चौदा आण्याची गोष्ट

 

दादांशी कॉलेजच्या गप्पा मारताना मग त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी सांगा असा आग्रह मी केला. दादासुद्धा तयार झाले. जमेल तसा एकेक किस्सा त्यांनी सांगितला. त्यातलाच एक आज इथे मांडतोय. नेहमीप्रमाणे दादा सांगू लागले.
” आता १०० पैशाचा रुपया होतो. आमच्या वेळेस ६४ पैशाचा किंवा १६ आण्याचा रुपया होई . २ आण्यांची चवली , ४ आण्यांची पावली तर ८ आण्यांची अधेली होत असे. अर्थात मला सांगायची गोष्ट वेगळीच आहे. एकदा भोरमामा (दादांचे मामा) थोरांदळ्याला आले होते. मामा भेटले की आम्हाला फार बरे वाटत असे. त्यांचे ते उजळ कपडे, तलम धोतर, अंगात कबजा (एक प्रकारचे जॅकेट) असा त्यांचा थाट असे. आले की प्रत्येक वेळी आम्हाला ते पैसे देत असत. कबजाच्या खिशात हात घालून ते पसाभर नाणी काढत तेव्हा आमचे डोळे विस्फारत असत. त्या भेटीमध्ये मामांनी आम्हा भावंडांना एक आख्खा रुपया दिला. अर्थात देताना त्यांनी तो बाईच्या (दादांची मोठी बहीण – तिला सगळे बाईच म्हणतात) हातात दिला. त्या रुपयातून बाईने दोन आण्याचा खाऊ घेतला. काय ते आता मला आठवत नाही पण तेव्हा एक पैशाला पाच गोळ्या मिळत – रेषारेषांच्या. उरलेल्या चौदा आण्यांची (आताचे ८७ पैसे) बाईने पुरचुंडी बांधली आणि आम्ही दोघं कुमजाईत (गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या मळ्याचे नाव) रताळी खणायला गेलो. रताळी खणत असताना बाईने पैशाची पुरचुंडी माझ्याकडे दिली. बाई रताळी खणायची आणि मी गोळा करायचो. एक वाफा खणून झाला आणि बाई दमली. थोडी बसली आणि नंतर रताळ्यांचे ते घमेलं उचलून आम्ही परत घरी निघालो. घमेलं अर्थात तिच्या डोक्यावर. ती मोठी होती ना!! प्रत्येक वेळी बिचारीला ते मोठेपण असे वहावे लागे.
बरेच अंतर गेल्यावर तिने मला पैशाबद्दल विचारले आणि मी हादरलो. माझ्याकडून पुरचुंडी कुठेतरी हरवली होती. पण बाई आता मारते की काय अशी भीती मला मुळीच वाटली नाही. आम्हा सगळ्या भावंडांना बाईची भीती कधीच वाटली नाही. उलट तिचा फार मोठा आधार वाटे. अजूनही वाटतो. पण आता ती किंचितही खटटू झाली तर मात्र भीती वाटते.
आम्ही दोघंही शेताच्या दिशेने पळत निघालो. आधीच खणलेला वाफा बाईने परत एकदा सगळा खणला. अखेरीस चौदा आणे सापडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. चौदा आणे नव्हे तर आमच्यासाठी त्यावेळेस ते ब्रह्मांडच होते जणू. दोघंही खुश झालो आणि घरी परतलो. आजही चौदा आण्याची गोष्ट आठवली की बाई आणि माझे डोळे पाणावतात. चौदा आण्याला आज काहीच किंमत नाही पण त्यावेळेस त्याला किती किंमत होती हे आमचे आम्हीच जाणोत. अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी आम्हा भावंडांना खूप काही शिकवले. खासकरून माझे आणि बाईचे भावाबहिणीचे नाते अजूनच घट्ट केले.”
आदित्य

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.