ढमाले सर

“अरे जा ना कोणीतरी एंट्रीला. घाबरता का तुमच्या आयला तुमचे.” असं म्हणून मी एंट्रीला गेलो. अगोदरच पिछाडीवर असल्याने सेफ एंट्री मारून परत आलो. 

आणि मग लक्षात आलं की शाळेचे मुख्याध्यापक धरून सगळे शिक्षक सामना पाहायला आले होते. मी हा असा वेडेपणा करून बसलो होतो. सामन्याचे मध्यांतर झाल्यावर पंच असलेल्या ढमाले सरांनी मला हाक मारली,
“गुंड्या इकडं ये जरा.”
थोडासा कावराबावरा होऊन मी गेलो.
“अरे आजूबाजूला कोण बसलंय याचा विचार करून बोलावं की नाही?”
“सर अहो ते लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी.” मी आपला डिफेन्सिव्ह मोडमध्ये.
“जा पळ.”
सामना हारलो आम्ही पण सरांची ही आठवण कायम राहिली.
ढमाले सरांबद्दल लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. कच्चं स्क्रीप्ट मनात जुळवून ठेवलं होतं. आज लिहायला बसलो.
ताई शाळेत माझ्यापुढे ४ वर्षे. ती आठवीला गेली तेव्हा घरात पहिल्यांदा सरांचं नाव ऐकायला मिळालं. फार कडक आहेत, त्यांच्या एका शिट्टीमध्ये आख्खी शाळा शांत होते अशा दरारा वाटणाऱ्या गोष्टी कानावर पडल्या. त्यांना पाहिलं होतं ते फक्त शाळेच्या बक्षिस समारंभामध्ये विद्यार्थ्यांची नावे पुकारताना. काळा रंग, पण चेहऱ्यावर मात्र प्रचंड तेज, दाबून व्यवस्थित बसवलेले केस, मैदानी खेळ खेळून घडवलेलं शरीर अशी त्यांची आणि माझी पहिली आठवण.
माझी बहीण पूजाला सरांनी आमच्या शाळेच्या स्पर्धांमध्ये पळताना पाहिलं आणि तिच्यातलं कौशल्य लगेच हेरलं. काही दिवसांनी सर घरी येऊन दादांबरोबर बोलले. पूजाच्या सरावासाठी दादांनीसुद्धा परवानगी दिली आणि तिथून पुढे सुरु झाला तो एक अचंबित करणारा प्रवास. पूजावर सरांनी प्रचंड मेहनत घेतली. मला आठवतंय सर सकाळी ६ वाजता ग्राउंडवर येत असत. येताना आपल्याबरोबर आपले मित्र विनायक खोत सर यांना सुद्धा घेऊन येत. चिमटे सर, आवटे शाळेचे पोकळे सर वेळ मिळेल तसे येत असत. पूजाचा पळण्याचा वेग भन्नाट असे. तिच्याबरोबर पळायला कोणी मुलं तयार नसत.हिच्याबरोबर  हारलो तर आपलं हसं होईल अशी भिती पोरांना वाटे. स्पर्धा असल्याशिवाय सराव होणार कसा? मग हेच ३-४ जण वेगवेगळ्या टप्प्यावर जाउन थांबत. पूजाला स्टार्ट मिळाला की एका ठराविक टप्प्यापर्यंत एकजण पळे आणि तिथून पुढे मग दुसरा. असा तो सराव दिवस दिवस चाले. अर्थात त्याचं फळ पूजाला मिळालं. ती राज्य पातळीवर खेळून आली. या सगळ्या प्रवासामध्ये सरांशी एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला तो आजतागायत कायम आहे. सरांबरोबर असा कौटुंबिक जिव्हाळा असणारी अनेक कुटुंबे जुन्नरमध्ये आहेत. 
 
सरांची एक गोष्ट सगळ्यांना आवडे. आपली टीम जिंकण्यासाठी वाटेल तितकी मेहनत घायची त्यांची तयारी असे. त्यासाठी अर्थात पोरांना तेवढच कुथवत असत ते. मग सामना खो खो चा असो किंवा कबड्डीचा. माझा आणि त्यांचा संबंध कबड्डीच्या निमित्ताने आला. १४ वर्षाखालील गटात तेव्हा आम्ही खेळत असू. सागर देवडिगा, अरविंद एखंडेसारखे रायडर होते आमच्याकडे. आदित्य कुलकर्णी, गणेश चिमटेसारखे क्षेत्ररक्षक होते. मी त्या वेळेस डाव्या बाजूचा सातवा लावत असे. या सगळ्याच्या जोरावर आम्ही तालुका पातळीवर अंतिम फेरीपर्यंत सहज मजल मारली. अंतिम फेरीचा सामना खोडदच्या शाळेविरुद्ध होता. त्यांच्याकडे एक ६ फुटाहून जास्त उंची असलेला रायडर होता. त्याने पहिल्या चढाईपासून आमची दाणादाण उडवायला सुरुवात केली. मी सातवा लावत असे. त्याच्या एका एंट्रीला चवडा काढायला वाकलो तर त्याने एक जोरदार दणका दिला डोक्यात. डोकं झिणझिणलं माझं. कोणाला काही कळेना काय करावं. सगळ्यांनी उसनं अवसान आणून सरांकडे पाहिलं. इतक्या वेळ शांत बसलेले सर अचानक उठून पंचाकडे गेले. सबंधित मुलगा या वयोगटामधील नसून जास्त वयाचा आहे, त्यामुळे तो हा सामना खेळण्यास अपात्र ठरतो असा युक्तिवाद सरांनी पंचाकडे केला. सामना थांबवला गेला. तब्बल एक तासाच्या विलंबानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ पंचाच्या देखरेखीखाली सामना पुन्हा पहिल्यापासून सुरु करण्यात आला. आता मात्र आम्ही पेटून उठलो होतो. पहिल्याच चढाईला त्यांच्या त्या रायडरचा मी चवडा काढला आणि सबंध मैदानात जल्लोष झाला. सामना आम्ही जिंकलाच. पण समोरचा खेळाडू आपल्यापेक्षा वरचढ असेल तर त्याचं मानसिक खच्चीकरण करून सामना आपल्या बाजूने फिरवता येतो हि शिकवण सरांनी घालून दिली. 
 
मल्लखांबावर सरांचं विशेष प्रेम. त्यांनी शाळेसाठी खास मल्लखांब बनवून घेतला होता. मल्लखांबाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलांकडून चित्तथरारक कसरती ते करून घेत. मलाही मल्लखांब खेळायची इच्छा होती. पण नेमकं सरांनी मला खो खो मध्ये टाकलं. एक दिवस खेळलो खो खो. दुसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून सरांकडे गेलो आणि म्हटलं, 
 
“मला मल्लखांब खेळायचाय.” त्यांच्यासमोर जाऊन आपलं मत एव्हढ्या ठामपणे कसं मांडलं माझं मलाच माहित. 
 
सरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, 
 
“तुझं नाव काय बाळ?” 
 
“आदित्य गुंड” मी उत्तरलो. 
 
दोन सेकंद विचार करून सर म्हणाले,
 
 “उद्यापासून लंगोट घेऊन ये आणि मल्लखांब खेळत जा.”
 
ते ५-६ महीने माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या फार महत्वाचे ठरले. त्या वर्षानंतर सरांनी मल्लखांब ठेवला तो अजूनपर्यंत बाहेर काढलेला नाही. सुजान मोठा झाल्यावर एकदा मल्लखांब बाहेर काढेन असं ते म्हणाल्याचे मला पुसट आठवतं. पण ते बहुतेक झालंच नाही. 
 
सरांच्या शिस्तीचा सबंध शाळेमध्ये चांगलाच गवगवा होता. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी कोण गोंधळ करतोय हे त्यांच्या नजरेनं अचूक हेरलेलं असायचं. मग दुसऱ्या दिवशी त्या त्या मुलांना व्हरांड्यामध्ये बोलावून ते त्यांचा निकाल लावत असत. शाळेत इतक्या सगळ्या मुलांच्या गर्दीमधून कोण मुलगा/मुलगी एखाद्याला चिठ्ठी देतोय/देतेय हे ते बरोबर हेरत. आणि मग त्या दोघांना वेगवेगळ्या वेळेस बोलावून त्यांची खरडपट्टी काढत. यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, ती वाम मार्गाला लागू नयेत असा त्यांचा शुद्ध हेतू असे. कधीकधी काही पालक मग सरांची तक्रार घेऊन शाळेत येत. त्यांना मग वेगळ्या पद्धतीने शाळा आणि सर हाताळत असत. अधिक तपशील देणे इथे उचित ठरणार नाही. 
 
शिस्तीच्या बाबतीत काटेकोर असणारे सर पोरांची काळजीसुद्धा तितकीच घ्यायचे. त्यांच्यावर प्रेमसुद्धा तितकंच करायचे. मग एखाद्याच्या घरी जाउन त्याची चौकशी करणे असो, एखाद्याला प्रेमाने एका विशिष्ट नावाने हाक मारणे असो. सरांच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येकाच्या त्यांच्या बाबतीत अशा आठवणी असतील. बरेच विद्यार्थी जाउन आता त्यांची पोरं सरांच्या हाताखाली आली आहेत. पण या माणसाचा उत्साह अजून कमी झालेला नाहीये. आजही तितक्याच जोमाने ते रोज संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला जातात. ओतूरला शेतावर जाऊन मेहनत करतात. या सगळ्यांत बाईसुद्धा त्यांना खंबीरपणे साथ देत असतात हे विसरून चालणार नाही. अगदी अलीकडे सुजानच्या आजारपणाने त्यांची कसोटी पाहिली. पण त्यातूनही ते समर्थपणे बाहेर पडले. 
आजही सर भेटले की गप्पांच्या ओघात जुन्या आठवणीना उजाळा दिला जातो आणि वेळ कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही.सरांच्या निवृत्तीला अजून वेळ आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या उरलेल्या शिक्षकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.