भारत सरकारचे हे नवरत्न इन्व्हेस्टर्ससाठी रत्न ठरणार का?

Will NMDC - A Navratna Company turn out to be good for investors?

NMDC म्हणजे National Mineral Development Corporation हा एक पीएसयू स्टॉक सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या पडझडीत हा स्टॉक ६१ रुपयांपर्यंत पडला होता.तिथून आजपर्यंत या स्टॉकने १००% हून अधिक परतावा दिला आहे. शुक्रवारी हा स्टॉक १३८ रुपयांवर बंद झाला. सध्या पीएसयू स्टॉक बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी पीएसयू बँकांनी चांगली रॅली दिली होती. त्यानंतर इतर पीएसयू स्टॉक्सनेही चांगली वाढ दिली. यातही NMDC चा उल्लेख यासाठी की या कंपनीचे प्रॉडक्ट हे आयर्न ओर म्हणजे लोखंड हे आहे. लोखंड, स्टील, साखर यांचा समावेश कमोडिटीमध्ये होतो. मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा कमोडिटी सायकल सुरू झाल्याची चर्चा आहे. असे म्हणतात की हे कमोडिटी सायकल सुरू झाले की ते काही वर्षे सुरू राहते. याआधीचं कमोडिटी सायकल २००१ ला सुरू झालं ते २००८ पर्यंत चाललं होतं. यामध्ये कमोडिटी इंडेक्स १४५ वरून ४७५ पर्यंत गेला होता.सध्या हा कमोडिटी इंडेक्स पुन्हा एकदा १८६ च्या दरम्यान आहे. जर गेल्यावेलीसारखा हा इंडेक्स पुन्हा एकदा तिप्पट झाला तर आजवरचा ऑल टाइम हाय टच करेल किंवा तो क्रॉसदेखील करेल. त्यामुळे अनेक विश्लेषक या कमोडिटी इंडेक्स बाबत पुढील काही वर्षांसाठी बुलिश आहेत.

 

NMDC चे प्रॉडक्ट हे याच कमोडिटीमध्ये येते. मग या कमोडिटी सायकलचा NMDC ला फायदा होईल का?
भारतात सध्या स्टीलची मागणी वाढती आहे. सरकारची येणाऱ्या काळातली धोरणे  इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणारी आहेत. तसेच नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू का होईना पूर्वपदावर येईल अशी चिन्हे  आहेत. या सगळ्याचा फायदा स्टील कंपन्यांना होतो आहे. स्टील बनवण्यात आयर्न ओर हे सगळ्यात महत्त्वाचा कच्चा माल म्हणून वापरले जाते आणि NMDC ही आयर्न ओरचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या विक्रीचे आकडे २०१६ पासून २०२० चा अपवाद वगळता सतत वाढते आहेत.याचबरोबर कंपनीच्या प्रॉडक्शनचे आकडेही वाढते आहेत. २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत २०१९-२० तिसऱ्या तिमाहीपेक्षा विक्रीत १०% तर प्रॉडक्शन मध्ये १२% वाढ आहे. याच काळात नफ्यामध्ये कंपनीने ५३% वाढ नोंदवली आहे. २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीचे आकडे आणि दुसऱ्या तिमाहीचे आकडे यांची तुलना केली तर विक्रीत ४१% आणि प्रॉडक्शन मध्ये ७०% वाढ झालेली आहे.नफा तब्बल १७३% वाढला आहे. याला काही प्रमाणात आयर्न ओरच्या आणि फाईन्सच्या वाढत्या किमतीही कारणीभूत आहेत. अर्थात नफा हा शेवटी नफाच असतो.

 

कंपनीने १ एप्रिल ला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षातील कामगिरी 
आयर्न ओर प्रॉडक्शन – ३४.११ मिलीयन टन्स – ८% वाढ
विक्रीतील वाढ – ६%
चौथ्या तिमाहीत प्रॉडक्शन आणि विक्री यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ३०% आणि २९% वाढ झाली.

 

कंपनीचे स्टेकहोल्डर्स –
कंपनीत ६८.२९% वाटा भारत सरकारचा असून एलआयसीकडे १३.४६% वाटा आहे.काही सरकारी बँका, म्युच्युअल फंड, इन्श्युरन्स कंपन्या यांच्याकडे छोट्या मोठ्या प्रमाणात कंपनीचा वाटा आहे. डी मार्टचे राधाकिशन दमानी यांच्याकडे ०.१२% वाटा आहे.
भारतातील चांगला डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यामध्ये NMDC चा समावेश होतो.

 

पुढे काय?
कंपनी व्यवस्थापन पुढील काळासाठी प्रॉडक्शन वाढवत नेण्याची योजना आखत आहे. २०२२ मध्ये ४२ मिलीयन टन्स, २०२३ पर्यंत ५० मिलीयन टन्स, २०२५ पर्यंत ६७ मिलीयन टन्स आणि २०३० पर्यंत १०० मिलीयन टन्स पर्यंत प्रॉडक्शन वाढविण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा इरादा आहे.

 

सहसा पीएसयू कंपन्या भविष्यातील वाटचालीबाबत एवढे काटेकोर नियोजन करत नाहीत. त्यामुळेच NMDC वेगळी ठरते. भविष्यात आपल्या उत्पादनाची मागणी वाढत जाणार हे कुठेतरी कंपनी व्यवस्थापनाला जाणवत असावे असे वाटते. असे का?

 

तर भारत सरकार २०३० पर्यंत ३०० मिलीयन टन स्टीलचे उत्पादन करण्याचे लक्ष्य साधण्याच्या प्रयत्नांत आहे. अजून एक गोष्ट कंपनीच्या पथ्यावर पडते आहे ती म्हणजे स्टील कंपन्यांचे उत्पादनाचे महत्त्वाकांक्षी नियोजन. आर्सेलर मित्तलने नुकताच ओरिसा सरकारबरोबर  स्टील प्लँट सुरू करण्यासाठी ५०,००० कोटींचा एमओयु साइन केला. जेएसडब्ल्यू स्टीलसुद्धा या राज्यात पुढील दहा वर्षांत जवळपास १ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे. स्टीलचे वाढते उत्पादन, भारत सरकारचे आत्मनिर्भर धोरण, इन्फ्रास्ट्रक्चरवर असलेला भर यामुळे स्टील सेक्टर पुढील काही वर्षांसाठी तेजीत राहू शकतो. यामुळेच आयर्न ओरचे प्रॉडक्शनदेखील वाढते राहणार. १ टन स्टील बनवायचे म्हटले तस्त साधारण १.६ टन आयर्न ओरची गरज लागते.

 

NMDC साठी रिस्क काय आहे?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपनीकडे एकच प्रॉडक्ट आहे. स्टीलची मागणी घटली की कंपनी गोत्यात येणार. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ९८% महसूल आयर्न ओर विक्रीतून येतो. ही थोडीशी काळजीची बाब आहे.

 

दुसरे म्हणजे भारतात वाढत चाललेला स्क्रॅप स्टीलचा वापर. या स्क्रॅप स्टीलचा वापर करून स्टील बनवणे हा प्रकार अजून फारसा डेव्हलप झालेला नाही. मात्र २०३० साठीचे लक्ष्य गाठायचे म्हटले तर स्क्रॅप स्टीलपासून स्टील बनविण्याचे मार्केट वाढीस लागू शकते.  पण या स्क्रॅप स्टील बाबत सरकारी पातळीवर अजूनही कोणते ठोस धोरण असे नाही. जे आहे त्यात इन्सेन्टिव्ह नाही म्हणून काही बडे खेळाडू त्यावर सतत आक्षेप घेताना दिसतात. दुसरे म्हणजे कितीही म्हटलं तरी स्क्रॅप स्टीलचे मार्केट अजून बऱ्यापैकी अनऑर्गनाईझड आहे. हे डेव्हलप होण्यासाठी अजून काही वर्षे निश्चित जावी लागतील. आपण असे धरले की २०३० पर्यंत भारतातील ३५% स्टील हे स्क्रॅप स्टीलपासून बनवले तरी उरलेल्या ६५-७०% साठी आयर्न ओरवर विसंबून रहावे लागणार आहे. NMDC च्या आयर्न ओर प्रॉडक्शन वाढीचे नियोजित आकडेवर जाऊन पुन्हा एकदा पाहिलेत तर ते इथे बरोबर जुळताना दिसतील.

 

NMDC साठी संधी काय आहे?
कंपनी आपल्या बिझनेसचे डायव्हर्सिफिकेशन करत आहे. कंपनी आता कोल मायनिंग क्षेत्रात उतरते आहे. नुकतीच कंपनीने झारखंडमध्ये कोल मायनिंगमध्ये ५००० कोटींची गुंतवणूक केली आहे.

 

ऑस्ट्रेलियातील लिस्टेड कंपनी लेगसी आयर्न ओर लिमिटेड मध्ये कंपनीची ९२.३% मालकी आहे.

 

ईव्ही वाहन बाजारपेठेत भविष्यकाळात तेजी येऊ शकते याचा विचार करून  NMDC बॅटरी क्षेत्रात प्रवेश करू शकते. या वाहनांना लागणाऱ्या बॅटरीज बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविण्यासाठी कंपनी पुढे येऊ शकते. यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि कझाकस्तानचे भारतातील राजदूत यांच्यात नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. कझाकस्तान हा देश कॉपर, युरेनियम, मँगनीज, लीड, झिंक आणि आयर्नच्या उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे बॅटरी क्षेत्रातील व्यवसायासाठी कंपनीला याचा फायदा होऊ शकतो.

 

कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत. शेअरने गेल्या काही महिन्यांत चांगला परतावा दिला आहे. अनेक विश्लेषक या शेअरबाबत बुलिश आहेत. शेअर जर पडला तर ती संधी आहे असे मानून यामध्ये मोठे इन्व्हेस्टर्स एन्ट्री घेतात का? याची उत्सुकता असेल. बाकी पीएसयू स्टॉक फारसे चांगले रिटर्न्स देत नाहीत असा एक सर्वसाधारण समज आहे. तो समज NMDC ने गेल्या एक वर्षभरात मोडीत काढला आहे. अर्थात २०१३ पासून हा स्टॉक कन्सॉलिडेट होतो आहे.

 

नुकतेच सुरू झालेले कमोडिटी सायकल, स्टीलची वाढती मागणी, स्ट्रॉंग फंडामेंटल्स या सगळ्यांच्या जोरावर हा शेअर अजून वर जाणार का हे येणाऱ्या काळात समजेलच. गुंतवणूक करावी की नाही हा निर्णय ज्याने त्याने ज्याचा त्याचा घ्यायचा आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.