द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला ‘द ड्रेनेज’ नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा स्मार्टफोन विकत घेतो. नवा फोन घेतल्याच्या आनंदात गावाकडच्या आपल्या एका मित्राला फोन करतो. मी नवा फोन घेतलाय, टचस्क्रीन आहे असं कौतुक चाललेलं असतं. तितक्यात एका दुचाकीवाल्याचा धक्का लागून फोन त्याच्या हातातून खाली पडतो तो नेमका एका ड्रेनेजमध्ये.
दहाच मिनिटांपूर्वी घेतलेला फोन ड्रेनेजमध्ये पडल्यावर त्या माणसाची काय अवस्था होते? तो फोन परत मिळवण्यासाठी तो काय काय करतो? या सगळ्याची गोष्ट म्हणजे ‘द ड्रेनेज’. नंदू माधव यांनी भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. गावाकडचा माणूस, त्याचं शहरातील बावरत वावरणं, मोबाईल ड्रेनेजमध्ये पडल्यावर तो पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड हे सगळं त्यांनी खूपच मस्त साकारलंय. एका प्रसंगात बरोबर त्यांचा फोन पडलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर एक गाडी येऊन थांबते. एरवी कुणी असतं तर त्या गाडीवाल्याला सांगून गाडी दुसरीकडे लावायला सांगितली असती आणि फोन काढायचे प्रयत्न सुरु ठेवले असते.  बाजूला बसून गाडी कधी हलेल याची वाट बघत बसतात. यातून त्यांचा साधेपणाही जाणवला.
तुम्ही म्हणाल एवढंच आहे का शॉर्टफिल्ममध्ये? तर नाही. शॉर्टफिल्म ज्याने लिहिली आणि दिग्दर्शित केली त्या विक्रांत बदरखेशी या निमित्ताने बोलायला मिळालं. शॉर्टफिल्मच्या शेवटच्या काही फ्रेम्समधून दिग्दर्शक त्याला द्यायचा असलेला संदेश देतो. मोबाईलचं व्यसन वगैरे विषय आजवर भरपूर चघळून झालेत. विक्रांत त्याही पलीकडे जाऊन विचार करतोय. गावात मोबाईलला रेंज नाही म्हणून विक्रांतच्या एका नातेवाईकाच्या शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यात आला. त्याच महिन्याकाठी भाडंही सुरु झालं. मोबाईलला रेंजदेखील आली. मात्र त्यामुळे ही माणसं कुठेतरी शेती करायला आळसू लागली. हे सगळं कुठेतरी विक्रांतला खटकत होतं. आपल्या या नेहमीच्या जगासारखंच मोबाइलचंही एक जग आहे की काय? ते जग आपल्या जगाहूनही भयंकर आहे काय? या सगळ्या विचारांमधून ‘द ड्रेनेज’ ची  निर्मिती झाली.
एका हलक्याफुलक्या विषयावर ही फिल्म आहे असे वाटत असताना शेवटची ३-४ मिनिटं मात्र तुम्हाला बराच वेळ विचार करायला भाग पाडतात. पंधरा मिनिटांत ही शॉर्टफिल्म तुम्हाला जिंकते. ड्रेनेजमध्ये केलेलं शूटिंग, आतमध्ये असलेला अंधार, घाण, त्यात शूटिंग करताना फवारलेले रूम फ्रेशनर आणि काय काय. हे सगळं करताना नक्की कसं केलं हे विक्रांतने सांगितलं तेव्हा त्याच कौतुक वाटलं.
एक मुलगा अकोल्याहून पुण्यात येतो काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता लिहिता होतो काय, शॉर्टफिल्म लिहितो काय, आणि त्या शॉर्टफिल्मला जगभरातल्या अनेकानेक महोत्सवांमध्ये पारितोषिकं मिळतात काय!! एक लेखक, दिग्दर्शक म्हणून विक्रांतचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. चित्रपटांचा दर्जा खालावला असे म्हणणाऱ्या लोकांना द ड्रेनेजसारख्या फिल्म्स दाखवल्या की या क्षेत्राचं भवितव्य योग्य हातांत आहे याची त्यांना खात्री पटेल.
टिप – ही शॉर्टफिल्म युट्युबवर उपलब्ध नाही. लवकर युट्युबवर येईल अशी शक्यताही नाही. वेळोवेळी या फिल्मचं स्क्रीनिंग पुणे, मुंबई आणि इतरही शहरांत होत राहील. तुमच्या शहरात आली की न चुकता पहा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.