तरीही तो अढळ राहिला, ध्रुव ताऱ्यासारखा!

क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं होतं की दुसरा कुणीतरी सामन्यात भारी खेळतो आणि तुमची चांगली कामगिरी झाकोळून टाकतो. द्रविडची संपूर्ण कारकीर्द काहीशी अशीच गेली. सचिन आणि दादाच्या तेजापुढे हा सतत झाकोळत राहिला. पण तरीही तो अढळ राहिला, ध्रुव ताऱ्यासारखा! अगदी शेवटपर्यंत.

द्रविड मला लढाऊ वृत्तीचे प्रतिक वाटतो. याला कारण म्हणजे त्याचा फलंदाजीचा क्रमांक. पहिली विकेट पडली की हा फलंदाजीला येई. म्हणजे कायम अंडर प्रेशरच खेळायचं. असं असतानाही त्याने कित्येकदा संघाला आपल्या या लढाऊ वृत्तीने संकटातून बाहेर काढलंय.

सुरुवातीला हा वन डेचा खेळाडू नाही असा शिक्का त्याच्यावर बसूनही तो शांतच राहिला. फक्त धावा काढत राहिला. कारकीर्दीच्या शेवटी दहा हजाराहून जास्त धावा त्याच्या नावापुढे होत्या यावरून काय ते समजून घ्या.

स्लीपमध्ये कॅच उडालाय आणि द्रविडने सोडलाय असं फार क्वचित झालं असेल. कसोटी आणि वन डे मिळून त्याने घेतलेले जवळपास चारशे कॅचेस याचीच साक्ष देतात.

काही खेळाडू असे असतात की संघासाठी काहीही करायला तयार होतात. द्रविड त्यातलाच एक. दादा म्हणाला, “भावा तू आता विकेटकिपिंग करायचीस.” द्रविडने दुसऱ्या क्षणाला ग्लोव्हज हातात घातले असतील. बरं हे काही एक दोन मॅचेस करता नाही, तर चांगल्या सत्तर ऐंशी मॅचेस. सोपं नाही!

त्याने खेळलेल्या एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातसुद्धा हवा केली. किती? तर अगदी द्रविडला का घेतलंय संघात असं म्हणणाऱ्या लोकांनी नुसती तोंडात बोटं नाही तर अख्खा हात घातला असेल.त्यावेळचे हर्षाचे समालोचन अजूनही कानात घुमतय.

त्याच्या कसोटीमधील डावांबद्दल बोलायलाच नको. कारण किती बोलू आणि किती लिहू असं होईल. जिथे जाईल तिथे या पठ्ठ्याने धावा काढल्या, संघाला सतत साथ दिली, आपलं ‘वॉल’ हे नाव सार्थ करत राहिला.

निवृत्तीनंतर त्याने अ संघाची जबाबदारी घेतली आणि नवख्या मुलांकडून तुफान कामगिरी करून घेतली. आजकाल चमकत असलेले श्रेयस अय्यर, शुभमन गिल, संजू सॅमसॅन यांच्यासारखे खेळाडू आपल्या कामगिरीचे श्रेय त्याला देतात.आता तो एनसीएमध्ये हेड कोच म्हणून काम करतोय.भारतीय क्रिकेटची पुढची पिढी घडवतोय.

दादा, सचिन, द्रविड खेळत असताना फेसबुकवर पोस्ट यायच्या. हे तिघे जेव्हा रिटायर होऊन भारतीय क्रिकेटची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील तेव्हा काय भारी वाटेल. आज सचिन फारसा सक्रिय नसला तरी दादा आणि द्रविडकडे असलेल्या जबाबदाऱ्या पाहता भारतीय क्रिकेट योग्य माणसांकडून हाताळले जातेय असे वाटते.

द्रविडच्या साधेपणाबद्दल तो खेळत असताना आणि निवृत्तीनंतरही बरंच काही लिहिलं गेलंय. तो असाच आहे आणि असाच राहील याची खात्री आहे.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ध्रुव ताऱ्यासारखा अढळ राहिलेला राहुल भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनातही कायम अढळ राहील याची मला खात्री आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.