शिक्षक आणि त्यांचे पेटंट डायलॉग

शाळेत किंवा कॉलेजात असताना बरेच शिक्षक आपल्याला शिकवून जातात.यातून काही शिक्षक त्यांच्या शिकविण्याच्या उत्तम पद्धतीसाठी, काही जण त्यांच्या विद्यार्थीप्रियतेसाठी शाळा,कॉलेज सोडल्यानंतरही बरीच वर्षे आपल्या लक्षात राहतात. काही शिक्षक त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे लक्षात राहतात. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील अशाच काही शिक्षकांबद्दल थोडेसे.

संस्कृतचे डुंबरे सर त्यांच्या अचूक व्याकरणासाठी जसे प्रसिद्ध होते तसेच एक दोन वाक्ये बोलली की “इकडे लक्ष द्या!” असे एका ठराविक टोनमध्ये म्हणण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. आम्ही आठवीत जाण्यागोदरच ते निवृत्त झाले होते. त्यांच्या संस्कृतच्या शिकवणीला मात्र मी जात असे. आज इतक्या वर्षांनंतरही सरांचे “इकडे लक्ष द्या” कानात जसेच्या तसे ऐकू येते.
मराठी आणि इतिहास शिकविणाऱ्या थोरात बाईंना शिकवताना  ‘विशेषतः’ आणि ‘या ठिकाणी’  हे शब्द वापरण्याची सवय होती. शिकविण्याच्या ओघामध्ये त्या बरेचदा हे दोन शब्द वापरत असत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर त्यांचा तास असेल आणि कंटाळा आला की आम्ही, आज बाई किती वेळा विशेषतः आणि किती वेळा या ठिकाणी हे शब्द म्हणाल्या याची मोजदाद करत असू.
गणिताचे कापसे सर त्यांच्या खुसखुशीत बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते..एखाद्या विद्यार्थ्याला ओरडताना,”तुला काही कळते का? योग्य धोरणाने, विचार करत काम करावे.”असा सल्ला त्यांना द्यायचा असे. तो देताना ते त्यांच्या ठराविक शैलीमध्ये, “ए कळतं कै..धोरण धर धोरण.” असं म्हणत. त्यांचा हा डायलॉग विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता. इतका की बरेच जण बोलताना एकमेकांना “ए धोरण धर.” असे म्हणत. मलाही सवय होती असे म्हणायची. एकदा घरी काहीतरी करत असताना मी चुकलो आणि दादा मला म्हणाले, “धोरण धर धोरण.” दादांचं ते बोलणं ऐकून माझी हसून पुरेवाट झाली.
भूगोलात बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती असते.अमुक प्रदेशात अमुक प्रकारची जमीन, तमुक प्रदेशात तमुक प्रकारचे वृक्ष असे बरेच काय काय असते. हे शिकवताना भूगोलाच्या पिसे सरांना वाक्याचा शेवट ‘पहावयास मिळते’ या शब्दांनी करायची सवय होती. कधी कधी लागोपाठ पाच सहा वाक्यांचा शेवट ‘पहावयास मिळते’ने होत असे. सरही त्याअगोदरचे वाक्य बोलून एक छोटा पॉज घेत आणि विद्यार्थी नेमके त्याचवेळेस सरांसोबत एकसुरात पहावयास मिळते असे म्हणून वाक्य संपवत. एकदा या एकसुरात पहावयास मिळते म्हणायचा अतिरेक झाला. सर चिडले आणि पहिल्या बाकापासून सगळ्यांना बडवायला सुरुवात केली. माझं नशिब चांगलं म्हणा किंवा अजून काही, माझ्यासमोरच्या बाकापर्यंत येऊन सर थांबले आणि पाठीमागे बसणारे आम्ही ५-६ जण मारापासून वाचलो.
गणिताचे ढोले सर गणित सोडवायला देत आणि मग एकेक विद्यार्थ्याने सोडवलेले गणित तपासत बाकांच्या रांगांमधून फिरत असत. सरांनी आपली वही तपासावी अशी सगळ्यांचीच इच्छा असे. सरही कोणाला नाराज करत नसत. वही तपासली की त्यावर बरोबरची टिक करून “करेक्ट” असे ते म्हणत. कधी कधी बऱ्याच वह्या त्यांच्या पुढ्यात असल्या की सगळ्या वह्यांवर टिक करत करत “करेक्ट, करेक्ट” असे एक विशिष्ट टोनमध्ये म्हणत सर त्याचा फडशा पाडत. बऱ्याचदा ते “करेक्ट” हे “करेक्” असेच ऐकू येई. सरांनी आपली वही तपासली म्हणून मुलांना मात्र आनंद होई.
भूगोलाच्या ताठे सरांच्या तासाला तर हास्याचे फवारे उडत. सर भूगोल उत्तम शिकवतच पण एखाद्या खोडकर मुलाला हाक मारण्यासाठी ते विशिष्ट शब्द वापरत. मस्ती करणाऱ्या पोरांना ते “ए काठमांडू” “ए नरुट्या” अशा शब्दांनी पुकारत. तासाला लक्ष देणारी इतर मुले म्हणजे ‘भारत’ देश आणि त्यांच्यापेक्षा वेगळा असा तो खोडकर मुलगा नेपाळमधला ‘काठमांडू’ म्हणजे भारतापेक्षा वेगळा असा विचार या शब्दांच्या वापरामागे असावा की काय अशी आता शंका येते.
गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे एस. डी. पानसरे सर त्यांच्या टापटीपपणाबद्दल प्रसिद्ध होते. ते ओतूरवरून स्प्लेंडरवर शाळेत येत. व्यवस्थित इन केलेला शर्ट,पायात शूज, क्वचित चामड्याची चप्पल आणि रे बॅनचा काळा गॉगल असा त्यांचा वेष असे. सर शाळेत येताना कमीतकमी ७-८ पोरं तरी रोज त्यांची ऐटीतली सफारी वळून वळून बघत असत. पानसरे सरांचा टापटीपपणा त्यांच्या शिकविण्यातही डोकावे. मुलांना वहीमध्ये काहीतरी लिहून देत असताना त्याचा प्रत्यय येत असे. एखाद्या विषयाचे हेडिंग लिहिले की,
“डॅश करा. ती ओळ सोडून द्या. खालच्या ओळीला घ्या.” हे त्यांचे वाक्य हमखास ठरलेले असे.
त्यामुळे सगळ्याच मुलांच्या वह्या दिसायला चांगल्या दिसत. नंतर अभ्यास करतानासुद्धा वाचायला सोयीस्कर पडे.
व्ही. डी. पानसरे सरांना वर्गातल्या सगळ्या मुलांचा सातबारा माहित असायचा. ते स्वतः जुन्नर तालुक्यातले असल्यामुळे कोण कुठल्या गावचा, कुणाचे वडील काय करतात, कोणाची कसली शेती आहे याची यथासांग माहिती त्यांना असे. मग मुलांना वर्गात हाक मारतानाही ते त्यांच्या गावाच्या नावाने हाक मारत. मग ‘थोरांदळ्याचे गुंड’, ‘डेहण्याचे तिटकारे’,’भागडीचे उंडे’, ‘नळवण्याचे देशमुख’ अशी नावे घेऊन मुलांना हाक मारली जाई.
चायल सर पर्यवेक्षक असताना आम्हाला भूगोल शिकवायचे. बऱ्याचदा कामामुळे त्यांना तास घेणे जमत नसे आणि मग अभ्यासक्रम मागे राही. त्यासाठी शनिवार,रविवारी ते ज्यादा तास घेत. ह्या ज्यादा तासांना नोट्स देताना ते फळ्यावर लिहून देत. फळा पूर्ण भरला की दुसऱ्या वर्गात जाऊन त्या वर्गाच्या फळ्यावर लिहून ठेवत. मग मुलांची या वर्गातून त्या वर्गात पळापळ होत असे. चायल सरांना दोन्ही हातांनी लिहिता येत असे. त्यामुळे त्यांचा फळ्यावर लिहिण्याचा वेगही प्रचंड असे.
संस्कृतचे जोशी सर शिकवताना जरा मुलांची गडबड जाणवली की “यत्किंचतही आवाज नकोय.” या त्यांच्या वाक्यामुळे अजूनही लक्षात राहतात. संस्कृतचे काळ शिकवताना  ‘मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति’ हे ते एका विशिष्ट लयीत म्हणत आणि आमच्याकडूनही म्हणून घेत. आज इतक्या वर्षांनंतरही झोपेतून उठूनसुद्धा मी आणि माझे अनेक वर्गमित्र  ‘मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति’ ना चुकता म्हणू शकतो. 
त्रिकोणामिती शिकवताना साइन, कॉस, टॅन साठी वेगवेगळ्या कोनांच्या किंमती लक्षात रहाव्यात म्हणून दाते सर त्याचे कोष्टक बनवून कंपासपेटीमध्ये लावायला सांगत. ते कोष्टक आमच्याकडून म्हणूनही घेत. हे अगदी इंजिनियरिंग होईपर्यंत माझ्या लक्षात होते. 
गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे साबळे सर फळ्यावर लिहिताना वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे अक्षर फळ्यावर आणि कागदावर तितकेच सुंदर असे. आकृत्या अतिशय रेखीव असत. एखाद्या विद्यार्थ्याने फळ्यावरचे वाचताना चूक केली तर त्या विद्यार्थ्याला, “तुझ्या डोळ्यात काय शेंबूड भरलाय काय रे?” असे म्हणून मोकळे होत. सबंध वर्ग मग हसत बसे. आजकालचे शिक्षक असे बोलले तरी विद्यार्थ्यांच्या आधी पालक तक्रार करतील.
साबळे सरांसारखेच बेल्हेकर सरदेखील वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरत. तेही फळ्यावर सुंदर आकृत्या काढून विषय सोपा करून समजावत. बेल्हेकर सरांना परफ्युमची फार आवड असे. ते आमच्या वर्गाच्या शेजारून जरी गेले तरी आमच्या वर्गात घमघमाट येत असे. त्यांच्या परफ्युमच्या आवडीची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असे.
इंग्रजीचे माकूणे सर हा विषय इंग्रजीमध्येच शिकवत. आम्हाला कायम इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन देत. आज आम्ही जे काही बरेवाईट इंग्रजी बोलतो त्यासाठीची पायाभरणी काहीप्रमाणात त्यांनीच केली होती. माकूणे सर आमच्या वर्गाचे प्रिय असण्यासाठी अजूनही एक कारण होते. आमच्या वर्गात सगळ्यांनाच लिहायचा कंटाळा होता. माकूणे सरांचा नियम असा असे की तुम्हाला एखादा शब्द नविन वाटला तरच त्याचा अर्थ वहीत लिहून घ्या. त्यामुळे सहसा आमच्या इंग्रजीच्या वह्या फार भरत नसत. सरांना फळा स्वच्छ लागे. त्यांच्या अगोदर तास असलेल्या शिक्षकाने फळा साफ केलेला नसेल तर त्यांची चिडचिड होई. मग चार पाच मिनिटे फळा व्यवस्थित पुसून मगच ते शिकवायला सुरुवात करत. शिकवताना थोडी गडबड ऐकू आली तर, “You chit-chatters. Don’t murmur.” असे म्हणून मुलांना गप्प करत. 
कॉलेजला असताना फिजिक्स शिकवायला डुंबरे सर होते. त्यावेळेस डुंबरे सर आणि इंगळे सर हे दोघे ज्युनिअर कॉलेजला फिजिक्सचे दादा लोक होते. दोघांनी कधीच शिकवताना हातात पुस्तक घेतल्याचं मला आठवत नाही. डुंबरे सर एखादा मुद्दा शिकवून झाला की तो मुलांना समजलाय की नाही याची खात्री करण्यासाठी सतत “ओके?” असा प्रश्न विचारायचे. त्यातला ओ बऱ्याचदा सायलेंट असायचा. ऐकायला फक्त “के?” एवढंच यायचं. त्यांच्या आवाजात ते ऐकायला मजा यायची.
अकरावीला फिजिक्सला चव्हाण सर होते. तेही पुस्तक न घेता शिकवायचे. शिकवताना “सोपं सोपं असतं रे सगळं.” असं म्हणून ते मुलांना धीर देत. एकदा काहीतरी झाले आणि शिकवताना ते चुकले. आपण चुकलोय हे लगेच त्यांच्या लक्षातही आले आणि चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वर्गात कोणाकडे पुस्तक आहे का याची चाचपणी केली. एका मुलाने दिलेले पुस्तक घेऊन त्यांनी आपली चूक सुधारली आणि आपली चूक मान्यदेखील केली. तेवढयात आमचा वर्गमित्र रोहन कबाडी त्यांना म्हणाला,
“जाऊ द्या हो सर. सोपं सोपं असतं सगळं.”

हे ऐकून त्यांचा पारा चढला आणि रोहनला वर्गाबाहेर जावे लागले.

आज इतक्या वर्षांनंतरही हे शिक्षक अजूनही लक्षात राहिले याला कारण त्यांची शिकवण्याची पद्धत. ज्यांचे नाव लिहिले नाही ते लक्षात नाहीत असे नाही पण हा ब्लॉग लिहिण्याच्या ओघात वर नमूद केलेल्या शिक्षकांची आवर्जून आठवण झाली. तुमचेही शाळेतले असे कोणी शिक्षक असतील तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.