गोल्ड पार्टनर

“अरे तुम्ही तर गोल्ड पार्टनर आहात. याचा अर्थ तुम्हाला उबर ने काहीतरी अवॉर्ड वगैरे दिलेलं असलं पाहिजे.” 

एअरपोर्टवरून घरी यायला कॅबमध्ये बसताच मी ड्रायव्हर बरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. कामानिमित्त बऱ्याचदा पुण्याबाहेर जावं लागतं. त्यानिमित्ताने कॅबने एअरपोर्टला जाणे येणे होते. उगाच अर्धा पाऊण तास गप्प बसण्यापेक्षा किंवा मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा ड्रायव्हर बरोबर गप्पा मारायचा छंद जडलाय मला.
“हो सर. २०१६ मध्ये मी ३५०० हुन जास्त ट्रिप्स पूर्ण केल्या. आणि माझ्या नशिबाने कस्टमर लोकांनी मला रेटिंग सुद्धा चांगलं दिलं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळालं.” ड्रायव्हरने मला माहिती दिली.
माझी उत्सुकता वाढली आणि मी नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर गप्पा मारू लागलो.
“एवढ्या ट्रिप्स पूर्ण कशा केल्या पण तुम्ही? मी तर ऐकलं की बऱ्याचदा चार चार तास एकसुद्धा ट्रिप मिळत नाही.”
” सर मी  माझ्या कस्टमरला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो.”
“म्हणजे नक्की काय करता तुम्ही?”
“मी कधीच कस्टमरला कुठे जायचंय हा प्रश्न विचारत नाही. कितीही उशीर झालेला असू देत, मला माझ्या घराच्या उलट दिशेला जावं लागलं तरी मी कुठलीही तक्रार न करता ट्रिप पूर्ण करतो. तुम्ही लोकसुद्धा लांबून आलेले असता, लवकर घरी जावं असं तुम्हालाही वाटत असतं. अशा वेळेस केवळ मला त्या दिशेला जायचं नाही म्हणून ट्रिप नाकारणं माझ्या स्वभावात बसत नाही. ह्या गाडीवर माझं कुटुंब चालतं. मग मीच जर धंद्याला नाही म्हटलं तर तो धंद्याचा अपमान नाही का?”
त्याचे स्पष्ट विचार ऐकून मी अवाक झालो.
“पण हल्ली उबर ओलाने ड्रायव्हर लोकांचे इन्सेंटीव्ह कमी केलेत म्हणे. तरीसुद्धा तुम्हाला परवडत का हो?” मी अजून एक प्रश्न त्याच्यावर फेकला.
“सर न परवडून सांगणार कोणाला. गाडी बंद केली तर खाणार काय? आम्हीसुद्धा दोन दिवस संप केला होता. पण उबरवाल्यांनी भिकसुद्धा घातली नाही. गाड्यासुद्धा इतक्या झाल्यात आता पुण्यात. पाच पन्नास जणांनी संप केल्याने त्यांना काय फरक पडणार असा. आम्ही आपले परत ड्युटीवर आलो.”
“मग महिन्याला कितपत शिल्लक राहते हातात?”
“सर डिझेल, गाडीचा इन्शुरन्स, महिन्याचा मेंटेनन्स वजा केला तर १८ ते २० हजार हातात पडतात.त्यातून साडेपाच हजार घरभाडं जातं. उरलेल्या पैशात घर चालवतो मी.”
“घरी कोण असतं?”
“बायको आहे सर आणि तीन वर्षाचा मुलगा आहे.”
“अरे वाह.”
“मला शिकायला जमलं नाही सर. शाळेत माझं काही डोकं चालायचं नाही. त्यामुळे मी गाडी चालवायला सुरुवात केली.”
“पुण्यात किती वर्षं झाली?”
“बारा वर्षं झाली सर. सहा वर्षं मी टाटा मोटर्सला काढली. नंतर चार वर्ष पुण्यातल्या एका बिल्डरकडे ड्रायव्हर म्हणून काम केलं. पण तिथे पगार फारसा वाढत नव्हता म्हणून मग स्वतःची गाडी घेतली.”
“हे बरं केलंत.”
“मग काय सर. आता मी मला पाहिजे तेव्हा गाडी चालवतो. पाहिजे तेव्हा आराम करतो. उबरच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. इतक्या ट्रिप्स केल्या की इतका इन्सेंटिव्ह, वीकएंडला इतक्या केला की इतका. माझ्या आठवड्याच्या ट्रिप्स शुक्रवारी सकाळी पूर्ण झाल्या तर मी सरळ डिव्हाईस बंद करतो आणि घरी जातो. घरी बायको आणि मुलाबरोबर वेळ घालवतो. काही खरेदी असेल तर तिघेजण डी मार्टला जाऊन खरेदी करतो. जमल्यास एखादा चित्रपट पाहतो किंवा हॉटेलला जेवायला जातो.”
“वा !!”
“आठवडाभर मी गाडी चालवतो सर. मग एखादा दिवस बायको आणि मुलासाठी दिला पाहिजे ना.”
“बरोबर आहे.”
“मग ट्रिप्सचा कोटा पूर्ण झाल्यावर अजून ट्रिप्स का नाही करत?”
“अजून ट्रिप्स करून करणार काय सर? महिन्याला दोन किंवा तीन हजार रुपये जास्त मिळणार. काय करायचं पैसे कमावून? माझ्या मुलाला त्याचा बाप एक पूर्ण दिवस तरी भेटला पाहिजे. नाहीतर पैशाचा उपयोग काय. त्याच्यासाठी तर करतोय मी सगळं.”
“खरंय तुमचं.” असं म्हणून मी गप्प झालो. थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुन्हा मी त्याला विचारलं,
“स्वतःच घर का नाही घेत?”
“पैसे साठवायला सुरुवात केली आहे सर. माझी बायको बी.ए. बी. एड. आहे. आता तिला एखाद्या ठिकाणी छोटी मोठी नोकरी मिळाली की थोडं बरं होईल. दोघं मिळून मेहनत करू. नशीब जोरावर असेल तर होऊन जाईल घरसुद्धा.”
“होणार होणार नक्की होणार. इतके कष्ट केल्यावर घर का नाही होणार.”
“तुमच्यासारख्या लोकांच्या शुभेच्छा असल्या की बरं वाटतं सर.”
एव्हाना घर आलं होतं. गाडीतून उतरताना मी शंभर रुपयांची एक नोट पुढे करत त्याला म्हटलं,
“खूप ड्रायव्हर भेटतात मला. पण तुमच्यासारखे स्पष्ट विचार असणारे, कष्टाळू कमीच असतात. हे पैसे तुमच्या मुलासाठी असू द्यात.”
“अहो सर पैशाचं काय एव्हढं. असू द्यात.”
“तुम्हाला नाहीच देत मी. पण तुमच्या मुलासाठी ठेवा. परत कधी भेटलोच अजून गप्पा मारू.”
लिफ्टमध्ये शिरताच हा माणूस आपल्याला किती फंडे शिकवून गेला या विचारात मी गुंतून गेलो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.