कुणी वाढदिवस बदलून देता का?

“आज कंटाळा आलाय राव लेक्चरला बसायचा.बर्थडेच्या दिवशी कोण बोंबलत लेक्चर करणार?”

“मला सुद्धा कंटाळा आलाय. आपण आधी कॉलेजला तर जाऊ, मग बघू काय ते.” तुषार आणि भूषण घरातून निघताना एकमेकांशी बोलत होते.

आज तुषारचा वाढदिवस होता.कॉलेजला जाऊन लेक्चर करण्यापेक्षा बाहेर कुठंतरी जावं असं त्याला वाटत होतं. दोघंही नाशिकच्या एका नावाजलेल्या इंजिनियरींग कॉलेजचे विद्यार्थी. रोज बसने कॉलेजला जात.

रोजच्यासारखे आजही निघाले. घर ते बसस्टॉप या रस्त्यात एक निर्जन पट्टा होता. पायी जाणारे सहसा त्या रस्त्याचा वापर करत. मोटार जाईल एवढा मोठा नसला तरी पोलिसांचा ससेमिरा चुकवायला रिक्षावाले अधूनमधून त्या रस्त्याचा वापर करत. तुश्या भुश्याचा हा रोजचा रस्ता. कधीतरी कॉलेजातून परत येताना कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून ते याच रस्त्यावर थांबून दोघांत एक सिगारेटही मारत.

आजही त्याच रस्त्याने दोघे निघाले.निम्मा रस्ता संपला तोच मागून  एक रिक्षावाला आला.

“कुठं जायचं रे?” पोरांच्या पाठीवरच्या सॅक पाहून रिक्षावाल्याने विचारलं.

“कॉलेजला चाललोय.” तुश्याने थोडक्यात उत्तर दिले.

“बसा.” रिक्षावाला म्हणाला.

ह्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि रिक्षात बसले. रोज बसने कॉलेजला जाणाऱ्या तुश्या भुश्याला आज रिक्षाने जायची हुक्की का आली देव जाणे.

थोडं अंतर गेल्यावर रिक्षावाल्याने रस्ता बदलला. पोरांना वाटलं नेईल थोडं लांबून.रिक्षावाला मात्र भलत्याच मूडमध्ये होता.त्याने रिक्षा पळवायला सुरुवात केली.

भुश्याने त्याला विचारलं,
“ए इकडं कुठं चालला?कॉलेजला जायचंय आम्हाला.”

“गप्प बसायचं.जास्त आवाज करायचा नाही.केलात तर मला हे वापरावं लागेल.” खिशातला चाकू दाखवत रिक्षावाला दरडावला.

चाकू पाहताच तुश्या भुश्याची तंतरली. आपला कार्यक्रम झाला आहे हे लक्षात आलं. काय करावं? हा विचार करेपर्यंत रिक्षावाल्याने रिक्षा शहरातून बरीच बाहेर आणली होती. थोडं अंतर गेल्यावर जरा शांत रस्ता पाहून त्याने रिक्षा थांबवली.चाकूचा धाक दाखवत पोरांना म्हणाला,

“चला, काय असेल तुमच्याकडं ते सगळं काढून द्यायचं. नको तो शहाणपणा केलात तर याद राखा.”

आधीच तुश्या भुश्या घाबरले होते.त्यात तो चाकू बघून त्यांना अजूनच भीती वाटली. इंजिनियरिंगला असले तरी त्यांच्यावर आजपर्यंत असा प्रसंग कधीच  आला नव्हता. तरी तुश्याने मनाचा हिय्या करून त्याला म्हटलं,

“ओ काका,माझा वाढदिवस आहे आज. सगळं देतो तुम्हाला पण मला काही करू नका.”

“वाढदिवस म्हणजे आज तुझ्याकडे माल असणार.तूच आधी खाली कर सगळं”

तुश्याने खिशातून होते नव्हते तेवढे पैसे त्याला दिले. रिक्षावाल्याला काय वाटलं काय माहीत?त्याने तुश्याच्या खिशात हात घातला. तुश्याने वरच्या खिशात ठेवलेले पन्नास रुपये आणि बसचा पास त्याच्या हाताला लागला.तोसुद्धा त्याने ठेवून घेतला.

तेवढं झाल्यावर तुश्याची बखोटी धरत त्याने तुश्याला परत रिक्षात कोंबला.

काय होतंय हे दोघांना अजूनही कळत नव्हते.रिक्षावाल्याने आता भुश्याकडे मोर्चा वळवला.त्याच्याकडून असतील नसतील तेवढे पैसे काढून घेतले आणि म्हणाला,

“नीट निघायचं.इथं थांबायचं नाही.”

“पण माझा मित्र?” भुश्याने घाबरत विचारलं.

“त्याचं तुला काय करायचंय?चल निघ इथून.”

घाबरलेला भुश्या चक्क तिथून तुश्याला सोडून निघाला.

इकडे रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा सुरू केली आणि पुढे जाऊ लागला. तुश्या त्याला काही बोलणार तोच त्याने पुन्हा एकदा चाकू दाखवला.गप्प बसण्यात शहाणपणा आहे हे जाणून तुश्या शांत राहिला.संधीची वाट पहात राहिला.

रिक्षावाला जरा एकाकी जागा शोधायच्या नादात सारखा रिक्षातून इकडेतिकडे बघत होता. त्याचं लक्ष नाही पाहून तुश्याने चालत्या रिक्षातून उडी मारली. रिक्षाच्या वेगामुळे तो रस्त्यावर पडला.थोडंफार खरचटलं पण ते त्यावेळी महत्वाचं नव्हतं. रस्त्यावरून उठत तुश्या जोरात पळत सुटला.तुश्याने उडी मारली आहे हे कळून, रिक्षा माघारी फिरवेपर्यंत रिक्षावाल्याचा थोडा वेळ गेला. तुश्या जिवाच्या आकांताने पळत सुटला. रिक्षावाल्याने थोडा वेळ पाठलाग केला मात्र गर्दीचा रस्ता आलेला दिसताच नाद सोडून दिला.

रिक्षावाल्याने आपला पाठलाग थांबवला आहे हे लक्षात येताच तुश्या पळायचा थांबला. आता बस पकडून कॉलेजला जावे म्हणून खिशात हात घातला तर बसचा पास गायब.खिशात एक दमडीदेखील नव्हती. रिक्षावाल्याने सगळं काढून घेतलं होतं.त्याला एक शिवी हासडून तुश्या तसाच चालत कॉलेजच्या दिशेने चालत निघाला.

आपण किडनॅप झालो होतो असे कुणाला सांगून पैसे मागावेत तर हसे होण्याची भीती.एवढा तरुण मुलगा आणि किडनॅप झाला यावर कोण लगेच विश्वास ठेवणार? तासभर चालून अखेरीस तुश्या कॉलेजला पोहोचला. भुश्या कुठे आहे पहावे म्हणून वर्गाकडे गेला. खिडकीतून पाहतो तो भुश्या लेक्चरला बसलाय. आता मात्र तुश्याचा संताप झाला.तिथूनच तो ओरडला,

“भुश्या भाडखाऊ. पोलिस स्टेशनला जायचं सोडून लेक्चर काय करतोय?”

तुश्याचा हा रुद्रावतार बघून भुश्या वर्गातून बाहेर आला. तो असा एकदम उठून बाहेर पळाला म्हणून लेक्चर घेणारे सरही बाहेर आले.

“काय रे?काय चाललंय काय?असे ओरडताय?” सरांनी विचारलं.

“सर, एका रिक्षावाल्याने आम्हाला दोघांना किडनॅप केलं होतं. आमचे पैसे काढून घेतले.आधी ह्याला सोडलं.मला कुठेतरी घेऊन चालला होता पण मी रिक्षातून उडी मारून पळून आलो.मला वाटलं हा सुटलाय तर मी किडनॅप झालोय हे पोलिसांना जाऊन सांगेल.तर हा हरामी इथं लेक्चरला बसलाय.”तुश्याने एका दमात सगळं सांगितलं.

“अरे बाप रे?हे खरोखर गंभीर आहे. चला आपण लगेच प्रिन्सिपल ऑफिसला जाऊन पोलिसांना फोन करू.” म्हणत सर त्यांना घेऊन चालू लागले.

“हरामखोर, तू बाहेर भेट,मग दाखवतो तुला.वाढदिवसाच्या दिवशी लेक्चर नको म्हणत होतो.तुला लै खाज.जाऊ कॉलेजला.काय झालं येऊन?” तुश्याने भुश्याला झापायला सुरुवात केली.

वर्गाबाहेर उभं राहून तुश्या जे काही बोलला ते सगळ्या वर्गाने ऐकलं होतं. ते आख्ख्या कॉलेजभर पसरायला वेळ लागला नाही.सगळे तुश्याला भेटायला येऊ लागले. अनेकांनी टिंगल केली. कुणी घरी फोन करू लागले. सगळं काही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच घडल्याने  साऱ्याला तोंड देताना तो वैतागून गेला.

तेव्हापासून ते आजतागायत दरवर्षी तुश्याच्या वाढदिवसाला त्याचे मित्र त्याला ह्या गोष्टीची आठवण करून देतात.इतकी की तुश्या ‘नको तो वाढदिवस’ असं म्हणायला लागलाय. कुणी घर देता का घर? सारखं कुणी वाढदिवस बदलून देता का? अशी त्याची अवस्था झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.