काटेकर

जरा उशीरच झाला पण काल सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन पाहून संपवला. नवाझुद्दीन, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, राधिका आपटे असे बाप लोक असताना ही मालिका विशेष असणार यात शंका नव्हती. ट्रेलर पाहून ज्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या संपूर्ण सिझन पाहिल्यानंतर पूर्णदेखील झाल्या. 

सैफ अली खानने रंगवलेल्या सरताज सिंग ह्या पोलिस अधिकाऱ्याला येणाऱ्या एका निनावी फोनवरून मालिकेचे सारे कथानक उलगडत जाते. मालिकेचे कथानक मुंबईत घडल्याचे दाखवल्याने अनेक पात्रे मराठी आहेत. या सगळ्यांत सरताज सिंगबरोबर असणारा हवालदार काटेकर मला भावला. काटेकरची भूमिका मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने केली आहे. भूमिकेचे सोने करणे म्हणजे काय हे जितूने या भूमिकेतुन दाखवून दिले आहे.
वेब सिरीजमध्ये सेन्सॉरचा प्रश्न येत नसल्याने आणि अंडरवर्ल्डशी निगडीत कथानक असल्याने ह्या मालिकेत शिव्यांचा भरणा आहे. काहीतरी धक्कादायक घडणे, आपल्या नको असलेली गोष्ट करावी लागणे, न आवडणारा माणूस अचानक समोर येणे, आश्चर्याचा धक्का बसणे या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी काटेकर एकच वाक्य वापरत असतो. ते वाक्य म्हणजे, ‘आई झवली’. हे वाक्य बोलण्याची त्याची स्टाईल इतकी बाप आहे ना की पाहणाऱ्याला काटेकर म्हणजे आपणच आहोत की काय असे वाटून जाते. आपल्यातले अनेकजण रोजच्या व्यवहारात बोलताना शिव्यांचा सर्रास वापर करतात. मी देखील मित्रांबरोबर बोलताना शिव्या वापरतो. बोलत असताना वर लिहिलेल्या गोष्टींना प्रतिक्रिया म्हणून अशाच काही शिव्या वापरल्या जातात. त्यातलीच ही ‘आई झवली’ असल्यामुळे कदाचित काटेकर माझ्यासारख्या अनेकांना आपला वाटला.
 
सरताजसाठी काम करणारा काटेकर आपल्या बायकोपेक्षा आपल्या कामाशी आणि साहेबांशी जास्त बांधील आहे. एका प्रसंगात बायकोबरोबर श्रुंगार करणारा काटेकर सरताज साहेबांचा फोन आला म्हणून तसाच उठून ठाण्यात जातो तेव्हा त्याची कामावरची निष्ठा दिसून येते. आपल्या पोलिसाच्या नोकरीमुळे आपल्या बायकामुलांना वेळ देता येत नाही म्हणून त्याचे मन त्याला खाते. मात्र तक्रार न करता काटेकर कर्तव्य बजावण्याला प्राधान्य देतो. आपल्या साहेबाच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या तणावामुळे वाईट वाटून साहेबाने बायकोशी पुन्हा एकदा जुळवून घ्यावे म्हणून तो साहेबाची विनवणी देखील करतो. एका केसमध्ये साहेबाची बाजू बरोबर असूनही त्याचा बकरा केला जातोय हे लक्षात येऊन त्याला वाईटही वाटते. मात्र भ्रष्ट व्यवस्थेमध्ये हे असेच चालू राहणार असे सांगत तो साहेबाची समजूतही काढतो. साहेबाचे नशीब फळफळावे म्हणून त्याला एक मोठी केस मिळणे कसे गरजेचे आहे हे त्याला सांगत राहतो. तणावाच्या वेळी एखादं हलकंफुलकं वाक्य बोलून साहेबाचा आणि स्वतःचा मूडही ठीक करतो. बाकी स्टारकास्ट इतकी तगडी असताना, भूमिका फारशी महत्वाची नसतानादेखील काटेकर प्रेक्षकांना आपला वाटतो. म्हणूच संपूर्ण मालिकेत साईड रोल करणारा काटेकर मालिका संपल्यानंतरही लक्षात राहतो.
 
मागे जितेंद्रचे दोन स्पेशल पाहिले तेव्हा त्याच्याबद्दल लिहिले होते. आज काटेकर पाहून पुन्हा एकदा त्याच्याबद्दल लिहावेसे वाटले. ही संपूर्ण मालिकाच कशी भारी आहे हे अनेकांनी लिहिले आहे, म्हणून त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही. अजून पाहिली नसेल तर नक्की पहा. काटेकर नक्की आवडेल. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.