टाटांचा पाचवा पांडव निफ्टीच्या मैदानात येतोय.. 

टाटा ग्रुपमधील टाटा कन्झ्युमर या कंपनीचा नुकताच निफ्टी५० मध्ये समावेश करण्यात आला. ३१ मार्च २०२१ रोजी गेल इंडिया ऐवजी ही कंपनी अधिकृतपणे निफ्टी५० मध्ये समाविष्ट होईल. निफ्टी५० मध्ये समाविष्ट होणारी ही टाटा ग्रुपची पाचवी कंपनी असेल. याआधी टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्स, टाटा स्टील, टीसीएस, टायटन या कंपन्या निफ्टी५० मध्ये आहेत. याबरोबरच निफ्टी५० मध्ये समाविष्ट होणारी FMCG सेक्टरमधली ही पाचवी कंपनी असेल. याआधी आयटीसी, हिंदुस्थान युनीलिव्हर, ब्रिटानिया आणि नेस्ले या कंपन्या निफ्टी५० मध्ये आहेत.

 

टाटा कन्झ्युमर किती मोठा ब्रँड आहे?
भारतात मिठाचा सर्वात मोठा ब्रँड

भारतात चहाचा दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड

जगात चहाचा दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड

भारतातील नॅचरल मिनरल वॉटरचा सर्वात मोठा ब्रँड (हिमालयन)

 

निफ्टी५०मध्ये प्रवेश झाल्याने काय होऊ शकते?
टाटा कन्झ्युमरच्या शेअरने नुकताच आपला ऑल टाईम हाय ६५४ रुपये सर केला. एखाद्या कंपनीचा शेअर निफ्टी५० मध्ये येतो याचा अर्थ कंपनीच्या आजवरच्या वाटचालीवर आणि भविष्यातील वातचलीबद्दल सेबीला भरोसा आहे. हे एक प्रकारचे कंपनीचे अपग्रेडेशन आहे असे म्हणूयात हवे तर. याने काय होऊ शकेल? तर कंपनीत अजून जास्त गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक साधारणपणे ७००-८०० कोटी रुपयांची असू शकेल.याचवेळी गेल इंडिया मात्र निफ्टी५० मधून बाहेर गेली आहे. त्यामुळे या कंपनीतून पैसा बाहेर पडेल. ही रक्कम साधारणपणे ४०० कोटींच्या घरात असू शकेल.

बिझनेस रीअलाईनमेंट कंपनीने टाटा केमिकल्समधून कन्झ्युमर प्रॉडक्ट्सला काढून त्याला टाटा कंझ्युमरमध्ये मर्ज केलं. कंपनीची ही चाल चांगलीच यशस्वी झाली आहे. सुरुवातीला FMCG वर फारसं लक्ष नसलेल्या टाटा सन्सने आता या कंपनीच्या माध्यमातून या सेगमेंटवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या एकूण बिझनेसपैकी ५६% भारतातून तर २६% अमेरिका आणि युकेमधून येतो. परदेशातील बिझनेस वाढवण्यावर कंपनी बरेच लक्ष देत आहे.

टाटा कन्झ्युमर बिझनेस मॉडेल –
या कंपनीने आपल्या प्रॉडक्टस् ची विभागणी तीन भागांत केली आहे.

१. इन द किचन –

यामध्ये टाटाचं मीठ, टाटा संपन्नचे मसाले यासारख्या गोष्टी येतात. या प्रॉडक्ट्स वर कंपनी जास्त लक्ष देते, त्यांची सतत जाहिरात करते. सतत नवनवीन पद्धतीने प्रमोशन करते. टाटा संपन्न ब्रँडने गेल्या वर्षभरात दोन आकडी वाढ केली आहे. त्यामुळे आता या ब्रँडमध्ये अजून वेगवेगळे मसाले, मिक्सेस आणण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीचा बराचसा म्हणजेच जवळपास ७०% महसूल या सेगमेंटकडून येतो.

२. ऑन द गो
३. ऑन द टेबल

ऑन द गो आणि ऑन द टेबल या दोन सेगमेंटमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी कंपनीने नुकतीच कोट्टाराम ऍग्रो फूड्स नावाची कंपनी १५६ कोटी रुपयांना विकत घेतली. बंगलोरची ही स्टार्ट अप कंपनी ‘सोलफुल’ या ब्रँडनेमखाली ब्रेकफास्ट सीरिअल (कॉर्न फ्लेक्ससारखे पदार्थ) विकते. ही कंपनी २०११ मध्ये सुरू झाली होती आणि ऑरगॅनिक सीरिअल या सेगमेंटमध्ये तिने अल्पावधीत चांगले स्थान निर्माण केले आहे. या कंपनीची बिझनेस स्टॅंडर्ड, युअरस्टोरी, सीएनबीसी१८, द विक सारख्या नामांकित ब्रँड्सने दखल घेतली आहे. आजमितीला सोलफुलचा रिच जवळपास १५००० आऊटलेट्स एवढा आहे. अगदी मोजक्या कालावधीत एवढा मोठा टप्पा या कंपनीने गाठला. आता टाटा कन्झ्युमरच्या तब्बल २४ लाख आऊटलेट्सच्या रिचची मदत त्यांना मिळणार आहे. यात भर म्हणजे टाटा हे ब्रँडनेमशी आता सोलफुल जोडलं गेलं. त्यामुळे जिथे टाटा पैसे लावतात त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सवर लोकांचाही विश्वास बसणार. हे जवळपास २०००० कोटींचे मार्केट असून १५% एवढ्या वेगाने वाढत आहे.

योग्य माणसांची नेमणूक –
टाटा कन्झ्युमरने नुकतीच सुनील डिसुझा यांची एमडी आणि सीईओपदी नियुक्ती केली. डिसुझा हे आयआयएम कोलकाताचे माजी विद्यार्थी असून  FMCG क्षेत्रात त्यांनी याआधी हिंदुस्थान युनिलिव्हर आणि पेप्सीको या कंपन्यांबरोबर काम केले आहे. टाटा कंझ्युमरकडे येण्याआधी त्यांनी व्हर्लपूल कंपनीतही काम केले आहे. त्यांच्या या अनुभवाचा टाटा कन्झ्युमरला फायदा होऊ शकतो.

डिस्ट्रीब्युशनवर अधिक लक्ष केंद्रित –
टियर२ आणि टियर३ सिटीज तसेच ग्रामीण भागात आपला रिच वाढवण्याकरता टाटा कन्झ्युमरने आपल्या विक्रेत्यांचे जाळे विस्तारण्यास सुरुवात केली आहे.

कंपनीचे प्रॉफिट मार्जिन ३-४% वाढले आहे. आता हा मार्जिन आणखी वाढू शकतो. कोव्हिड मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये कंपनीने अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. याचाही कंपनीला फायदा होऊ शकतो. स्टार बाजार ही टाटाची रिटेल चेन सगळ्यांना माहीतच असेल. स्टार बाजारच्या आऊटलेट्समध्ये आता टाटा कन्झ्युमरच्या प्रॉडक्ट्सचा एक वेगळा सेक्शन करून कंपनी त्याचे मार्केटिंग करत आहे.

येणाऱ्या काळात भारतात रिटेल क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा विचार करता टाटा कन्झ्युमरला आपला बिझनेस योग्य दिशेने वाढविण्यासाठी भरपूर संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. ब्रँडनेम, चांगली मॅनेजमेंट यांच्या जोरावर हा शेअर चांगली कामगिरी करू शकतो. अर्थात ज्याने त्याने गुंतवणूक करताना आपापल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.