डॅडी

“सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?”
एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण का माघार घ्यावी अशा विचाराने मीही त्याला होकार देत म्हटलं,
“बोला की.”
“सर आज सकाळी मी डॅडी पिच्चर पाहिला.”
“अरे वा! कसा काय वाटला मग तुम्हाला?”
“एक नंबर आहे सर.”
“मग बघायला पाहिजे.”
“नक्की बघा सर..फक्त दाऊदच्या रोलमधी फरहान अख्तरला नव्हतं घ्यायला पाहिजे.त्याचा आवाज बाद आहे.दाऊदसारख्या माणसाचा आवाज असा असतो का??ते काय नीट जमलं नाही त्याला.”
“आणि अर्जुन रामपाल?” मी विचारता झालो.
“लई भारी काम केलंय सर त्यानी. म्हणजे त्यानी लई अभ्यास केला असणार या रोलसाठी.”
“हं.”
“आणि आपण अरुण गवळीला फक्त अलीकडं पाहतो. तरुणपणीचा डॅडी कसा होता, कसा राहायचा, कोणते कपडे घालायचा हे आपल्याला कुठं माहितीये.पण सर पिच्चरमध्ये ना सगळं एकदम डिटेल दाखवलंय.”
“अच्छा.”
“एखाद्याला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची थोडी माहिती असेल तर त्याला नक्की आवडंल सर. महाराष्ट्राचा क्राईम रेशो कसा वाढत गेला हे चांगलं दाखवलंय पिच्चरमध्ये.”
क्राईम रेशो हा शब्द ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून मी एव्हाना गार पडलो होतो. त्या गनगनीत नंतरची त्याची एक दोन वाक्य मी ऐकलीच नाहीत. त्याला वाटलं आपण जास्त बोलतोय.
“सर सॉरी मी जरा जास्त बोलतोय.”
“अहो नाही नाही.मीच जरा विचार करत होतो.”
हे असले बायोपिक्स हमखास लोकांना आवडेल असे बनवतात दिग्दर्शक लोक.डॅडी सुद्धा कदाचित त्यातलाच एक असावा. म्हणून कदाचित यालासुद्धा मनापासून आवडला असेल असा विचार करता करता घर आले.
“उद्या जातो मी बघायला” असं त्याला म्हणत मी घराकडे चालू लागलो..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.