१९९५ साली आम्ही भाड्याच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्या अगोदर साधारण चार वर्षांपूर्वी १९९१ ला दादांनी नगरहून टीव्ही आणला होता. टीव्ही होताच त्यामुळे शनिवार रविवार चांगले जायचे. त्यावेळेस दर शनिवारी झी टीव्ही वर फिलिप्स टॉप टेन नावाचा कार्यक्रम लागत असे. त्या त्या आठवड्याची टॉपची १० गाणी त्या कार्यक्रमामध्ये दाखवली जात. अर्थात हिंदी. नुकतंच कळू लागल्यामुळे ही गाणी मला ऐकावीशी वाटत. शनिवारी सकाळची शाळा असे. शाळा सुटली की गाण्याचा हा कार्यक्रम चुकू नये म्हणून मी घाईने घरी येत असे.
गाण्याचा हा कार्यक्रम एक तासात संपत असे. नंतर कधी गाणी ऐकावीशी वाटली तर बाकी काही पर्याय नसे. मग आपल्याकडे टेप असावा असे वाटत राही. दादांकडे तशी मागणीदेखील केली जाई. ते सुद्धा “घेऊ” एवढंच म्हणत. नाही कधीच म्हणत नसत. असं करता करता एक दीड वर्ष गेलं. टेप काही आला नव्हताच. एक दिवस दुपारची सुट्टी संपवून दादा पुन्हा बँकेत चालले होते. घरातून निघताना मला म्हणाले,
“चल माझ्याबरोबर.”
“कुठे?” बँकेत जाताना मला का बरोबर चल म्हणतायेत असा प्रश्न मला पडलेला.
“तू चल रे.”
दादांच्या बँकेजवळ सह्याद्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचं एक दुकान होतं. अजूनही आहे. दादा मला तिथे घेऊन गेले. दुकानात गेल्यावर दुकानदाराचा मुलगा, बाबाला ते म्हणाले,
“चलो दे दो वह टेप.”
त्याने निमूटपणे मागे एका रॅकवर ठेवलेला बॉक्स आमच्या समोर ठेवला आणि उघडायला सुरुवात केली. त्यातून टेप बाहेर काढला. त्याची वायर वगैरे लावून त्यात एक कॅसेट टाकली आणि प्लेचं बटन दाबलं. गाणं सुरु झालं. कुठलं बटन दाबलं की काय होतं वगैरे त्याने समजावून सांगितलं. रेडिओ कसा लावायचा वगैरे सांगितलं. त्याचं प्रात्यक्षिक झाल्यावर दादा म्हणाले,
“कर दो पॅक.”
त्याने पॅक केलेला टेपचा बॉक्स माझ्या हातात ठेवत मला म्हणाले,
“हं, जा आता घरी घेऊन.”
एव्हाना हे काय चाललंय याचा विचार करत असलेला मी त्यांना म्हणालो,
“हा आपला आहे?”
“आपला नाही तर मग कोणाचा?” दादांनी उत्तर दिले.
मी खुशीने घरी आलो आणि माझ्या बहिणींना आमचा नवा टेप दाखवला. काय आनंद झाला होता आम्हा तिघांना.पण एक प्रॉब्लेम होता. टेपवर लावायला कॅसेट कुठे होत्या आमच्याकडे. संध्याकाळी येताना दादांनी एक कुठलीशी कॅसेट आणली. त्यावर गाणी ऐकत आम्ही जेवलो असू. पण नंतर बरेच दिवस हवी ती गाणी ऐकायला मिळत नव्हतीच. नाही म्हणायला रोज सकाळी रेडिओ चालत असे. सकाळी बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी बातम्या लागत असत.
“नमस्कार. हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत.”
हे वाक्य इतक्या वर्षानंतरसुद्धा ठळक आठवते. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनादेखील आठवत असेल. कधीमधी आई विविधभारती वर गाणी लावत असे. पण त्यावेळेस आम्ही नेमके शाळेत असू. म्हणजे आपल्याला हवी ती गाणी फक्त कॅसेट्स नसल्यामुळे ऐकायला मिळत नाहीत म्हणून सगळं अडून बसायचं.
अधूनमधून आम्ही दादांकडे तगादा लावायचो.
“दादा कॅसेट्स कधी घेणार?”
“घेऊ, घेऊ” ते एवढंच म्हणायचे.
नंतर एक दोन महिन्यांनी मग मला घेऊन दादा मुंबईला गेले. इकडे तिकडे कामं उरकली. संध्याकाळी आम्ही दोघं आणि अण्णा (माझा चुलता) एका कॅसेट्च्या दुकानात गेलो. कोणत्या कॅसेट्स घ्यायच्या हे दादांनी एका कागदावर लिहून आणलं होतं. त्या लिस्टमध्ये लता मंगेशकर अर्थात सगळ्यांत वरच्या नंबरवर होत्या. मी आपला माझ्या वयाला अनुसरून चित्रपटाच्या गाण्यांच्या कॅसेट्स घ्या असा हट्ट करत होतो. दादा फक्त “जरा थांब, जरा थांब” म्हणत मला थोपवून धरत होते.
लता मंगेशकर मराठी व हिंदी, किशोरदा, आशा भोसले यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स दादांनी घेतल्या. नंतर एक कॅसेट सुमन कल्याणपूरच्या गाण्यांची घेतली. एव्हाना माझा हट्ट वाढत चालला होता. तेव्हा बॉर्डर आणि येस बॉस हे चित्रपट आले होते. येस बॉस मधलं “मै कोई ऐसा गीत गाऊ” आणि बॉर्डरमधलं “संदेसे आते है” ही गाणी तेव्हा फिलिप्स टॉप टेनला वरच्या नंबरला होती.मी दादांना आपल्याला ह्या दोन्ही कॅसेट्स हव्यातच असा हट्ट धरला. दादा माझ्या बालसुलभ हट्टाकडे दुर्लक्ष करत बिलींग काउंटरवर गेले. अर्थात माझा हिरमोड झाला होता. त्या दुकानदाराने बहुधा ते ओळखले आणि दादांना म्हणाला,
“इतना सब कॅसेट्स लिया. एक कॅसेट बच्चे के लिये ले लो.”
ही मात्रा लागू पडली. आणि दादांनी मला चित्रपटांची नावे विचारली. मी नावे सांगताच त्याने त्या दोन कॅसेट्स पुढ्यात टाकल्या. प्रत्येकीची किंमत तेव्हा ४५ रुपये वगैरे होती. अर्थात महाग!! मग दादा म्हणाले,
“कोणती तरी एकच घे.”
मी विचारात पडलो. माझं वैचारिक द्वंद्व दुकानदाराने बरोबर ओळखलं आणि पुढ्यात एक कॅसेट टाकली आणि म्हणाला,
“ये लेकर जाओ. ए साईडको येस बॉस और बी साईडको बॉर्डर.” एका झटक्यात त्याने माझा प्रश्न सोडवला होता. मी खुशीत होतो. सगळी खरेदी घेऊन आम्ही घरी आलो. कधी एकदा जुन्नरला जातो आणि गाणी ऐकतो असं मला झालं होतं.
जुन्नरला आल्यावर मग रोज गाणी ऐकायची सवयच झाली. कोणती कॅसेट लावायची यावरून आम्हा तिघांत भांडण देखील होत असे. दादांची निवड किती “बाप”होती हे अर्थात आता लक्षात येत होतं. तोपर्यंत फारश्या माहित नसलेल्या गाण्यांच्या मी प्रेमात पडलो. दादांनी प्रत्येक कॅसेट अतिशय काळजीपूर्वक निवडली होती. कुठलीही कॅसेट लावली की अमुक एक गाणं आवडत नाही म्हणून फॉरवर्ड करा असा प्रकार कधी होतंच नसे.
जुन्नरला एका दुकानात रिकाम्या कॅसेटमध्ये गाणी भरून मिळत असत. मग दादांच्या नकळत एक दोन कॅसेट्स मी तशा भरून घेतल्या. दिल चाहता है वगैरे चित्रपटांची गाणी त्या कॅसेटमध्ये टाकल्याचं मला आठवतं. नंतर पुण्याला आल्यावर हॉस्टेलवर टेप वगैरे नव्हताच. इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी कॉम्पुटर घेतला. मग त्यावर गाणी ऐकायला सुरुवात झाली. तरी सुट्टीला जुन्नरला गेल्यावर टेप लागत असे. आईदादा तेव्हासुद्धा सकाळच्या बातम्या लावत असत. २००९ मध्ये मी अमेरिकेला जाईपर्यंत टेप व्यवस्थित चालू होता. नंतर कधी तरी त्याने जीव टाकायला सुरुवात केली. हळूहळू आईदादांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं.मागे एकदा जुन्नरला गेलो होतो तेव्हा येताना टेप घेऊन आलो. तो चालत नाहीच पण एक आठवण म्हणून असावा म्हणून आपला आणला. नंतर कधीतरी अँटिक म्हणून डिस्प्लेला ठेवता येईल!!