जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी
जेम्स बॉंडचा एकही चित्रपट पाहिला नाही असा माणूस सापडणे तसे अवघड आहे. आणि जेम्स बॉंडच्या चित्रपटाची ट्यून माहित नसलेला माणूस सापडणे त्याहूनही अवघड आहे. १९६२ साली डॉ. नो हा जेम्स बॉंड मालिकेतला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला वाजणारी ही ट्यून पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. पण ह्या ट्यूनचे मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात आहे याची फार कमी लोकांना माहिती आहे.
काय आहे ह्या ट्यूनच्या जन्माची कहाणी?
जेम्स बॉंडची जगप्रसिद्ध ट्यून ब्रिटिश संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांनी संगीतबद्ध केली आहे. जेम्स बॉंड चित्रपट मालिकेचे निर्माते अल्बर्ट ब्रॉकोली यांनी एक दिवस संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांना फोन करून बोलावून घेतले. ब्रॉकोली यांनी तेव्हा नुकतेच इयन फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध जेम्स बॉंड या कादंबरी संग्रहाचे हक्क विकत घेतले होते. या कादंबरी संग्रहावर आधारीत चित्रपटांची मालिका काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यातील पहिला चित्रपट डॉ.नो असणार होता. या चित्रपटासाठी संगीत द्यायला तुला आवडेल का असा प्रश्न ब्रॉकोली यांनी नॉर्मन यांना विचारला. तोपर्यंत नॉर्मन यांनी जेम्स बॉंडच्या रहस्य कथांबद्दल फक्त ऐकले होते.
मग चित्रपटाचे दुसरे निर्माते हॅरी साल्ट्समन यांनी नॉर्मन यांना सहकुटूंब चित्रपटाचे शूटिंग सुरु असलेल्या जमैकाला येण्याचे निमंत्रण दिले. नॉर्मन यांना नकार देणे अवघड होते. नॉर्मन जमैकाला गेलेसुद्धा. चित्रपटाची कथा त्यांच्या हातात पडली आणि त्यांनी संगीतावर काम करायला सुरुवात केली. नॉर्मन त्यावेळेस ज्युलियन मूर यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विजेते लेखक सर व्ही.एस. नायपॉल यांच्या हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास या गाजलेल्या कादंबरीवर आधारित एका संगीतपटावर काम करत होते. त्याच्या एका ट्यूनमध्ये त्यांनी विविध भारतीय वाद्यांचा उपयोग केला होता. हा संगीतपट पुढे कधी प्रदर्शित झालाच नाही. नॉर्मन यांनी मग आपल्या जुन्या ट्यून्समधून ही ट्यून शोधून काढली. त्याचे शब्द असे होते.
“I was born with this unlucky sneeze.
“And what is worse I came into the world the wrong way round.
“Pundits all agree that I am the reason why my father fell into the village pond and drowned.”
ह्याच ट्यूनमध्ये थोडासा बदल करून त्यांनी जेम्स बॉंडची प्रसिद्ध ट्यून बनवली. चित्रपट निर्मात्यांना देखील ती आवडली. त्यांनी लगेचच जॉन बॅरी या एका तरुण संगीतकाराला निमंत्रित करून हि ट्यून त्याच्याकडून पुन्हा अरेंज करून घेतली. आणि ह्या ट्यूनने नंतर इतिहास घडवला. जेम्स बॉंडचा चित्रपट आणि ही ट्यून हे जणू समीकरणच बनले. जॉन बॅरी यानेच ही धून संगीतबद्ध केली असे अनेकांना वाटत राहीले पण खरे संगीतकार मात्र नॉर्मन हेच होते. पुढे बॅरी यांनी हि धून आपणच लिहिली असा दावादेखील केला. पण अखेरीस कायद्याने नॉर्मन यांनाच न्याय दिला.
मराठी चित्रपट अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. दाक्षिणात्य अभिनेते अजित यांनी हा व्हिडीओ अतुल कुलकर्णींना पाठवल्याचं त्यांनी नमूद केले आहे. हा व्हिडीओ इंग्रजीमध्ये आहे म्हणून त्या कहाणीचा मराठी स्वैर अनुवाद करायचा हा खटाटोप. सदर व्हिडीओची युट्यूब लिंक सोबत देत आहे.