तू दारू नाय पिली तर घाबरतो कशाला?

परवा एका नातेवाईकाला पोहोचविण्यासाठी एअरपोर्टला गेलो होतो. इंटरनॅशनल फ्लाईट असल्याने पाहुण्यांना सोडून माघारी यायला १:३०-२:०० झाले. त्यातच मानखुर्दजवळ एवढ्या रात्रीही ट्रॅफिक जॅम झालं. इतक्या रात्री ट्रॅफिक का याची चौकशी केल्यावर कळलं की पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शुक्रवारची रात्र असल्याने पार्टी करून येणाऱ्या तळीरामांना धरून त्यांची तपासणी करण्याचं काम चाललं होतं. हळूहळू आमचीही गाडी पुढे सरकत होती. आमच्या गाडीच्या पुढे असणारी गाडी पोलिसांच्या समोर गेली. गाडीत २-३ तरुण असल्याचे मागून दिसले. ते पिऊनच आले होते. पोलिसांनी त्यांना गाडीतून बाहेर यायला सांगितले. ब्रेथ अॅनालायझर पुढे करून एक पोलीस तरुणाला म्हणाला,
“ह्याच्यात फुक मार.”
तो तरुणही या असल्या तपासण्यांमध्ये तयार असावा. त्याने फुंकण्याच्या ऐवजी हवा आत घेतली.साहजिकच पोलिसाला काही सिग्नल मिळाला नाही.
“अरे आत वढू नको.फुक त्याच्यात.” पोलिसाने त्या तरुणाला पुन्हा सांगितले.
त्याने पुन्हा एकदा हवा आतच ओढली.पुन्हा काही सिग्नल मिळाला नाही. पोलिस वैतागला.
“अरे बाळा, हवा आत नको ना वढू. ह्याच्यात फुक मार.तू दारू नाय पिली तर घाबरतो कशाला?”
“अहो मी तेच करतोय मामा.नाय जमत तर काय करू. तुम्ही दाखवा एकदा.” तरुणाने पोलिसाला विनंती केली.
पोलिसानेही लगेच त्याच्या हातातून ब्रेथ अॅनालायझर घेत त्यात फुंकर मारली. त्याने फुंकर मारताच अॅनालायझरचा अलार्म जोरात वाजला. तो वाजताच ते तरुण हसायला लागले. पोलिसाचा जोडीदार असलेला दुसरा पोलिस डोक्यावर हात मारत म्हणाला,
“तू कशाला आय घालायला फुकला का त्याच्यात?”
“आयला राव माझ्या लक्षातच आलं नाही. आता काय करायचं?”
“काय करतो आता.सोड त्याला. इथून पुढं आपली गप्प घाला.”
“जा बाबा.” म्हणत त्या पोलिसाने तरुणांना जायची परवानगी दिली.
आपली युक्ती यशस्वी झाल्याचे कळून ते तरुणही खुशीत पुढे निघून गेले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.