत नाहीये. त्याचं दुखणं दिसतं तेवढं साधं नाहीये. विन्या फारतर सहा महीने आपला सोबती आहे.”
आदित्यच हे वाक्य ऐकून मी सुन्न झालो. मी गाडी बाजूला घेतली आणि उतरून त्याच्याशी बोलू लागलो.
“हो विन्याला झालेला कॅन्सर बरा होणारा नाहीये. आपल्याला लवकरात लवकर गेटटुगेदर केलं पाहिजे.”
करू असं म्हणून आम्ही पुण्याकडे निघून गेलो.
माझा हात दुखतो अशा छोट्या तक्रारीपासून सुरु झालेलं दुखणं कॅन्सर असेल असं आम्हा कोणालाच वाटलं नव्हतं.त्याचा कॅन्सर डीटेक्ट झाल्यापासून ३-४ महिन्यात विन्या गेला. जाण्यासाठीसुद्धा त्याने ३१ डिसेंबर निवडला. विन्या गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता. दादांना फोन करून मी विचारलं,
“उद्या पेपर आहे. काय करू? येऊ का जुन्नरला?”
“तू येऊ नकोस.” इतकं बोलून दादांनी फोन ठेवला. मला येऊ नको म्हटले तरी त्यांनी आईला सांगून ठेवलं होतं की, “तो आला तर त्याला काही म्हणू नकोस.”
विन्याला निरोप द्यायला मला जमलं नाही. पण तो असता तरी त्याने मला पेपरलाच जायला सांगितलं असतं याची मला खात्री आहे. गणेशच्या लग्नात नाचण्याची त्याची इच्छा पूर्ण झालीच नाही. त्याच्या जाण्याने सगळ्यांनाच चटका लावला. जुन्नरच्या घरात हॉलमध्ये रिकामी खुर्ची पाहिली की अजूनही विन्याची आठवण येते. आजही दर वर्षी गणपती आणि ३१  डिसेंबरला त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.