स्वर्गरथ

परवा गावाकडे एका परिचितांच्या घरी मयत झाले. अंतिम विधीला जाणे भाग पडले. पुण्यातून सकाळी निघून आम्ही पोहोचलो. त्या लोकांना भेटून सांत्वन केले. ज्या घरात मयत झाले होते ते गावाच्या सीमेवर होते. म्हणजे जवळजवळ दुसऱ्या गावात म्हटले तरी चालेल. दोन गावांच्या मध्ये फक्त एक रस्ता शीव म्हणून पाळला जातो. रस्त्याच्या अलीकडे एक गाव आणि पलीकडे दुसरे.
ज्या घरात मयत झाले ते तसे पाहिले तर दुसऱ्या गावाला जवळ होते. पण त्या गावात अंतिम विधी कसा करणार? तो तर आपल्याच गावात केला पाहिजे. पण घर आणि गावातली अंत्यसंस्काराची जागा यातले अंतर जवळपास पाच किलोमीटर इतके होते. एवढे अंतर प्रेताला खांद्यावर घेऊन जाणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. खांदेकऱ्यांचे हाल होतात. घरातल्या लोकांचे हाल होतात, उन्हाची वेळ असेल तर तापलेल्या रस्त्यावर चालताना पाय पोळतात. जुन्या काळात सोयीसुविधा नव्हत्या तेव्हा प्रेताला खांद्यावर घेऊन जाण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. या गावातले लोक गेली कित्येक वर्षे तसेच करतही आले. पण हे सगळे कधी स्टॅंडर्ड बनून गेले कोणालाच कळले नाही. आता इतक्या सुविधा झालेल्या असतानाही प्रेताला खांद्यावरूनच घेऊन जायचे असा आग्रह काही जुन्या मंडळींनी धरला. आमच्यातल्या काही तरुण मंडळींनी त्याला विरोध दर्शवला. रूढी, परंपरांचे गारुड या लोकांच्या मनात एवढे रुजले आहे की त्यांनी ऐकायला नकार दिला.
त्यांच्यातल्याच एका ज्येष्ठाने नंतर समजावून सांगितले.
“अरे जग कुठे चाललंय? तुम्ही कुठं अडकून बसलात? जरा विचार करा?”
 
आसपासच्या एक दोन गावांतही असेच होते. ते गावकरी शहाणे झाले. त्यांनी एक रथच बनवून घेतला. त्याचं नावही “स्वर्गरथ” असे ठेवले. गावातल्या कुठल्याही घरात मयत झाले की अंतिम यात्रा या रथातून काढली जाते. सगळ्यांचाच त्रास वाचतो, सोय होते. 
आपलाच हेका लावून धरणाऱ्या ह्या जुन्या मंडळींनी अखेरीस ऐकले नाहीच.  सकाळी दहाच्या आसपास अंत्ययात्रा सुरु झाली. म्हातारी मंडळी, गुडघे दुखणाऱ्या बायका, लहान मुले यांची रवानगी एका टेम्पोतून करण्यात आली. काही लोक स्वतःच्या गाड्यांनी गेले. गंमत अशी की प्रेताला खांद्यावर घेऊन जायचे असा आग्रह धरणाऱ्या आणि तरुण वर्गाचा विरोध मोडून काढणाऱ्या जुन्या मंडळींनी हळूच काढता पाय घेतला. आपापल्या दुचाकीवर बसून ते छू झाले. म्हणजे भर उन्हात अनवाणी चालणाऱ्या कुटुंबियांचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खांदेकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अगोदर जाऊन पोहोचलेल्या लोकांना पाऊण तास बसून रहावे लागले ते वेगळेच.
प्रेताला स्मशानभूमीमध्ये आणले गेले. पुढची कार्यवाही करण्याअगोदर मरण पावलेल्या माणसाच्या मुलांनी आंघोळ करावी असा संकेत आहे. स्मशानभूमी देखील नदीच्या काठावरच होती. पण मुलांनी नदीमध्ये आंघोळ न करता पाईप लावून त्यातून पाणी अंगावर घेतले. इथे रूढी पाळल्या गेल्या नाहीत तेव्हा हीच मंडळी मूग गिळून गप्प होती.
अंत्यविधी सुरु असताना आणि झाल्यानंतरही ही माणसे कशी गाडीवर पुढे निघून आली याच्या खुमासदार गप्पा उपस्थितांमध्ये रंगल्या होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.