जुन्नरचा कुल्फीवाला..

कुल्फीए!!! खवेवालीए!!!!!

एक रुपया, दोन रुपये!!! कुल्फीए!!!!

एका विशिष्ट ठसक्यात आणि लयीत हा कुल्फीवाला जुन्नरच्या पेठांमधूनत फिरायचा..

बाहेरचं खाणं चांगलं नाही असं लहानपणापासूनच अंगी बाणवलेलं असल्याने कुल्फी खाण्याची वेळ फारदा आली नाही..पण एखाद्या दिवशी कुल्फीवाला घरासमोरून चालला की इच्छा होत असे..मग मी आईकडे हट्ट करे.. आई सहसा माझ्याकडे दुर्लक्ष करीत असे..पण माझी आत्या जर घरी असेल तर मात्र मला थोडीफार संधी मिळत असे..आत्याला थोडा मस्का मारला की ती,

“घे गं सुरेखा.. कुठं आपण रोज रोज घेतो कुल्फी.” असे म्हणून आईला भरीस पाडत असे..

संधी साधून आत्या मला सांगे,

“जा बाब्या आपल्याला तिघांना कुल्फी घेऊन ये.”

मी कुल्फी आणेपर्यंत मग आत्याने पैसे काढून ठेवलेले असत..

माझ्या लहानपणापासून ते अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत जुन्नरला एक दोनच आईस्क्रीमवाले/कुल्फीवाले होते..वर उल्लेख केलेल्या कुल्फीवाल्याकडे  खवाकुल्फी मिळत असे..लोखंडी किंवा  ऍल्युमिनिअमच्या साच्यांमध्ये कुल्फीचे द्रव स्वरूपात असलेले मिश्रण टाकून तो साचा बर्फात ठेवायचा..आणि थोड्या वेळाने त्याची कुल्फी तयार होत असे..एक रुपया आणि दोन रुपये असे दोन दर असत.
नेहरुबाजारातून शंकरपुरा पेठेमार्गे लवाटे हॉस्पिटलच्या बाजूने हा कुल्फीवाला कल्याण पेठेत येई..त्याची ती सवयीची आरोळी डहाळ्यांच्या घरापासूनच ऐकू येई..

वर पत्र्याचे छप्पर असलेली हातगाडी, तिच्या मधोमध कुल्फीच्या साच्यांचे मोठे लाकडी खोके, त्याच्या बाजूला एका स्टीलच्या डब्यात कुल्फीचे द्रवरूपी मिश्रण,एका छोट्या डब्यामध्ये रिकामे साचे विसळण्यासाठी स्वछ पाणी, कुल्फीसाठी लागणाऱ्या बांबूच्या तासलेल्या काड्या आणि एका छोटया पेटीत गल्ला असा सगळा त्याचा सरंजाम असे..तो हातगाडीसुद्धा स्वछ ठेवत असे..साधा सदरा,पँट आणि डोक्यावर क्वचित मुसलमान लोक घालतात तशी टोपी असा त्याचा वेष असे..पायात सहसा स्लिपरच असे…

आमच्या घरासमोरून गेल्यावर हळूहळू तो आवटे शाळेपर्यंत जाई.. शाळा सुटायची वेळ त्याला अर्थातच माहीत असे..शाळा सुटली की त्या दिवसाचा बऱ्यापैकी गल्ला करून बहूधा घरी जात असावा..कुल्फीचासुद्धा सिझन असे..सिझन नसेल तेव्हा तो सहसा जुन्नरमध्ये न मिळणारी फणस,पेर असली फळे विके..बऱ्याचदा तो ही फळे घेऊन रविवारच्या बाजारात देखील बसे..

पण त्याची कुल्फी विकताना ओरडण्याची पद्धत फळे विकताना येत नसे..ती विशिष्ट आरोळी, विशिष्ट हेल आजही आठवतो..

आज कामानिमित्त वारजे परिसरात जाण्याचा योग आला तेव्हा असाच एक कुल्फीवाला दिसला आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..तुमच्याही लहानपणी असाच एखादा कुल्फीवाला होता का???

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.