भारतीय टेनिस आणि ऑलिंपिक २०१२

नमस्कार. एक टेनिसप्रेमी म्हणून आणि एक भारतीय म्हणून गेल्या २ आठवड्यांमध्ये भारतीय टेनिसमध्ये ऑलिम्पिकला कोणता संघ पाठवायचा यावरून जो काही वादंग उठला त्याबद्दल जरा जास्तंच वाईट वाटलं. भूपती आणि पेस या दोघांचं टेनिसचं कौशल्य वादातीत आहे. ते दोघे एकत्र होते तेव्हा त्यांनी जे काही केलं ते इतर कोणत्याही भारतीय जोडीला नजिकच्या भविष्यात जमेल असं मला तरी वाटत नाही. या दोघांमध्ये वाद झाले आणि ते वेगळे झाले. दोघांनी आपापले जोडीदार निवडून जमेल तसं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं. मध्ये एकदा पुन्हा एकत्र आले. ऑलिम्पिकसाठी खेळले. पण ते जिंकणार नाहीत हे एखाद्या शेंबड्या मुलानेदेखील सांगितलं असतं. आणि नंतर पुन्हा ते वेगळेदेखील झाले. त्यांच्यातील वाद म्हणा किंवा इगो म्हणा वाढत गेला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय टेनिस संघटनेने या दोघांना पुन्हा एकदा संघ म्हणून पाठवायचा जो काही निर्णय घेतला तो मुळातच चुकीचा होता असं माझं मत आहे. विशेषतः भूपती आणि बोपण्णा ही जोडी चांगली खेळत असताना. केवळ पेस भूपती अगोदर एकत्र होते म्हणून त्यांनी आत्तादेखील एकत्र येउन देशासाठी खेळावं हा युक्तिवाद टेनिस संघटनेने करायला नको होता. देशप्रेम हे आहेच पण केवळ देशप्रेम म्हणून गेली काही वर्षें एकत्र न खेळलेल्या लोकांनी एकत्र खेळावं आणि देशासाठी पदक जिंकावं अशी अपेक्षा धरणचं मुळात चुकीचं आहे. एक व्यवस्थापन म्हणून भारतीय टेनिस संघटनेने प्रँक्टिकली निर्णय घेण्याची गरज होती. जे त्यांना उशीरा का होईना सुचलं. त्याबद्दल बरं वाटलं.
पण हे सगळं घडत असताना पेस आणि भूपती या दोघांनी एकमेकांवर जी काही चिखलफेक केली त्याचं या जोडीचा चाहता म्हणून मला फार वाईट वाटलं. त्यांच्यात वाद आहेत हे सगळ्या जगाला माहीत असताना इतक्या खालच्या पातळीवर या दोघांनी जायला नको होतं (उदा. भूपतीने पेसला पाठीत वार करणारा म्हणणं, पेसने स्वतःच्या देशप्रेमाचा दाखला देणे, कमी मानांकन असलेल्या खेळाडूबरोबर खेळायला नकार देणं). आणि नेहमीप्रमाणे भारतीय मिडीयाने हवा तसा मसाला पुरवला.यानंतरही पेसने अजून आपण समाधानी नसल्याचं जाहीर करून स्वतःच्या प्रवेशावर अनिश्चितता निर्माण करून ठेवली.
माझ्या मते सगळ्यांनी जे झालं त्याचा विचार न करता आता तयारीला लागलं तर जास्त बरं होईल. काय सांगावं पदकांचा दुष्काळ असलेल्या भारताला एखादं पदकही मिळून जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.