राफाचा असाही विक्रम 

स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल गेली अनेक वर्षे टेनिसच्या अनेक स्पर्धा जिंकतो आहे. गेल्यावर्षी फ्रेंच ओपन जिंकत त्याने आपले २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. आता मात्र राफाने एक अनोखा विक्रम केला आहे.

राफा गेले सलग ८०० आठवडे एटीपीच्या टॉप १० मध्ये आहे. २५ एप्रिल २००५ ते १८ जानेवारी २०२१ या तब्बल पंधरा वर्षांच्या कालावधीत तो कधीही एटीपी टॉप १० मधून बाहेर पडलेला नाही. या ८०० पैकी ५७० आठवडे तो टॉप २ मध्ये होता. याअगोदर हा विक्रम जिमी कॉनर्स यांच्या नावावर होता. ते सलग ७८९ आठवडे एटीपी टॉप १० मध्ये होते. राफाने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा हा विक्रम मोडीत काढला.

राफाने एटीपीच्या टॉप १० मध्ये एप्रिल २०१५ मध्ये प्रवेश केला. तोवर त्याने एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली नव्हती. त्यांनतरची जवळपास १५ वर्षे तो सतत १ किंवा २ क्रमांकावर होता. मध्येमध्ये त्याला झालेल्या दुखण्यांमुळे तो टॉप १० मधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वेळीच पुनरागमन करत आणि स्पर्धा जिंकत राफाने तसे होऊ दिले नाही.

राफाचा विषय सुरु आहे आणि रॉजर, जोकर बद्दल काहीच बोललो नाही असे कधी होतच नाही. या यादीत जिमी कॉनर्स यांच्या खालोखाल ७३४ आठवड्यांसह रॉजर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला काही स्पर्धांमध्ये भाग घेता आला नव्हता. त्यामुळे तो एटीपी रँकिंगमध्ये अगदी १७ व्या स्थानापर्यंत घसरला होता.

जोकरसुद्धा जवळपास १० वर्षे टॉप १० मध्ये होता. मात्र कोपराच्या दुखापतीमुळे त्याला या टॉप १० मधले स्थान २०१७ मध्ये गमवावे लागले. जुलै २०१८ पासून जोकर पुन्हा टॉप १० मध्ये आला आहे.

सर्वाधिक सलग आठवडे एटीपी टॉप १० मध्ये असलेले टेनिसपटू

राफा – ८०० आठवडे

जिमी कॉनर्स – ७८९ आठवडे

रॉजर फेडरर – ७३४ आठवडे

इव्हान लेंडल – ६१९ आठवडे

पिट सॅम्प्रास  – ५६५ आठवडे

राफाचा हा विक्रम मोडणे शक्य आहे का?

जोकरला राफाचा हा विक्रम मोडीत काढायचा असेल तर त्याला २०३३ पर्यंत म्हणजे त्याच्या वयाच्या ४६ व्या वर्षापर्यंत टेनिस खेळावे लागेल. रॉजरला राफाचा हा विक्रम मोडीत काढायचा असेल तर त्याला वयाच्या ५१ व्या वर्षापर्यंत टेनिसच्या खेळावे लागेल. त्यामुळे हा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता सध्यातरी फार कमीच आहे.

रॉजरच्या नावे असलेला विक्रम राफा मोडीत काढणार का?

सर्वाधिक आठवडे (सलग नाही) एटीपी टॉप १० मध्ये राहण्याचा विक्रम ९३१ आठवड्यांसह रॉजरच्या नावे आहे. त्याच्याखालोखाल जिमी कॉनर्स, ८१६ आठवडे आणि राफा, ८०० आठवडे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राफाला रॉजरचा हा विक्रम मोडीत काढायचा झाल्यास त्याला २०२४ पर्यंत म्हणजे वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत टेनिस खेळत रहावे लागेल. राफाच्या फिटनेसकडे पाहता ही गोष्ट सध्यातरी शक्य वाटते आहे.

 

आकडेवारी – एटीपी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.