मधुचा उपास

“कॉलेजला असताना जसे बिकट प्रसंग आले तशाच काही गमती देखील घडल्या. वाघ काकांची एक गम्मत तुला सांगतो”, म्हणून दादा बोलू लागले. 

“मी नुकताच घरून जाऊन आलो होतो. मंचरला येताना बाबांनी मला डालड्याच्या रिकाम्या डब्यात एक किलो साखर भरून दिली होती. मुळात एवढी साखर कोण खाणार, एवढ्या साखरेचं करायचं काय हाही प्रश्नच होता. नेमकी त्याचवेळेस गोकुळाष्टमी आली. मधु महानुभाव पंथाचा असल्याने त्याने उपास धरला. आम्ही त्याला समजवायचा प्रयत्न केला, “अरे मधू आपल्याकडं उपासाचं खायला काही नाही. उपास धरू नको.”
पण मधू पडला कट्टर. त्याने आमचं न ऐकता उपास धरला. दिवस जसजसा वर येत राहिला तशी भूक मधुचं आतडं कुरतडत राहिली. त्याला काही सुचानां. खायला तर काही नाही, काय करावं?
तितक्यात भिवसेन त्याला म्हणाला, “बाळू, गोपाकडं साखर आहे बुआ. साखर खातो का? उपासाला चालती साखर.” (भिवसेन कधीकधी मधूला प्रेमाने बाळू म्हणत असे.)
ते ऐकून मधू मला म्हणाला, “ए गोपा, दे रे तो डबा.”
मी त्याला डबा दिला आणि मधुनी साखर खायला सुरुवात केली. आता साखर खाऊन काही पोट भरणार नाही हेही आमच्या लक्षात आलं नाही. मधू जे सुटला तो एकदम डबा रिकामा करूनच थांबला. पण भूक काही शमली नाही.
आज आम्हाला हसू येतं. पण त्या वेळेला आम्हीसुद्धा काळजीने त्याला विचारलं, “मधू आता मस्त झालं ना काम?”
मधू म्हणाला, “नाय रे. कसलं काय. भूक नाहीच गेली.”
अशी ही मधुच्या उपासाची गोष्ट आम्हाला कायम सोबतीला राहिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.