मॅरेथॉन पूर्ण करायला घेतली ५४ वर्षे

शिझो कानाकुरी हा एक जपानी रनर होता. त्याला जपानमध्ये ‘फादर ऑफ मॅरेथॉन’ म्हटले जाते. मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या सर्वात जास्त वेळेचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

 

१९१२ साली स्टॉकहोमला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेत शिझो आणि आणखी एक जपानी खेळाडू सहभागी झाले होते. त्यावर्षी स्टॉकहोममध्ये उष्णतेची लाट आली होती. तरीही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. शिझोने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जपान ते स्टॉकहोम हा प्रवास बोटीने आणि रेल्वेने केला होता. या १८ दिवसांच्या प्रवासाने तो थकून गेला होता. त्यात भर म्हणून त्याला स्टॉकहोममध्ये मिळणारे जेवण जमले नाही. अशी परिस्थिती असूनही त्याने २६ मैलाच्या या रेसमध्ये भाग घेतला.

 

रेस सुरु झाली. त्या दिवशी उन्हाचा तडाखा जोरात होता. साधारण १६ मैल अंतर पळाल्यानंतर शिझो थकला. अशातच रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घराजवळ तो थांबला आणि त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्या कुटुंबाने त्याला ज्यूस, काही फळे दिली. शिझो तिथेच झोपला आणि थेट दुसऱ्या दिवशी उठला. आता रेस तर होऊन गेली. आपण हे काय करून बसलो? असा विचार करणाऱ्या शिझोला स्वतःचीच लाज वाटली. तो कोणालाही न सांगता तसाच जपानला परतला.

 

इकडे शिझो कुठे गायब झाला? म्हणून स्पर्धेचे आयोजक चिंतेत पडले. त्यांनी बराच शोध घेऊनही शिझोचा कुठेही पत्ता लागला नाही. ऑलिम्पिक संपूनही गेले. अखेरीस स्वीडनने शिझोला त्यांच्या ‘हरवले आहेत’ यादीमध्ये टाकले. या रेसमध्ये सहभागी झालेल्या ६८ जणांपैकी फक्त ३४ जणांनी रेस पूर्ण केली. उन्हाच्या त्रासाने रेस सोडावी लागलेल्या एका पोर्तुगीज रनरचा दुसऱ्या दिवशी मृत्यूही झाला. ऑलिम्पिक स्पर्धेत एखादा खेळाडू मरण पावण्याची ही पहिलीच घटना होती.

 

पुढे १९१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा महायुद्धामुळे होऊ शकल्या नाहीत. अँटवर्प येथे १९२० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शिझोने भाग घेतला. त्यांनतर १९२४ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्येही शिझोने भाग घेतला. मात्र इथेही तो रेस पूर्ण करू शकला नाही.

 

पुढे जाऊन जवळपास ५० वर्षांनी एका स्वीडिश पत्रकाराला शिझोचा शोध लागला. तेव्हा शिझो जपानमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. १९६७ मध्ये स्वीडिश टेलिव्हिजनने शिझोला त्याची अपूर्ण राहिलेली मॅरेथॉन पूर्ण करण्याची संधी दिली. शिझोनेही ही संधी स्वीकारली. २० मार्च १९६७ या दिवशी शिझोने आपली अपूर्ण मॅरेथॉन पूर्ण केली. त्याचा मॅरेथॉनचा ऑफिशियल फिनिश टाइम होता ५४ वर्षे ६ दिवस ५ तास ३२ मिनिट २०.३ सेकंद. या दरम्यान शिझोचे लग्न होऊन त्याला ६ मुले झाली. त्यांची लग्ने होऊन शिझोला १० नातवंडेदेखील झाली. १३ नोव्हेंबर १९८३ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी शिझोचा जपानमध्ये मृत्यू झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.