नवरदेवाचा कुर्ता

गेल्या महिन्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्न होतं..साखरपुड्याचा कार्यक्रम अगोदरच उरकला होता. त्यामुळे नवरदेवाच्या घरचं वऱ्हाड जरा उशीरानेच विवाहस्थळी पोहोचलं. हळदीचा कार्यक्रम उरकला आणि नवरदेवाला मिरवणुकीला काढायची गडबड सुरू झाली. हळदीचं अंग वगैरे धुवून झाल्यावर नवरदेवाच्या एका मित्राने कपड्यांची पिशवी उचलली. पिशवी हाताला थोडी हलकी लागली म्हणून डोकावून पाहीलं तर त्यात कुर्ताच नव्हता.फक्त सलवार आणि ओढणी. आता आली का पंचाईत!! 
मग सुरू झाली धावपळ.हा म्हणतो इथं असंल तो म्हणतो तिथं असंल.. कुर्ता काही सापडेना.. मग नवरदेवच म्हणाला , “अरे तो अल्टर करायला टाकला होता.तो अजून आणलाच नाहीये.”
आता नवरदेवाचीच चूक असली तरी कोणाला त्याला शिव्याही देता येईनात. मग त्याचाच एक मित्र गाडीला किक मारून कुर्ता आणायला गेला. इकडे नवरदेवाच्या भावाने आपले नवे कपडे त्याला घालायला दिले आणि मिरवणूक निघाली.
मित्र दुकानात पोहोचला खरा.पण पावती न्यायला विसरला. पावती नाही म्हटल्यावर दुकानातले लोक काही ऐकेनात. पावती असल्याशिवाय कपडे मिळणार नाही अशी त्यांची भूमिका. नवरदेवाच्या मित्राने त्याचा आयफोन ठेवायची तयारी दाखवली, पॅन कार्डसुद्धा ठेवतो म्हणाला पण काही जमेना.. मावळी गडी शेवटी तो. काहीच होईना म्हटल्यावर त्याने शेवटचा पर्याय म्हणून आवाज वाढवला. ही मात्रा मात्र लागू पडली आणि कुर्ता घेऊन तो लग्नाच्या हॉलच्या दिशेने सुसाट निघाला.. तोपर्यंत मिरवणूक अर्ध्या रस्त्यात आली होती. पण हा मित्र वेळेवर पोहोचला. मग हॉलवर पोहोचण्याआधी मिरवणूक मध्ये थांबवली गेली.  सगळ्यांनी कोंडाळे केलं आणि नवरदेवाला बाजूला घेऊन त्याला कुर्ता घातला आणि मिरवणुकीच्या रथात बसवला..
असा हा विवाहसोहळा शेवटपर्यंत उत्कंठावर्धक आणि आलेल्या पाहुण्यांची करमणूक करणारा ठरला..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.