टोरंटो रॅप्टर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सला पाजले पाणी

मालिका ४-२ अशी जिंकत पटकावले पहिले एनबीए विजेतेपद

एनबीए फायनल्सच्या आज झालेल्या सामन्यात टोरंटो रॅप्टर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सचा ११४-११० असा पराभव करत सात सामन्यांची मालिका ४-२ अशी जिंकत आपले पहिले एनबीए विजेतेपद पटकावले.

यावर्षीची ईस्टर्न कॉन्फरन्सचे विजेते म्हणून अंतिम फेरीत आलेल्या टोरंटो रॅप्टर्सला कुणी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. त्यांना इस्टर्न कॉन्फरन्स सेमी फायनल्समध्येही सेव्हंटी सिक्सर्सने सात सामने झुंजवले. कॉन्फरन्स फायनल्सलादेखील मिलूवाकी बक्सने त्यांना सहा सामने झगडवले. त्या तुलनेत गोल्डन स्टेट वॉरियर्सची वाटचाल सोपी झाली. सेमी फायनल्सला त्यांनी रॉकेट्सला ४-२ असे सहा सामन्यांत तर फायनल्सला ट्रेलब्लेझर्सला चारच सामन्यांत नमवले. याचा अर्थ असा की फायनल्समध्ये येताना वॉरियर्सला जास्त विश्रांती मिळाली होती.

 

गोल्डन स्टेट यावर्षीदेखील विजेतेपद जिंकणार असे अनेकांना वाटण्यास अजून एक कारण म्हणजे त्यांची एनबीएमधील गेल्या पाच वर्षातील दहशत. गोल्डन स्टेटने २०१५ पासून ते २०१९ पर्यंत सलग पाच वर्षे वेस्टर्न कॉन्फरन्सची अंतिम फेरी गाठली. यातील २०१५,२०१७ आणि २०१८ या तीन वर्षी एनबीएचे विजेतेपदही मिळवले. म्हणूनच यावर्षीही विजय मिळवून ते विजयाची हॅटट्रिक करतील अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. स्टेफ करी, ड्रेमंड ग्रीन, क्ले थॉम्पसन, आंद्रे इग्वाडोला यांच्यासारखे मोठे खेळाडू फर्स्ट टीममध्ये असताना गोल्डन स्टेट रॅप्टर्सला फारशी संधी देतील असे चित्र नव्हते.केविन डूरांटसारखा मोठा खेळाडू जखमी असूनही त्याचा गोल्डन स्टेटला काही फरक पडेल असे वाटत नव्हते. रॅप्टर्सने मात्र अंडरडॉगप्रमाणे खेळ करत गोल्डन स्टेटवर कायम वर्चस्व ठेवले. गोल्डन स्टेटच्या घरच्या कोर्टवर झालेले सलग दोन सामने जिंकत त्यांनी गोल्डन स्टेटचे मनोधैर्य खच्ची केले. क्वाही लेनर्डवर भिस्त असलेल्या रॅप्टर्सच्या संघाकडून पास्कल सियाकम, काईल लॉवरी, डॅनी ग्रीन या सगळ्यांनी वेळोवेळी आपला खेळ उंचावला. अगदी चौथा सामना जिंकून ३-१ अशी आघाडी घेतल्यानंतरही रॅप्टर्सच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. कामगिरी अजून फत्ते झाली नाही ही त्यामागची भावना होती.

झालेही तसेच.  पाचव्या सामन्यात रॅप्टर्स जवळपास जिंकले असे वाटत असताना वॉरियर्सच्या स्टेफ करीने खेळ उंचावत संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या सेकंदाला रॅप्टर्सच्या लॉवरीचा थ्री पॉइंटर चुकल्याने वॉरियर्सने अवघ्या एक गुणाच्या आघाडीने सामना १०६-१०५ असा जिंकत पिछाडी २-३ अशी भरून काढली.

 

पुढचा सहावा सामना वॉरियर्सच्या घरच्या कोर्टवर झाला. घरच्या कोर्टवर सामना असल्याने वॉरियर्स त्याचा पुरेपुर फायदा उठवत मालिकेत ३-३ बरोबरी साधतील असे अनेकांनी सांगितले. त्यांनी खेळही उच्च दर्जाचा केला. मात्र तरीही रॅप्टर्स त्यांना भारी पडले. वॉरियर्सने क्वाही लेनर्ड वर जास्त लक्ष देत त्याला जखडून ठेवले. याचा फायदा घेत रॅप्टर्सचे इतर खेळाडू लॉवरी, सियाकम व्हॅन व्लीट यांनी घेत अनुक्रमे २६,२६ आणि २२ गुण नोंदवले. वॉरियर्सचा स्टार खेळाडू क्ले थॉम्पसनला झालेली दुखापतही रॅप्टर्सच्या पथ्यावर पडली. सहावा सामना ११४-११० जिंकत रॅप्टर्सने आपले पहिले विजेतेपद पटकावले. या संपूर्ण मालिकेत रॅप्टर्सच्या सहा खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात सरासरी १० किंवा त्याहून अधिक गूण नोंदवले यावरून त्यांचा संपूर्ण संघ विजयासाठी झगडला हे लक्षात येते.

 

हा सिझन सुरु होताना रॅप्टर्सने लेनर्डला आपल्या ताफ्यात घेतले. त्यासाठी त्यांनी आपला स्टार खेळाडू डिमार डिरोझनचा बळी दिला. त्यांच्या या निर्णयावर चाहत्यांकडून टीकाही झाली. क्वाही दुखापतग्रस्त असल्याने तो फारसा उपयोगी ठरणार नाही असे अनेकांना वाटत होते. क्वाहीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. ‘मला इथे इतिहास रचायचा होता’ ह्या त्याच्या वाक्यावरून त्याची मनस्थिती ध्यानात येते. क्वाही लेनर्ड फायनल्सचा एमव्हीपी म्हणजेच मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर झाला. दोन वेगवेगळ्या संघांकडून फायनल्स एमव्हीपी किताब जिंकणारा लेनर्ड हा लेब्रॉन जेम्स आणि करीम अब्दुल जब्बार यांच्यानंतर तिसराच बास्केटबॉलपटू ठरला. लेनर्ड आता लगेचच फ्री एजंटही होतोय. त्यामुळे रॅप्टर्स त्याचा करार  वाढवणार की त्याला इतर कोणत्या संघाकडे जाऊ देणार ही उत्सुकता राहील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.