यात्रा…!!!

-आदित्य गुंड

हनुमान जयंतीला गावाला मोठा उत्सव असतो. नोकरीधंद्याच्या निमित्ताने गाव सोडून मुंबई, पुणे, नाशिक आणि अजूनही कुठेकुठे स्थायिक झालेले लोक हनुमान जयंतीच्या दिवशी मात्र जातीनं गावात हजर असतात. वर्षभर प्रत्यकेजण आपापल्या सोयीने गावात येत येत जात असतो. यात्रेच्या निमित्ताने मात्र एकाच दिवशी सगळे गावात असतात. यात्रा म्हणजे संपूर्ण गावाचं गेट टुगेदर असतं असं म्हणा हवं तर.

सूर्योदयाला देवजन्म झाला की थोड्या वेळात काल्याचं कीर्तन आटोपतं. त्यानंतर लोक एकमेकांच्या गाठीभेटी घेतात. दुसऱ्या बाजूला शेरणी वाटपाचा कार्यक्रम सुरु होतो. गावातली काही मोठी कुटुंब वाजतगाजत, छोटीशी मिरवणूक काढून शेरणी वाटप करतात. त्यानिमित्ताने त्यांचं एक शक्ती प्रदर्शनही होतं. ह्या छोट्याश्या शक्ती प्रदर्शनातही चढाओढ असतेच. अमक्याच्या मिरवणुकीपेक्षा माझी मिरवणूक कशी उजवी दिसेल याचा प्रयत्न केला जातो. वाजंत्रीवालेसुद्धा समोर नाचवल्या जाणाऱ्या नोटांच्या आमिषाने त्वेषाने वाजवत असतात. एक वेळ अशी येते की वाजंत्री आणि समोर नाचणारे भान विसरून जातात. बरीचशी कुटुंबे ह्या सगळ्या भानगडीत न पडता, कुठलाही गाजावाजा न करता शेरणी वाटून मोकळी होतात.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावात पुऱ्या आणि गुळवणीचा भंडारा असतो. हनुमान जयंतीच्या एक दिवस आधीच घराघरातील स्त्रिया गावात येऊन पुऱ्या लाटतात. त्या निमित्ताने देवाच्या कार्याला आपला हातभार लागतो अशी भावना त्यांच्यात असते. सबंध गावाला पुरेल एवढा भंडारा म्हणजे काही हजार पुऱ्या लाटल्या जातात, पिंपच्या पिंप भरून गुळवणी केलं जातं. अलीकडे कांद्याची चटणी देखील बनवली जातात. स्त्रिया एकीकडे पुऱ्या लाटत असताना पुरुष मोठाल्या कढयांवर त्या तळून घेत असतात. दुसऱ्या दिवशी हा भंडारा गावकरी आणि पाहुण्यांना वाढला जातो.

बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे आता गाडे होत नाहीत. गाडामालक मात्र आजही हौशीने आपले बैल घेऊन गावात येतात. बैलांना देवासमोर आणून पुन्हा घरी नेलं जातं. यावेळी वाजंत्री असतात, अलीकडे डीजेदेखील असतो. मात्र गाडे बंद याबाबतची हळहळ मात्र आजही अनेकजण बोलून दाखवतात. गाड्याचा विषय निघाला की आपसूकच कोणत्या आमदाराने/खासदाराने गाडे पुन्हा सुरु करण्यासाठी किती प्रयत्न केले याची चर्चा होतेच. निवडणूक तोंडावर असल्यामुळे यावर्षी या चर्चेला जरा जास्त जोर होता.

अनेक गावांमध्ये ज्येष्ठांकडून यात्रेचं बॅटन तरुणांनी आपल्या हातात घेतल्याचं दिसतं. राजकारण्यांना जशी खुर्ची सुटत नाही तशीच या ज्येष्ठांनाही यात्रेवरची आपली पकड सोडवत नाही. यातून मग अनेकदा तरुण आणि ज्येष्ठ यांच्यात वादही उद्भवतो. ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरून तरूणांना वाव दिला की बरोबर मार्ग निघतो. दिवस वेगाने बदलत असले ग्रामीण भागात ‘यात्रा’ हा प्रकार आजही एक उत्सव म्हणूनच पाहिला जातो. गावोगावच्या यात्रा करण्याच्या चालीरीती अलग असतात. मात्र बदलत्या जीवनमानातही या चालीरीती जपण्याकडे गावकऱ्यांचा कल दिसतो. त्यासाठी अगदी शहरांत स्थायिक झालेले लोकही निदान एक दिवसापुरतं का होईना स्वतःला गावकरी म्हणून घेतात.

हे जपलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.