वाचाल तर वाचाल

 

“अजाब तसा चांगल्या घरचा होता. दर रविवारी त्याचा भाऊ त्याच्यासाठी एक तांब्या भरून तूप घेऊन यायचा. गावात नेऊन त्याला रवा घेऊन द्यायचा आणि अजाब रोज शिरा करून खायचा. शिवाय त्याला घरून रोज डबासुद्धा यायचा. तो आमच्याकडं पाठ करून जेवायचा. आम्हाला जेवायला रोज एकच मेनू. पिठलं आणि भाकरी. अर्थात आपल्याला शिरा खायला मिळत नाही याचं आम्हाला कधी वाईट वाटलं नाही. पण त्याची जी वृत्ती होती त्याचा आम्हाला संताप येत असे. बरं तोसुद्धा गप्प बसत नसे. येताजाता काहीतरी टोमणा मारत असे.”

गेले काही दिवस कसल्या ना कसल्या कारणाने लिहायला जमले नाही. बऱ्याच जणांनी पुढचा लेख कधी येणार अशी चौकशी केली. उशीर झाल्याबद्दल माफी. 

आज पुन्हा एकदा दादांबरोबर गप्पा मारायला बसलो. नेहमीप्रमाणे दादा बोलू लागले.
“मंचरला त्या काळी पाणी टंचाई असे. हॉटेलवाले, व्यापारी वगैरे पाणी विकत घ्यायचे. एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांच्याकडे ठरल्याप्रमाणे हांडे आणून टाकायचे आणि त्याच्या मोबदल्यात व्यापारी त्यांना पैसे देत. आमच्याकडं प्रश्न मोठा होता. घरच्यांनी शिकायला तर पाठवलं पण पैशाची चैन कधीच नव्हती. पाणी ही बाब तर निकडीची. बर घरात नळ वगैरे असले प्रकार तोपर्यंत शोधले जायचे होते. आमच्या खोलीमध्ये पाणी हा विषय नाजूक होता. खाली टँकर आला की मडकं घेऊन खाली जायचं आणि ते भरून घेऊन परत वर यायचं असा आमचा कार्यक्रम असे. एक दिवस मी मडकं भरायला गेलो. वरच्या काठाला धरून टँकर खाली लावलं. पाण्याच्या जोराने वरचा काठ माझ्या हातातच राहिला आणि खालचा भाग खाली गाळून पडला. मडकं पण गेलं आणि ते भरण्यासाठी दिलेले १० पैसे सुद्धा गेले. आता करायचं काय हा प्रश्न आमच्यापुढे आला. मग कोणाकडून तरी पैसे उसने घेऊन नवीन मडकं आणलं आणि आमचा संसार पुन्हा सुरु झाला.
आज याचं फारसं कौतुक वाटत नाही. पण मुळात १० पैशाला एक हंडा पाणी हेच आम्हाला खूप महाग वाटे. मग हा १० पैशाचा खर्च काहीतरी करून कमी केला पाहिजे असं आम्ही ठरवलं. घरापासून एक दीड किलोमीटरवर एक विहीर होती. तिथे आम्ही सगळे आंघोळीला जात असू. मग आंघोळ झाली की घरी येताना बादली भरून घेऊन यायची. जड झालं की दुसऱ्याच्या हातात द्यायची. त्यामुळे पाणी जवळजवळ फुकट आल्यासारखं झालं.
पण थोड्याच दिवसात एक नवी डोकेदुखी सुरु झाली. पाणी घेऊन आलं की आमचाच एक रूममेट रोज त्यासाठी टपून बसलेला असायचा. बबन अजाब त्याचं नाव. तो सुद्धा आंघोळीला विहिरीवर जायचा. पण येताना फक्त एक तांब्या भरून घेऊन यायचा. आणि तो संपला की आम्ही भरून आणलेल्या हंड्यातून पाणी घ्यायचा. त्याला हटकलं की, “मला काय आपला एक तांब्या. एका तांब्याने तुम्हाला काय फरक पडतो.” असं म्हणून हसायचा. आमचा संताप व्हायचा पण त्याला बोलणार कोण हाही प्रश्न होताच. उगाच वाद नको असा दृष्टीकोन असणारे आम्ही लोक. आम्ही दुर्लक्ष केलं.
एक दिवस दुपारी मी असाच पडलो होतो. भिवसेन (दादांचे अतिशय जवळचे मित्र. यांना आम्ही लोखंडे मामा म्हणतो.) आणि मधूची (वाघकाका – हे नंतर याच मंचर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.) नेहमीप्रमाणे अजाब बरोबर काहीतरी वादावादी चालू होती. तो त्यांना डिवचत होता. तुमचं काय कॉमर्सच? डेबिट, क्रेडिट बावळटसारखं. या दोघांना काही नीट बोलता येईना. कॉमर्सची बाजू मांडता येईना. यांची अशी अवस्था पाहून त्याला अजून चेव येई.
तो विचारी, ” सांगा बरं शिवाजीचा जन्म कुठं झाला?”
हे म्हणत, “शिवनेरी.”
मग तो म्हणे, “ह्या ते तर काय कोणीही सांगतंय. मला सांगा नेपोलियनला कोणत्या बेटावर कैदेत ठेवलं होतं?”
ह्या दोघांची डोकी फिरली. ते पाहून तो हसायचा, हातवारे करायचा.
“वाघ, बोल की. हाये का तुमच्याकडं काही?”
मी पडलेला पाहून भिवसेनने मला उठवलं, “ए उठ. हा बब्या काय म्हणतो बघ.” कारण त्याला बबन अशी हाक मारावी असं आम्हाला कधी वाटलंच नाही.
मी उठून विचारलं, “हं काय?”
भिवसेन म्हणाला, “अरे त्या नेपोलियनला कुठल्या बेटावर कैदेत ठेवला होता?”
योगायोगाने मी नुकतंच नेपोलियनचं पुस्तक वाचलं होतं. मी लगेच म्हटलं, “सेंट हेलेना.” अजाबकडे पाहिलं तर त्याच्या पापण्या पडलेल्या. माझं उत्तर ऐकून भिवसेनला चेव चढला. माझ्या पाठीवर थाप मारून भिवसेन म्हणाला, “अरे माझ्या वाघा. बब्या बोल तुझं काय म्हणणंय.”
माझ्या पाठीवर आनंदाने अजून एक थाप मारून भिवसेन म्हणाला, ” हे रे वाघ. च्यायला याला गप्प केला तू.”
या प्रसंगानंतर मात्र आमचा आत्मविश्वास वाढला. अजाबच्या अरेला आम्ही कारे म्हणू लागलो. ती एक सवय होऊन गेली.
प्रसंग तसा छोटा पण केवळ वाचनाने मला हात दिला. आणि त्यामुळे एक प्रश्न कायमचा मिटला. वाचत रहा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो ते याच कारणासाठी. “

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.