गरिबांची चेतक 

भारतात सध्या तिशीपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास ९०% लोकांची पहिली सायकल अॅटलास असेल. दूधवाला, पेपरवाला, धोबी,पाववाला, वायरमन, आईस्क्रीम खरंतर गारीगारवाला हे सगळे सायकलवरच तर यायचे. या सगळ्यांच्या रोजीरोटीचा अॅटलास सायकल हा एक मुख्य भाग होता. यांच्याबरोबर मोठा नोकरदार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी हेही या सायकलवर अवलंबून होते. शेतकरी वर्ग तर गवत वाहून नेणे, खताच्या, धान्याच्या नेणे, दळण नेणे अशा कितीतरी वेगवेगळ्या कामांसाठी सायकलचा वापर करी.

विद्यार्थी वर्ग आपल्या गावातून कॉलेजात जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी प्रसंगी डबल, ट्रिपलसीट सायकलवर जात असे. अनेक मुली अॅटलासची लेडीज सायकल घेऊन शाळा कॉलेजात जात. कित्येकांच्या पहिल्या प्रेमाची अॅटलास साक्षीदार आहे. नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्येही अॅटलासचं एक वेगळं स्थान होतं.
मला सायकल पाहिजे असं एखादं पोरगं बापाला म्हटलं तर नवी सायकल अॅटलासचीच येई.हिरो रेंजर, एमटीबी वगैरे खूप नंतर आल्या. काळ पुढे सरकू लागला तशा नव्या कंपन्या आपल्या सायकल बाजारात आणू लागल्या.शाळकरी पोरांना साहजिकच त्या गियरवाल्या सायकल आवडू लागल्या. लवकरच शहरी भागातून अॅटलास हद्दपार झाली. मोजके दूधवाले, पेपरवाले सोडले तर फारसं कुणी ही सायकल वापरेनासं झालं.

ग्रामीण भागात अजूनही या सायकली दिसतात.मात्र तिथेही आता बदल घडतोय. सायकलपेक्षा दुचाकी बरी वाटतेय. विद्यार्थ्यांनी अॅटलास घेणं कधीच बंद केलंय.

अशात या सायकलची मागणी कमी होणार हे निश्चित होतं. कंपनीने ह्या बदलाला अनुसरून पावले टाकली नसावीत.खप कमी होत गेला तसं उत्पादन कमी होत गेलं.अखेरीस परवाकडे कंपनीने शेवटचा उत्पादन प्रकल्पसुद्धा बंद केला. स्थापनेपासून पंधरा वर्षांत भारतातील सर्वात मोठी सायकल कंपनी, वर्षाला ४० लाख सायकली ते २ लाख सायकली आणि आता प्रकल्प बंद हा प्रवास तसा बराच वेगात झाला. कंपनीने हा अल्पविराम आहे असं म्हटलं असलं तरी पुन्हा काही होईल असे चित्र सध्यातरी नाही.

जुन्नरला हिरो सायकल मार्टवाल्या शब्बीरची मुलंसुद्धा त्याच्या दुकानात काम करी एवढं काम असे. अॅटलासच्या जोरावर त्याने मुलांची लग्नसुद्धा रेटून नेली होती. आज अॅटलास बंद होतेय समजल्यानंतर अशा अनेक शब्बीरना फार वाईट वाटलं असेल.

मागे जेव्हा चेतक बंद झाली तेव्हा अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.मला वाटतं भारतातल्या अनेकांसाठी त्यांची अॅटलास हीच त्यांची चेतक होती. अॅटलासमध्येच त्यांनी चेतकचा रुबाब शोधला,राजेशाही थाटही मिरवला. चेतनने पुनरागमन केलं तसं कदाचित अॅटलाससुद्धा पुनरामन करेल अशी आशा करूयात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.