‘पदावनत’ राजा

सध्या भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक तिरस्कार केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी विराट कोहलीचे नाव असू शकेल. त्याला कारणेही अनेक आहेत. इंग्लंड दौऱ्यादरम्यान अश्विनने त्याची केलेली तक्रार, इतर काही सिनियर खेळाडूंची स्टेटमेंट्स, सोडावे लागलेले कर्णधारपद, १३ वर्षे झाली तरीही बंगलोरला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात आलेले अपयश असे अनेक फॅक्टर्स विराटच्या विरोधात गेले आहेत.

विशेष म्हणजे हे सगळं एकाच वेळी घडून आलंय. त्यात त्याचा फॉर्म बरेच दिवस चिंताजनक होता. आताशा कुठे त्याचा फॉर्म परतला तर टी२० विश्वचषकात भारतीय संघाने हाराकिरी केली. या सगळ्या गोष्टींमुळे विराट एक व्हिलन ठरलाय. ‘याला लवकरात लवकर भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवा’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीचा रेटा इतका प्रचंड आहे की विराटचे समर्थकसुद्धा या मागणीला समर्थन देताना दिसतायत. येणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात तो कर्णधार नसेल. त्यानंतर कदाचित परत कधी कर्णधार म्हणून तो दिसणारही नाही.

विराटचे ग्रह अचानक फिरले आहेत. एकेकाळी रन मशीन, सर्वात यशस्वी कर्णधार अशी बिरुदे मिरवणारा विराट आता चाहत्यांनासुद्धा नकोसा झालाय. या सगळ्या गदारोळात एक गोष्ट अनेकांनी नोटीस केली नसेल. ती म्हणजे विराटने त्याच्याबाबात आलेल्या बातम्या, वक्तव्ये ,टीका या सगळ्याला अजिबात प्रत्त्युत्तर दिलेले नाही. त्याने त्याची बाजू मांडलेली नाही.

एखाद्या प्रकरणाचा निवाडा करताना पंच दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात. विराटच्या बाबतीत दुसरी बाजू म्हणजेच त्याची बाजू कधीच समोर आलेली नाही. येईल असे सध्या तरी वाटत नाही. कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले तेव्हाही असेच झाले. त्याने ट्विट करत आपला निर्णय जाहीर केला. कुंबळेसारख्या ज्येष्ठ खेळाडूने सोशल मीडियावर अशी आगपाखड करणे त्यावेळी आणि आजही फारसे प्रस्तुत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुंबळेच्या स्वभावाला (निदान जो मिडियामधून आपल्यासमोर आणला गेला आहे तो) अनुसरून वाटले नाही. त्या पूर्ण घटनाक्रमाबद्दल विराटने आजतागायत चकार शब्द काढलेला नाही.

सध्या भारतीय संघात माजलेल्या दुहीबद्दल मीडियातून जे काही प्रसिद्ध झाले ते सर्वज्ञात आहे. त्याचाच परिणाम भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर झाला हे स्पष्ट आहे. याबद्दलदेखील सरसकट विराटला व्हिलन ठरवून सगळे मोकळे झाले. त्याची बाजू ना त्याने मांडली ना कुणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

विराट कर्णधार म्हणून निश्चितपणे कमी पडतो. त्याच्या निर्णयक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे असे अनेक प्रसंग गेल्या २-३ वर्षात घडले आहेत आणि त्याचा भारताला तोटाही झाला आहे. पण म्हणून त्याचा थेट कचरा करावा असे आहे का? टीका करताना कुठल्या स्तरावर करावी याचेही भान असू नये एवढी आपली मानसिकता खालावली आहे का? कर्णधार म्हणून चुकला तरी त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने मिळवलेले यश इतक्या सहजी विसरून कसे चालेल?कसोटी संघात जिंकण्याची मनोवृत्ती निर्माण करण्याचे श्रेय विराट आणि शास्त्री गुरुजींना द्यावेच लागेल. अर्थात कर्णधार म्हणून फक्त कसोटी विजय मिळवून भागत नाही. आयसीसीच्या वनडे आणि टी२० च्या इतरही स्पर्धा जिंकाव्या लागतात. तर कुठेतरी तुम्हाला ‘यशस्वी कर्णधार’ हा टॅग मिळतो. त्यात विराटने धोनीची जागा घेतली. कर्णधार म्हणून आधीचा बेंचमार्क इतका हाय सेट झाला आहे की तो मॅच करणे खूपच अवघड आहे. तरीही विराटची कामगिरी एवढी वाईट आहे का? इतकी टीका करावी अशी आहे का?

भारतीय संघाचे कर्णधारपद हा एक काटेरी मुकुट आहे. सचिनसारख्या महारथीलादेखील तो पेलवला नाही. त्याने वेळीच निर्णय घेत तो काढूनही ठेवला. निर्णय घेण्याच्या बाबतीत विराट इथेही कुठेतरी कमी पडतोय का? संघातल्या स्थानाबद्दल चिंता करावी लागेल असा खेळाडू तर विराट निश्चितच नाही. कोहलीने पदार्पण केल्यापासून सर्वाधिक धावा, शतके, अर्धशतके, द्विशतके, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे सगळे विक्रम त्याच्याच नावावर केले आहेत. त्याने काढलेल्या ७० शतकांपैकी फक्त १४ वेळा भारताचा पराभव झालाय. बाकी आकडेवारी सर्वश्रुत आहेच.

मग काय असे कारण असेल की तो हा निर्णय घ्यायला इतका वेळ लावतोय? कर्णधार म्हणून एकही आयसीसी स्पर्धा आपण जिंकू शकलो नाही हे शल्य त्याला कुठेतरी बोचत असेल का? एकतरी स्पर्धा जिंकून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा लागावा अशी त्याची इच्छा असेल का? असणे हे गैर अजिबात नाही. तोही माणूस आहे. पण त्यासाठी संघालाच पणाला लावणे योग्य आहे का? विराटला हे कुणीतरी सांगितले पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. त्याचा आक्रमक स्वभाव पाहता कुणी हे धाडस करेल असे वाटत नाही. पण ज्यांच्याशी त्याचे पटते त्या शास्त्री गुरुजींनी तरी जाता जाता उपदेशाचे हे चार शब्द विराटला सांगावेत.

बाकी राहुल द्रविड येईल तेव्हा काहीतरी घडेलच. चांगले वाईट ते येणारा काळ ठरवेल. मात्र या सगळ्या नकारात्मकतेतून बाहेर पडून पुन्हा एकदा पूर्वीचा ‘किंग विराट’ समोर येईल एवढीच अपेक्षा.

#HappyBirthdayKingKohli

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.