पुण्याच्या गॅब्रिएलला ईव्ही धोरणाचा फायदा होणार का?

शेअर बाजारात ऑटो क्षेत्रात गुंतवणूक करणारे बरेच लोक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर गाड्यांचे पार्टस बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक करत असतात. गाड्यांची मागणी वाढली की पार्ट्सची मागणी देखील वाढते.याचा अर्थ, पार्टस बनवणाऱ्या कंपन्यांची विक्री आणि नफा वाढतो. याचा परिणाम या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीवरही दिसून येतो. हा परिणाम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा दोन्ही प्रकारचा असू शकतो.

यात काही कंपन्या अशा असतात की ज्यांची ते पार्टस बनविण्यात मक्तेदारी असते किंवा मार्केटचा बराचसा हिस्सा त्यांच्याकडे असतो. अशीच एक कंपनी म्हणजे गॅब्रिएल इंडिया. ही कंपनी गाड्यांना लागणारे सस्पेंशन ज्याला आपण शॉक अबसॉर्बर म्हणतो ते बनवते. दुचाकी, तीनचाकी, पॅसेंजर कार्स, सिव्ही म्हणजे कमर्शियल व्हेईकल्स आणि रेल्वे बनवणाऱ्या जवळपास सगळ्या आघाडीच्या कंपन्या गॅब्रिएलचे प्रॉडक्ट्स वापरतात.

Image – Company Website

कंपनीच्या ग्राहकांची यादीच द्यायची झाली तर ती खालीलप्रमाणे –

१. अशोक लेलँड
२. बजाज
३. डेम्लर
४. फोर्स मोटर्स
५. जनरल मोटर्स
६. होंडा
७. भारतीय रेल्वे
८. इसुझु
९. कायनेटिक
१०. महिंद्रा
११. मान ट्रक्स
१२. मारुती
१३. प्याजिओ
१४. रेनो
१५. रॉयल एनफिल्ड
१६. सुझुकी
१७. टाटा मोटर्स
१८. टोयोटा
१९. टिव्हीएस
२०. फ़ोक्सवॅगन
२१. वोल्वो
२२. व्हील्स इंडिया
२३. यामाहा

Image – Company Website

याबरोबरच सध्या चर्चेत असणाऱ्या ईव्ही सेगमेंटमधील खालील कंपन्यांनासुद्धा गॅब्रिएल आपले प्रॉडक्ट्स विकते.

१. एथर एनर्जी
२. ओकिनावा
३. महिंद्रा इलेक्ट्रिक

ओला इलेक्ट्रिकच्या स्कुटरलासुद्धा गॅब्रिएलचेच सस्पेंशन असणार आहे अशी बातमी आली आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीवरून कंपनीच्या प्रॉडक्टची गुणवत्ता काय दर्जाची असेल याचा अंदाज लावता येईल.  दुचाकी आणि तीनचाकीमध्ये कंपनीचा मार्केटशेअर अनुक्रमे २५%,६५%, पॅसेंजर कार्समध्ये १८% तर कमर्शियल व्हेईकल्समध्ये हाच मार्केटशेअर तब्बल ७५% एवढा आहे. कंपनीच्या एकूण महसूलापैकी ८०% हुन अधिक महसूल OEM  केलेल्या विक्रीतून निर्माण होतो.

Image – Company Website

याबरोबरच परदेशातील कंपन्यांना सुद्धा ही कंपनी आपले प्रॉडक्ट्सची विक्री करते. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्या चिनी सप्लायरवर असलेले अवलंबित्व म्हणजेच डिपेंडंसी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नुकतेच कंपनीने रशिया, नेदरलँड्स, थायलंड आणि इंडोनेशियामध्ये नवे ग्राहक मिळवले आहेत. ही बाबसुद्धा कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते. कंपनीचा एक्स्पोर्ट म्हणजेच निर्यात बिझनेस हळूहळू वाढतो आहे.

Image – Company Website

कंपनी फक्त आपले प्रॉडक्ट्स विकून थांबत नाही तर त्यासाठी आफ्टरमार्केट सपोर्टदेखील पुरवते.यासाठी कंपनीने ५०० डिस्ट्रीब्युटर्स आणि तब्बल १०,००० रिटेलर्सचे नेटवर्क प्रस्थापित केले आहे. आफ्टरमार्केटमध्येही कंपनीचा शेअर ४०% एवढा आहे.

कंपनीचा महसूल आणि नफा प्रत्येक वर्षी वाढतो आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने शेअर्स प्लेज केलेले नाहीत. ते उलट आपला वाटा वाढवत आहेत. यावरून प्रमोटर्सला आपल्या कंपनीबद्दल, आपल्या प्रॉडक्ट्सबद्दल विश्वास असल्याचा संदेश जातो. कंपनीचा डिव्हिडंड रेकॉर्डही चांगला आहे.  याबरोबरच कंपनीचे असेट्स दर वर्षी वाढत जात आहेत. येणाऱ्या काळात ईव्ही, स्वतःचे वाहन बाळगण्याची इच्छा असणाऱ्या लोकांची वाढत जाणारी संख्या या बाबी कंपनीच्या पथ्यावर पडू शकतात.

Image – Company Website
Image – Company Website

आता थोडं कंपनीच्या शेअरविषयी. कंपनीचा शेअर  गेल्या एक वर्षापासून १०० ते १२५ रुपयांच्या दरम्यान रेंगाळतो आहे. मार्च २०२० च्या पडझडीत शेअर अगदी ४० रुपयांपर्यंत पडला होता. तिथून पुन्हा मजलदरमजल करत मार्चच्या पहिल्या आठवड्यात १३४ चा टप्पा गाठून आता शुक्रवारी ११५ रुपयांवर बंद झाला आहे. दीर्घकाळासाठी ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा शेअर एक चांगला पर्याय ठरू शकतो.

टीप – हा लेख म्हणजे गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आपापल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.