कथा गणवेशाची

आज एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलो होतो. बायको खरेदीमध्ये मग्न असताना माझं लक्ष शेजारच्या काउंटरवर गेलं. एक दाम्पत्य आपल्या मुलाला घेऊन गणवेश खरेदीसाठी आले होते. वडिलांनी मुलाला उचलून काउंटरवर बसवले. आईने तोवर दुकानदाराला त्याच्या शाळेचे नाव सांगितले होते. दुकानदाराने बरोबर त्याच्या शाळेचा आणि त्याच्या मापाचा गणवेश काढून दिला. त्याच्या वडिलांनी पटकन त्याचा शर्ट काढून नवा शर्ट त्याला घातला. खाली उतरवून त्याची विजार उतरवून नविन विजार चढवली. स्वारीला आरशासमोर उभं केलं. त्याच्या चेहऱ्यावर कोण तो आनंद. गाडी खुश एकदम. पप्पांना म्हणतोय कसा, “एक फोटो काढा बरं माझा.” वडिलांनी देखील पटकन आपला फोन काढून त्याचा एक फोटो काढून घेतला
 
त्यांची ही सगळी गडबड पाहून माझं मन भूतकाळात गेलं. उन्हाळ्याची सुट्टी संपत आली की शाळा सुरु होण्याचे वेध लागलेले असत. नविन वर्ष म्हणजे शाळेत मिळणारा नवा वर्ग, नवे शिक्षक, नव्या वह्या, पुस्तके. आमची बहिण पूजा एक वर्ष पुढे असल्यामुळे पुस्तकं सहसा मला नवी कधी मिळाली नाहीत. त्यावेळेस गणवेशसुद्धा एकच असे. आत्तासारखे सोमवारी घालायचा टीशर्ट वेगळा, स्पोर्ट्सचा टीशर्ट वेगळा अशी चंगळ नसे. एका वर्षात शरीरयष्टीमध्ये सुद्धा फार फरक झाला नसेल तर गणवेशसुद्धा नवा मिळत नसे. सुरुवातीला काही दिवस दादांकडे तक्रार करून नंतर मग मात्र सवय होऊन जात असे
 
गणवेश खरेदी मात्र अगदी वर उल्लेख केला तशीच होत असे. मी दादांबरोबर शिवाजीकाकांच्या (वाव्हळदुकानात जात असे. तिथे मग आधी वेगवेगळे शर्ट आणि हाफ चड्ड्या घालुन ट्रायल होत असे. आणि मग दादांच्या मताने त्यातला एक निश्चित होत असे. नवा गणवेश घेतल्याचा उत्साह मात्र पुढच्या काही वेळात दादा आणि शिवाजी काकांच्या गप्पा सुरु झाल्या की आपोआप ओसंडून जात असे. त्या दोघांच्या गप्पांमध्ये मला एकट्याला फार कंटाळा येत असे. मगदादा चला घरीअसा तगादा मी लावत असे. नवा गणवेश घालून शाळेत जाणं याचंसुद्धा एक कौतुक असायचं. कारण सगळेच मित्र मैत्रिणी नव्या गणवेषात असत. मग तू कुठे घेतलास, त्याच्या चड्डीच्या खाकी रंगाची शेड कशी खाकी वाटत नाहीये, अमक्याच्या चड्डीला इलास्टिक आहे आणि पट्टा लावायला हुकच नाहीयेत अशा चर्चा केल्याची पुसट आठवण आहे
 
आठवीला गेल्यावर मग फुल पँट आली. त्यावेळी मग गणवेश रेडीमेड घेण्याऐवजी शिवून घेऊयात असं दादांनी सुचवलं. गावाकडे दादांचे एक मामा शिवणकाम करत. त्यांच्याकडून आपण तुझे कपडे शिवून घेऊ असं दादा म्हणाले. सुरुवातीला मी तयार नव्हतो. खेड्यात असणारे दादांचे मामा कसे शिवतील कपडे असं मला आपलं वाटून गेलं. आता माझ्या त्या वेडेपणाची कीव येते.त्यांनी खरोखरच कपडे मस्त शिवले आणि माझी स्वारी पुन्हा एकदा खुश. कॉलेजला गेल्यावर मग गणवेश नव्हताच. पुन्हा मग इंजिनियरिंगला गेल्यावर सोमवार आणि गुरुवारी गणवेश असे. अर्थात कॉलेजच फार कमी अटेंड केल्याने गणवेश घालायचा प्रसंग खूपवेळा आला नाही
 
एव्हाना बायकोची खरेदी संपली होती. इतका वेळ त्या छोट्या मुलाकडे कौतुकाने पाहणारा मीसुद्धा भानावर आलो आणि तिच्यासोबत दुकानातून बाहेर पडलो

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.