स्टार, सोनी की आणखी कोणी? प्रो कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क कुणाकडे जाणार?

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. करोनामुळे मागच्यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आल्यानंतर यावर्षी जून अथवा जुलै महिन्यात हा हंगाम सुरु होणार आहे. त्याआधी यावर्षी प्रो कबड्डी लीग नक्की कोणत्या चॅनेलवर दिसणार हे ठरणार आहे. कारण मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाच्या हक्कांचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांनी टेंडर डॉक्युमेंट घेतले आहे. आता लिलावाची प्रक्रिया ६ एप्रिल २०२१ रोजी पार पडणार आहे. हा लिलाव ऑनलाईन होणार आहे.

 

कोण मारणार बाजी?

 

प्रो कबड्डीच्या प्रक्षेपण हक्कांसाठी लिलावाची बेस प्राईझ ९०० कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लिलावात आपली बाजू भक्कम करण्यासाठी किमान १२००-१३०० कोटी रुपयांची तरी गरज पडणार आहे.

 

सध्यातरी या लिलावप्रक्रियेत स्टार इंडिया आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया या दोन कंपन्यांचे पारडे जड वाटत आहे. भारतातील इतर दोन मोठ्या कंपन्या व्हायाकॉम१८ आणि झील या क्रीडाक्षेत्रात म्हणाव्या तितक्या प्रबळ नाहीत. झीलने तर आपला क्रीडाक्षेत्रातील व्यवसाय म्हणजेच टेन स्पोर्ट्स ही वाहिनीचा सोनीला विकून टाकली आहे. त्यामुळे ते या लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील अशी शक्यता फारच कमी आहे.

 

व्हायाकॉम१८ ला जर जिओचे पाठबळ मिळाले तर ही कंपनी लिलाव प्रक्रियेत उडी घेऊ शकते. याआधी जिओने २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या भारतातील सामन्यांच्या प्रक्षेपण हक्कांसाठी बोली लावली होती. त्यावेळी स्टारने ६१३८ कोटी रुपयांची बोली लावत हा लिलाव जिंकला होता.

 

या कंपन्यांबरोबरच अमेझॉन आणि फेसबुक या दोन कंपन्याही प्रो कबड्डी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल का? याची चाचपणी करत आहेत असे समजते. अमेझॉन नुकतेच न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत. हे हक्क अगोदर स्टारकडे होते. फेसबूकडे देखील स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगाचे प्रक्षेपण हक्क आहेत. याआधी त्यांनी आयपीएलच्या प्रक्षेपण हक्कांसाठीदेखील बोली लावलेली आहे. त्यामुळे आता प्रो कबड्डीसाठी ते मैदानात उतरतील ही शक्यता नाकारता येत नाही.

 

ड्रीम स्पोर्ट्स ही कंपनीदेखील प्रो कबड्डीसाठी उत्सुक असू शकते. ड्रीम स्पोर्ट्सकडे फॅनकोड या डिजीटल प्लॅटफॉर्मची मालकी आहे. त्यावरून ते अनेक स्पर्धांचे प्रक्षेपण करत असतात. याचा फायदा घेऊन ते प्रो कबड्डीच्या मैदानात उतरू शकतात.

 

प्रो कबड्डी लीगच्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकप्रियतेचा या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. सध्या प्रमुख शहरांत असलेला त्यांचा रिच प्रोकबड्डीमुळे काही पटींनी वाढण्यास मदत होऊ शकते. आयपीएल खालोखाल प्रो कबड्डी ही भारतात सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. नेमका हाच मुद्दा धरून या कंपन्या प्रो कबड्डीसाठी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.