जुन्नरची होळी

आज होळीचं नियोजन करायला म्हणून आमच्या सोसायटीमध्ये सकाळपासून लगबग सुरु होती. सोसायटीचा सभासद या नात्याने मीही गेलोच होतो. तेव्हा मग सगळ्यांनी आपापल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

“आदित्य आज संध्याकाळी होळीला येणार ना?”

घराशेजारच्या विष्णूच्या मंदिरातला संतोष विचारत असे. जुन्नरला असताना दरवर्षी विष्णूच्या मंदिरात अण्णा होळी पेटवत असत. त्या होळीला नैवेद्य दाखवायला आई मलाच पाठवत असे. तिथे मग बोऱ्हाड्यांचा भाऊ, क्षीरसागरांचे विकी आणि मन्या, मिसाळांचा सागर असे बरेच जण येत असत. अण्णा आणि संतोष संध्याकाळपासून मेहनत करून होळी तयार करत असत. आम्हा सगळ्यांना हे नैवेद्य वगैरे निमित्तमात्र असे. खरी मजा होळीभोवती बोंबा मारत फिरण्यात येई. कितीतरी वेळ आम्ही बोंबा मारत होळीभोवती फिरत असू. शेवटी अण्णा ओरडत आम्हाला, “अरे बास आता. किती आरडाओरडा करताय.” अण्णांच्या त्या ओरड्यानंतर आम्ही पळ काढत असू. कधीकधी डहाळ्यांचा लालू आणि रितू त्यांच्या घरासमोरच्या तिठ्यावर होळी करत असत. विष्णू मंदिरातली होळी संपवून आम्ही तिकडे पळत असू. तिथे पुन्हा तोच आरडाओरडा करायला मजा येई. बऱ्याचदा मग होळी संपवून घरी जाण्याऐवजी आमचा तिथेच लपंडाव रंगे. इतक्या रात्री लपंडाव खेळण्यात वेगळीच मजा होती. कोणाची तरी आई किंवा वडील येऊन त्याला हाताला धरून नेईपर्यंत डाव चालत असे.
परदेशपुऱ्याची होळी हे एक अजब प्रकरण होतं. तिथले लोक पिंपळाजवळ एका सुकलेल्या झाडाचे दांडगे खोड उभे करत. ती होळी पहायला वेगळीच मजा असे. पुढचे एक दोन दिवस ते खोड तसेच जळत राही.
होळीनंतर मग वेध लागत ते रंगपंचमीचे. जुन्नरला धूलिवंदनाला रंग फारसं कोणी खेळत नसे. शाळांनाही रंगपंचमीची सुट्टी असे. त्या दिवशी मग सकाळीच लवकर उठून मी दिवसभराचा अभ्यास उरकून घेत असे. साधारण ११ च्या आसपास बाहेर पोरांचा आवाज यायला लागला की आईने आधीच काढून ठेवलेले जुने कपडे घालून बाहेर पडत असे. कोणाकडे कोणता रंग आहे, कोणता रंग चांगला आहे अशा चौकश्या करून रंग विकत घ्यायला मी सुभाष जनरल स्टोअरकडे जात असे. त्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही रंग खेळत असू.  डहाळ्यांचा लालू घरासमोर पाण्याचं एक पिंपच भरून ठेवत असे. एकमेकांना रंग लावून आम्ही त्या पिंपाभोवती घोळका करून मस्ती करत असू. ते करत असताना कोणी जाताना येताना दिसला की त्याला धरून रंग लावायचा आणि त्या पिंपात बुचकळून काढायचं हे असले उद्योग आम्ही करत असू. चुकून एखाद्याने हुलकावणी दिलीच तर त्याच्यावर पाण्याच्या फुग्यांचा मारा होत असे. आमच्यातले काहीजण रंग खेळायला येत नसत. ते चुकून आम्हाला कुठे दिसले तर त्यांची मात्र धडगत नसे. काहीजणांना तर आम्ही त्यांच्या घरात जाऊन रंग लावत असू. जसं वय वाढत गेलं तसं रंग खेळण्याचं प्रमाण कमी होत गेलं. पण तरी एखाद दोन तास तर नक्कीच जात असत.
रंग खेळून घरी आलं की आईच्या शिव्या खात आंघोळ करावी लागे. इतका वेळ गार पाण्यात खेळून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायला काय सुख असे. बऱ्याचदा तर ही सफाई झाल्यानंतर सुद्धा एखादा मित्र रंग लावायला घरी येई. मग मी आत्ताच आंघोळ केली आहे असं सांगून थोडक्यात सुटका करून घेतली जाई.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर कोण किती खेळलं, कोणी किती फुगे फोडले, कोणाला फुगा लागून दुखापत झाली, कोणाचा रंग अजूनही हाताला आहे अशा चर्चा पुढचे दोन दिवस चालत असत. काही शिक्षक रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना पुढे बोलावून हाताला, पायाला, मानेला, कानाला कुठे रंग आहे का हे तपासून पाहत. जो कोणी सापडेल त्याला छड्या खाव्या लागत. या शिक्षक लोकांना रंग खेळायला मिळत नाही म्हणून त्याचा राग ते आपल्यावर काढतात की काय अशी शंका आमच्या बालमनात तेव्हा येई.
पुण्यात गेल्यावरसुद्धा एखाद्या वर्षी रंग खेळल्याचे मला आठवते. रंग खेळून वैशालीमध्ये डोसे खाल्ले होते आम्ही. अमेरिकेत गेल्यानंतर इंडियन स्टुडंट असोशिएशनने आयोजित होळीच्या कार्यक्रमाला मी जात असे. पण रंग मात्र खेळल्याचे आठवत नाही.
आज होळी तर साजरी करतोय पण रंगपंचमीला रंग खेळावेत की नाही हा गोंधळ अजूनही मनात आहेच.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.