गुंड्याभाऊ

मान्सूनपूर्व पाऊस, त्यावेळी सुटणारा सोसाट्याचा वारा म्हणजे वीज वितरण बोर्डासाठी जणू इंग्लंड,ऑस्ट्रेलिया दौऱ्यासारखं आहे. तोपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. भारतातल्या पाटा खेळपट्ट्यांवर फलदांज पोत्याने धावा काढतात तसं काहीतरी. मग हा पाऊस सुरु झाला की जणू वीज वितरण बोर्डाचा परदेश दौरा सुरु होतो. जरा कुठे सोसाट्याचा वारा आला, ढग गडगडू लागले की वीज बोर्ड चेंडू स्विंग होणाऱ्या, उसळणाऱ्या खेळपट्टीवर खेळायची सवय नसल्याने जसे फलंदाज लवकर बाद होतात तसे लाईट घालवू लागतात.लोकांचे तक्रारीचे फोन, आपल्या प्रभागात लाईट नाही म्हणून नगरसेवकांनी केलेले फोन घेता घेता साहेब लोकांची पँट ढिली होऊन जाते. काय होतंय हे कळेपर्यंत त्यांनी पहिला सामना गमावलेला असतो. अर्थात या पराभवातून सावरून मग दौऱ्यावरच्या पुढच्या २-३ सामन्यांत (खरं तर पावसात) कामगिरी सुधारत जाते. एखाद्या सामन्यात विजयही मिळतो म्हणजे पाऊस सुरु असलेल्या संपूर्ण काळात एकदाही लाईट जात नाही. बदलेल्या वातावरणाची सवय होईपर्यंत दौरा संपलेला असतो आणि पुन्हा एकदा पाटा खेळपट्टी समोर आलेली असते.वीज बोर्ड पुन्हा धावा काढू लागलेलं असतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.