शिवजयंती


नमस्कार. बऱ्याच लोकांना माहित आहेच की मी मुळचा जुन्नरचा. जुन्नरची खरी ओळख म्हणजे शिवनेरी किल्ला. राजांचंजन्मस्थान. ज्या योद्ध्याने अवघं मराठी साम्राज्य उभारलं त्याचा जन्म जुन्नरमध्ये झाला होता. आणि याच गोष्टीमुळे मला मी जुन्नरचा आहे याचा अभिमान वाटतो.
अगदी लहान असल्यापासून दरवर्षी शिवजयंती साजरी होताना पाहत आलोय. १२ वी झाली आणि जुन्नर सोडावं लागलं. पण दरवर्षी १९ फेब्रुवारीला नक्की वाटतं की आज जुन्नरमध्ये असायला हवं होतं. आता तर नुसत्या बातम्या वाचतो वर्तमानपत्रामध्ये. अजूनही बऱ्याच गोष्टी अगदी तशाच्या तश्या आठवतात. आदल्या दिवशीपासून सुरु होणारी ती तयारी. वेगवेगळ्या गावांहून येणाऱ्या मशाली, पंचायत समितीमध्ये अगदी पहाटेपासून वाजणारे ते पोवाडे, आणि ते ऐकून अंगावर येणारा काटा, अंगात तात्पुरती का होईना संचारणारी विरश्री. सगळं कसं काल घडल्यासारखं वाटतं. अगदी दरवर्षी नाही जमलं तरी बऱ्याचदा सकाळी लवकर तयार होऊन दादांबरोबर गडावर जात असे. साधारणपणे साडेनऊ वाजता आकाशात हेलिकॉप्टरची घरघर ऐकू यायची. आणि मग मुख्यमंत्री आले म्हणून गडावर सगळ्यांची लगबग सुरु व्ह्यायची. मुख्यमंत्री आले की त्यांच्या स्वागताला अगदी हवशे, नवशे सगळेच असायचे. राजांच्या आणि जिजाऊंच्या पुतळ्याची पूजा केल्यानंतर फोटोमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी दिसावं म्हणून सगळ्यांची ती धडपड पाहून हसू यायचं.
ते आटोपलं की पायथ्याला वरच्या शाळेच्या मैदानावर किंवा अगदी अलीकडे मार्केटयार्डाच्या आवारात सगळ्या मंत्र्यांची सभा आणि मग सभेमध्ये आश्वासनांची खैरात होत असे. अव्वाच्या सव्वा रक्कम शिवनेरीच्या विकासासाठी कबूल केली जात असे. त्यातली काही अगदी अलीकडे मिळाली म्हणे (आणि गडाच्या विकासासाठी वापरालीदेखील गेली हे विशेष).
एकदा हे मंत्री गेले की मग वेध लागत ते रात्री शाळेच्या मैदानावर होणाऱ्या शोभेच्या दारूकामाचे. लहान असताना दादांबरोबर आणि जरा कळायला लागल्यानंतर मित्रांबरोबर तिकडे हमखास जात असू. मित्रांबरोबर असताना अंधारात कोणाची तरी टिंगल करून हसायला केवढी ती मजा यायची. पण हीच मजा एका मित्रावर उलटली होती एकदा. अर्थात छोट्या गावात सगळेच एकमेकांना ओळखत असल्याने प्रकरण थोडक्यात निभावलं होतं. आणि यानंतर नेहरू बाजारात मनोरंजनाचे कार्यक्रम असत. त्यांना मात्र मला कधीही जाता आलं नाही. घरी लवकर येण्याची तंबी म्हणा किंवा अजून काही म्हणा.
तर हा शिवजयंतीचा एक दिवस. राजांचा जन्मदिवस म्हणून अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. अजूनही होतो. तितक्याच दिमाखात, डौलात. आज सकाळी दादांना फोन केला तेव्हा ते म्हणाले अरे आज शिवजयंती. पटकन सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या. काही वेळासाठी मन परत मागे गेलं आणि वाटलं नुसत्या बातम्या वाचण्यापेक्षा जाऊयात एकदा जुन्नरला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.