आजपासून रणजीचा अंतिम सामना सुरु होतोय. या सामन्याविषयी
१.रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठण्याची बंगालची ही १४ वी वेळ आहे. फक्त मुंबई (४६) आणि दिल्ली (१५) यांनी यापेक्षा जास्त वेळा अंतिम फेरी गाठली आहे. कर्नाटकने १४ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. बंगालने गेल्या १३ प्रयत्नांत फक्त २ वेळा विजेतेपद मिळवले आहे. या चौदाव्या प्रयत्नात ते काय करतात हे पाहण्याची उत्सुकता असेल.
२. याआधी बंगालने २००५-०६ आणि २००६-०७ या लागोपाठच्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. मात्र या दोन्ही वेळेस त्यांना उत्तर प्रदेश आणि मुंबईविरुद्ध विजय मिळवता न आल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
३. किमान दहा वेळा रणजीच्या अंतिम फेरीत खेळलेल्या संघांमध्ये बंगालची जिंकण्याची टक्केवारी सगळ्यात कमी म्हणजे १५.४०% एवढी आहे.
४. बंगालने याआधी १०८९-९० मध्ये रणजी करंडक जिंकला होता. त्यावेळी अरुण लाल यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत केले होते. हेच अरुण लाल आता बंगालचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
५.अंतिम फेरीच्या या सामन्यात सौरव गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.मात्र त्याचे पदार्पण होण्यासाठी त्याचा भाऊ स्नेहाशिषला संघातून बाहेर बसावे लागले. त्या हंगामात स्नेहाशिषची कामगिरी बरी झाली होती. त्याला भारताकडून संधी मिळण्याची शक्यता होती. त्यावेळचे निवड समिती अध्यक्ष राज सिंग डुंगरपूर हा सामना बघायला आले होते. स्नेहाशिष या सामन्यात खेळणार नाही हे समजल्यावर त्यांचा पारा चढला होता. स्नेहाशिष यांनतर कधीही भारतासाठी खेळू शकला नाही. मात्र सौरवने काय केले हे सर्वज्ञात आहे.
६. सौराष्ट्रासाठी ही रणजी करंडकाची चौथी अंतिम फेरी आहे. गेल्या आठ वर्षातली चौथी अंतिम फेरी या संघाच्या कामगिरीमधील सातत्य दाखवते. गेल्यावर्षी त्यानं विदर्भविरुद्ध उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
७. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकत याला एका रणजी हंगामात सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज बनण्यासाठी फक्त चार बळींची गरज आहे. उनाडकतने या हंगामात आत्तापर्यंत ६५ बळी घेतले आहेत. यात त्याने सात वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी मिळवलेले आहेत. रणजी हंगामात सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम बिहारच्या आशुतोष अमन (६८) च्या नावावर आहे.
८. बंगालच्या गोलंदाजीची या हंगामात बरीच चर्चा होतेय. याआधी बंगालच्या वेगवान गोलंदाजीची धुरा अशोक दिंडाकडे असायची. या हंगामात गैरवर्तनामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. गेल्या सहा हंगामात बंगालकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज दिंडाच होता. यावेळी तो संघात नसतानाही गेल्या दहा सामन्यात एकही संघ बंगालविरुद्ध एका डावात २५० हुन अधिक धावा करू शकलेला नाही. बंगालचा हुकमी एक्का मोहंमद शमी जानेवारी २०१८ पासून बंगालची फक्त एक सामना खेळलेला आहे इथे लक्षात घेतले पाहिजे. ईशान पोरेल बंगालच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. त्याला मुकेश कुमार आणि आकाश दीप हे दोघेही २० पेक्षा अधिक बळी मिळवून चांगली साथ देत आहेत.
मुकेश कुमार, आकाश दीप, ईशान पोरेल हे तिघेही कॅबने २०१४ मध्ये राबवलेल्या व्हिजन २०२० मधून पारखून घेतलेले गोलंदाज आहेत. त्यावेळी गांगुली कॅबचा सेक्रेटरी होता आणि त्याने वकार युनूसला बंगालचा जलदगती गोलंदाजीचा सल्लागार म्हणून नेमले होते. त्या मेहनतीची फळे आता बंगालला मिळत आहेत.
९.या सामन्यात बंगालकडून वृद्धीमान साहा तर सौराष्ट्राकडून चेतेश्वर पुजारा खेळताना दिसतील. जडेजाला बीसीसीआयने परवानगी नाकारल्याने तर शमी जायबंदी असल्याने या सामन्यात खेळणार नाहीत.
आकडेवारी साभार – इएसपीएन क्रीकइन्फो