गणपती आणि मी

गणपतीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी वाटते..एरवी कधी मंदिरात न जाणारा मी गणपतीच्या दिवसात मात्र का कोण जाणे सगळं मनोभावे करतो..
जुन्नरला आमच्या घरी गणपती नसायचा..पण टेमगिरे आत्याच्या (माझी आत्या) घरी असायचा..तो जणू काही माझ्याच घरचा गणपती आहे असं मला वाटत असे,अजूनही वाटते..अगदी गणपती मूर्ती बूक करण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी त्यात सहभागी असे.. रविदादा आणि मी दोघंही उत्साहाने सगळं करत असू..मला आठवतं त्याप्रमाणे बऱ्याचदा गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी आत्याच्या घरी पौरोहित्य मीच करत असे.. रोज सकाळ संध्याकाळची आरती न चुकता करत असे..ते दहा दिवस उत्साहाचे असत…
नंतर नोकरी निमित्ताने रविदादा पुणे, मुंबईला असायचा..कधी त्याला रजा नाही मिळाली तर आत्या माझ्याकडूनच गणपती बसवून घ्यायची..सगळं काही मी आणि नाना करायचो..माझ्या घरी गणपती नसताना अशा रीतीने का होईना गणपती बाप्पा माझ्याकडून सेवा करून घ्यायचा..हा योगायोग म्हणायचा का??
एका वर्षी माझा मित्र आदित्यच्या घरी गणपती विसर्जनाला तो नव्हता..त्याच्या बाबांचे कसलेसे ऑपरेशन झाले होते..त्याने मला पुण्याहून फोन करून सांगितले,
“बाबांबरोबर जाऊन आमच्या घरच्या गणपतीचे विसर्जन कर.”  त्या निमित्ताने त्याच्याही घरच्या गणपतीची सेवा झाली..हाही योगायोगच का??
आता पुण्यात आल्यावर गेली ३-४ वर्षे माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मीच करतोय.. आयुष्यात कुठेही असलो तरी या ना त्या प्रकारे कधीतरी कुठेतरी बाप्पा मला संधी देतोय..
या वर्षीपासून आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे.त्याच्या नियोजनात माझा पुरेपूर सहभाग आहेच.
देव नसला तरी काहीतरी शक्ती हे जग सांभाळतेय असं मी मानतो. “हाच देव आहे” हा भाबडेपणा झाला. या प्रचंड विश्वात जे नियमित व अनियमितही घडते त्यामागे मोठी शक्ति आहे. ह्या आकाराचा, ऊकाराचा, हा देव हे कोणी ठरवले? तर माणसाने. मग माणूसच आधी व मग देव असे समीकरण बसते. नियती सनातन आहे, माणसापूर्वीही ती होती आणि माणूस संपला तरी असणार आहे.नम्र कुठे व्हावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अंती नियती जे ठरवते तेच घडते. देव माणसाला काही देत नाही व त्याकडून काही घेत नाही. आपल्यासाठी नदी वाहत नाही तर ती वाहते म्हणून आपल्याला पाणी मिळते.आमच्या गावात, थोरांदळ्यात नदी नाही. ती नियती आहे. कोणत्याही देवाला ती आणता आलेली नाही. आता अमूक देव मानला तर सर्व धर्मात ते वेगवेगळे कसे? तुम्हाला जिथे नम्र व्हायला होते तिथे व्हा.मग तो गणपती असेल, अल्ला असेल, येशू असेल किंवा अजूनही काही असेल. फरक काहीच पडत नाही. मी तरी ह्या मताचा आहे.
श्रद्धेत बळ असते असे म्हणतात. मला योग येतोय त्याचा अर्थ  नियती कल्याण करते आहे असा मी घेतो..त्यात मी वाहत जाणार नाहिये हे निश्चित..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.