ओला इलेक्ट्रिक ठरणार का भारतीय दुचाकीची ‘टेस्ला?’

काही दिवसांपूर्वी मी एथर एनर्जी या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटरची टेस्ट राईड घेतली होती. त्याबद्दल मी सविस्तर ब्लॉगदेखील लिहिला होता. एथर सध्या अतिशय वेगाने आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. देशातील विविध शहरांमध्ये एकामागोमाग एक शोरूम उघडत त्यांनी आपले इरादे आक्रमक असल्याचे स्पष्ट केले आहेत.

एथर, बजाज, हीरो, टीव्हीएस, ओकीनावा या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात असताना काही दिवसांपूर्वी ओला इलेक्ट्रिक या कंपनीनेसुद्धा या मार्केटमध्ये उडी घेत असल्याचे जाहीर केले. ओला इलेक्ट्रिकच्या ‘ओला फ्युचर फॅक्टरी’चे काम नुकतेच तामिळनाडूमधील कृष्णगिरी येथे सुरु झाले. या फॅक्टरीच्या उभारणीसाठी कंपनी तब्बल २४०० कोटी रुपये गुंतवणार असून, काम पूर्ण झाल्यावर ही जगातील सर्वात मोठी दुचाकी फॅक्टरी असेल. या फॅक्टरीमधून वर्षाला एक कोटी स्कुटर्सचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. ओलाने रिलीज केलेल्या व्हिडिओप्रमाणे या स्कुटरसाठी लागणारी बॅटरी या फॅक्टरीतच बनवली जाणार आहे. ओलाने सांगितलेला आकडा विचारात घेतला तर दोन सेकंदाला एक स्कुटर बनवली जाणार आहे. या प्रोजेक्टचा पहिला टप्पा यावर्षी जूनमध्ये पूर्णत्वास जाणार आहे (ही शक्यता सध्यातरी धूसर दिसते आहे). हा टप्पा पूर्ण झाल्यावर फॅक्टरीमधून वर्षाला २० लाख स्कुटरचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. हे सगळे आकडे कल्पनातीत आहेत. खासकरून तेव्हा, जेव्हा इलेक्ट्रिक गाड्यांचा भारतीय बाजारपेठेतील शेअर एक टक्क्याहूनही कमी आहे.

ओला या क्षेत्रात तुलनेने पूर्णपणे नवी असलेली कंपनी. या कंपनीचा मूळ व्यवसाय राईड शेअरिंग टॅक्सीचा. भाविश  अगरवाल आणि त्याचा मित्र अंकित भाटी या दोघांनी सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून ओला राईड शेअरिंग टॅक्सी सुरु केली. त्यांची ही कल्पना भारतात गेमचेंजर ठरली. आर्थिकदृष्ट्या ही कंपनी जरी फायद्यात नसली तरी आजमितीला ओलाने प्रवास न केलेला माणूस भारतातील मुख्य शहरांमध्ये सापडणे मुश्किल आहे. या तरुणांनी उबरसारख्या कंपनीला थेट शिंगावर घेतले होते. गेल्या वर्षात करोनामुळे कंपनीचा व्यवसाय जवळपास शून्य आहे. तरीही भाविशने इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या कंपनीकडे मॅन्युफॅक्चरिंगमधला अनुभव शून्य आहे. कंपनीकडे कुठलेही प्रॉडक्ट, बिझनेस प्लॅन नसताना त्यांना सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल सारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांकडून इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे.

भाविशकडे हा आत्मविश्वास कुठून आला? ओला सुरु केली तेव्हा ती पूर्णपणे नवी कल्पना होती. त्यामुळे ती यशस्वी होण्याची शक्यता जास्त होती. त्याप्रमाणे ती झालीसुद्धा. मात्र इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये अगोदरपासून हीरो आणि बजाजसारखे दादा खेळाडू असताना भाविशला या क्षेत्रात उतरावे असे वाटले. एका कंपनीचा गेल्या वर्षीचा व्यवसाय जवळपास शून्य असताना दुसरी कंपनी काढण्याचा विचारही एखादा सुज्ञ माणूस करणार नाही. मात्र आत्मविश्वास आणि धैर्य असलेल्या माणसाला हा नियम लागू होतोच असे नाही. पस्तीस वर्षीय भाविशच्या बाबतीत हेच झाले आहे. हीरो, बजाज आणि टीव्हीएस या कंपन्यांचा भारतीय दुचाकी बाजारपेठेतील मार्केट शेअर जवळपास ८६% एवढा आहे. या तीन कंपन्यांची नावे आपण जवळपास गेल्या २० वर्षांपासून ऐकत आलो आहोत.

असे असताना भाविशने या रथीमहारथींना टक्कर देण्याचे शिवधनुष्य उचलले आहे असेच म्हणावे लागेल. कुठल्याही व्यवसायात टिकून रहायचे तर बदलत राहणे तितकेच गरजेचे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर बजाजचे देता येईल. स्कुटर बनवणाऱ्या या कंपनीने २००९ मध्ये चक्क स्कुटर व्यवसाय पूर्णपणे बंद करायचे ठरवले. राजीव बजाज यांच्या त्या निर्णयावर त्यावेळी अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बजाज यांचे मात्र ठरले होते. त्यांना स्कुटर मार्केट सोडून मोटरसायकल मार्केटमध्ये शेअर पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी बरीच वर्षे फारशी स्पर्धा नसणाऱ्या हीरोशी टक्कर घेण्याचे ठरवले होते. त्यांनी आपला निर्णय यशस्वी करूनही दाखवला. बजाजच्या मोटारसायकल व्यवसायाला स्कुटर व्यवसायाचे वलय लाभले नसले तरी राजीव यांचा हा निर्णय योग्यच ठरला म्हणावे लागेल.

अमेरिकेत जनरल मोटर्स, फोर्ड, क्रायस्लर या कंपन्या गेली अनेक वर्षे चारचाकी गाड्या विकत होत्या. सगळे काही नीट सुरु असताना अचानक एलॉन मस्क टेस्ला घेऊन आला. आता टेस्ला या तीनही कंपन्यांना पुरून उरते आहे. ओला इलेक्ट्रिकचं गणित काहीसं असंच आहे. हीरो, बजाज, टीव्हीएस या कंपन्यांनी काळाची पावले उचलत इलेक्ट्रिक स्कुटर बनवायला सुरुवात केली. त्यात त्या बऱ्यापैकी यशस्वीदेखील आहेत. असे असताना ओला इलेक्ट्रिक अचानक परीक्षेत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ प्रश्न यावा तशी या कंपन्यांच्या समोर येऊन उभी राहिली आहे. या कंपन्यांना इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये आपली मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. मात्र आजही या मार्केटमध्ये लिडर कोण हे नक्की सांगता येत नाही. स्वतःकडे उपलब्ध असलेल्या सुविधा वापरून हीरो,बजाज सारख्या कंपन्यांना हे सध्या करता आले असते. मात्र त्यांनी एथर, ओला यांच्यासारख्या नव्या खेळाडूंना मार्केटमध्ये शिरकाव करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याची कारणे अनेक असली तरी ही सत्य परिस्थिती आहे हे नाकारता येत नाही. ओलाने एकही स्कुटर न बनवता या मार्केटमध्ये आगमन मोठ्या थाटात केले. मात्र ही कंपनी भारतीय दुचाकी मार्केटमधील टेस्ला ठरणार की नाही? हे मात्र येणार काळच सांगेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.