थंडीतली फोटोग्राफी

“अण्णा उद्या सकाळी कितीचा गजर लावलाय?” झोपताना मी अण्णाला विचारलं.
“साडे तीनचा लावलाय.” अण्णा कुस बदलत म्हणाला.
“बरंय मग मी काही गजर लावत नाही” म्हणत मी सुद्धा निद्रादेवीची आराधना करू लागलो.
पहाटे ३ वाजता जाग आली. शेजारी पडलेला मोबाईल उचलून डोळे किलकिले करत मी वेळ पाहिली तर तीन वाजले होते. अण्णाच्या मोबाईलचा गाजर वाजेलच असा विचार करून मी परत झोपी गेलो.
थोड्या वेळाने अण्णाचा फोन वाजला म्हणून जागा झालो. पाहतो तर सव्वा चार वाजले होते. अण्णा फोन उचलून बोलत होता. दादांचा फोन होता हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही.
लगेच उठून दोघंजण रात्रीच बनवून ठेवलेल्या चुलाणाकडे धावलो. अण्णाने रात्री आजूबाजूला पडलेल्या पत्रावळी गोळा करून जाळ केला. मी टीपाडातून बादलीने पाणी उपसून कढईत टाकायला सुरुवात केली. एव्हाना दादा आणि काकू आजी जागे होऊन आमची धावपळ बघत उभे राहिले. जाळायला लाकडं कोणती वापरावीत हे आम्हाला कळेना झाल्यावर काकू आजीने भराभरा २-३ मोझीर झालेली लाकडं काढून दिली आणि एकदाची चूल पेटली.
लगीनघर असल्यानं हळूहळू का होईना पण जरा लवकरच घरात जाग येऊ लागली होती. थंडीचे दिवस असल्याने जो तो उठून कढईशेजारी येऊन उबेला बसत होता. एक एक जण आंघोळीला नंबर लागेल तसा उठून जात होता. माझे दोन धाकटे चुलत भाऊ आर्यन आणि अद्वैत सुद्धा शेकोटीला येऊन बसले होते. आर्यनची झोप अजून उडाली नव्हती. त्याने जांभया द्यायला सुरुवात केली तेव्हा मग फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव टिपताना माझी थोडी तारांबळ उडाली पण त्याची खंत नाही.

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.