परवा एका मित्राला फोन करून विचारलं,
“कुठे आहेस रे?”
तो म्हणाला, “अटलांटामध्ये.”
मी उडालोच. काल परवा तर हा पुण्यात होता. एकदम अमेरिकेत कसा गेला असेल?
“अरे तू अमेरिकेत केव्हा गेलास?”
“अमेरिकेत नाही रे. वाकडला आहे. अटलांटा आमच्या बिल्डिंगचं नाव आहे.” त्याने शांतपणे उत्तर दिलं.
ते ऐकून मी कपाळावर हात मारून घेतला.
एकदा कुठल्याशा जाहिरातीच्या बोर्डावर ‘टेनेसी’ दिसलं म्हणून उत्सुकता चाळवली गेली. नक्की काय आहे म्हणून शोधलं तर कळलं हा तळेगावातला ‘टेनेसी’ नावाचा गृहप्रकल्प आहे. तिथले लोक ऐटीत सांगत असतील,
“आम्ही टेनेसीला राहतो.”
नंतर टेनेसी फ्रॉम तळेगाव दाभाडे हे सांगताना त्यांना किती जीवावर येत असेल याचा विचारही माझ्या मनाला शिवला.
पिंपळे सौदागरला रोझ नावाने सुरु होणाऱ्या अनेक बिल्डिंग्ज आहेत. रोझ व्हॅली, रोझ आयकॉन, रोझ काऊंटी, रोझलँड अशी अनेकानेक नावं. फेब्रुवारी महिन्यात रोझ डे च्या दिवशी या बिल्डिंग्जच्या बाहेर युवक युवतींची गर्दी होत असेल का? असा भाबडा प्रश्न मला पडला. जरा चौकशी केली तर कळलं या सोसायट्यांमध्ये गुलाबाची झाडं नावालासुद्धा नाहीत. नुसतंच बिल्डिंगच नाव रोझने सुरु होतंय.
अजून एका बिल्डिंगचं नाव होतं ऑर्किड. तिथे राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. आतमध्ये शिरल्यापासून माझी शोधक नजर ऑर्किडची फुलं, फुलं नाही तर किमान झाडं कुठं दिसतायत का बघत होती. नाहीच सापडलं. मी बायकोला म्हटलं,
“आपण त्यांना विचारुयात का? ऑर्किड का नाही दिसत?”
“मी तुझ्याबरोबर पुन्हा कुठेही येणार नाही.” अशी धमकी तिने दिल्याने मी आपला गप्प राहिलो.
अशीच गोष्ट डॅफोडिल्स नावाच्या बिल्डिंगची. तिथे राहणाऱ्या मित्राकडे गेलो. बायको बरोबर नव्हती म्हणून मनाचा हिय्या करून विचारलंच,
“इथे डॅफोडिल्सची फुलं नाही दिसत रे कुठं?”
“का? काय झालं?” त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.
“नाही बिल्डिंगचं नाव डॅफोडिल्स आहे म्हणून म्हटलं विचारावं.” असं मी बोललेलं नेमकं त्याच्या बायकोने ऐकलं. माझ्याकडे विचित्र नजरेने पहात ती आतमध्ये गेली ती पुन्हा बाहेर आलीच नाही.
प्रत्येक विवाहित पुरुषाप्रमाणे मीही बायकोबरोबर भाजी आणायला जात असतो. (भाजी ती घेते, मी ड्रायव्हर म्हणून जातो.) बाजार भरतो तिथे जवळच एका बिल्डिंगचं नाव आहे आकाशगंगा. बिल्डिंग तशी बरीच जुनी आहे. जरा चौकशी केली तेव्हा असं कळलं की त्या परिसरात इतर काहीही नव्हतं तेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली.
“आजूबाजूला इतर काहीही नसताना बांधली गेलेली ही बिल्डिंग खूप लांबून दिसत असेल म्हणून तर आकाशगंगा असं नाव नसेल ना दिलं?” बटाटे घेत असलेल्या बायकोला मी प्रश्न विचारला. तिने हातातला बटाटा मला फेकून मारण्याची फक्त ऍक्शन केल्यामुळे मी वाचलो. भाजीवाल्याची तेवढीच करमणूक झाली. तिथून निघताना
“सर तुम्ही म्हणता ते कदाचित बरोबर पन आसल बरं का.” असं म्हणत त्याने मला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
पिंपळे सौदागरमध्ये एका बिल्डिंगचं नाव आहे सॉलिटेअर. नाव भारदस्त म्हणून बिल्डिंगही तशीच असेल असं मला वाटलं. तिथे राहणाऱ्या एका मित्राकडे गेलो तेव्हा तसं काही अजिबात दिसलं नाही. त्याला म्हटलं,
“अरे तुमच्या बिल्डिंगचं नाव तर सॉलिटेअर आहे आणि प्रत्यक्षात मात्र फारच वाईट परिस्थिती दिसतेय.”
त्याच्या घरून चहासुद्धा न घेता मला निघावं लागलं. एक महिना झाला त्याला रोज फोन करतोय पण तो अजून काही माझा फोन उचलत नाहीये. उचलेल याची आशाही मी सोडून दिली आहे.
हिंजवडीमध्ये मेगापोलीस नावाचा एक गृहप्रकल्प आहे. तिथे नावाप्रमाणेच सगळं अवाढव्य आहे. जणू काही एखादं छोटं शहरच. अशीच गोष्ट 24K ग्लिटेराटी नावाच्या प्रकल्पाची. गेटमधून आत शिरल्यापासून ते अगदी घरांपर्यंत फक्त आणि फक्त झगमगाट आहे. २४ कॅरट सोनंच चमकतंय जणू. (बिल्डरने पैसे सोन्याच्या दराने घेतले असणारेत याची मला खात्री आहे.)
डेक्कन जिमखान्याच्या मैदानाला अगदी लागूनच ‘पॅव्हिलियन’ नावाची बिल्डिंग आहे. बिल्डिंगला अतिशय चपखल नाव दिल्याबद्दल गेली अनेक वर्षे तिथून जाताना मी त्या बिल्डरचं मनातल्या मनात कौतुक करतो. तिथे राहणारे लोकही अगदी टेचात आम्ही पॅव्हिलियनला बसून मॅचेस बघतो असं सांगत असतील.
एका मित्राच्या बिल्डिंगचं नाव पेबल्स आहे. त्याच्याकडे गेलो असताना गार्डनमध्ये खरोखर छोटेछोटे दगडगोटे दिसले. बिल्डरने म्हणे बिल्डिंगच्या नावाला साजेसं काहीतरी हवं म्हणून एका लँडस्केपिंग कंपनीकडून खास हे दगडगोटे विकत घेतले म्हणे. ते कळताच बायको म्हणाली,
“नशिब इथे हे दगडगोटे दिसले नाहीतर आज तुझ्यामुळे अजून एका ठिकाणी माझी इज्जत गेली असती.”
मी आपला गालातल्या गालात हसत राहिलो.
लोकांच्या बिल्डिंगच्या नावाची खिल्ली उडवण्यात धन्यता मानणाऱ्या मला लवकरच ‘कर्मा इज अ बीच’ चा अनुभव आला. गावाकडे असलेल्या एका प्लॉटवर बिल्डरकडून बिल्डिंग बांधून घ्यावी म्हणून त्याला भेटायला गेलो. सगळा व्यवहार ठरला अखेरचा मुद्दा आला तो बिल्डिंगच्या नावाचा. माझी जागा असल्यामुळे मी म्हटलं,
“माझं नाव येईल असं नाव देऊ. गुंड पार्क, गुंड विहार, गुंड आयकॉन अशा धरतीवर काहीतरी.”
माझं बोलणं ऐकून बिल्डरने व्यवहार मोडला. मी अजूनही आपलं काय चुकलं याचा विचार करतोय. कुणाला माझ्या प्लॉटवर बिल्डिंग बांधण्यात स्वारस्य असेल नक्की सांगा.
बोनस –
अनेक बंगल्यांची नावेही मजेशीर असतात. पुण्यात एका बंगल्याचं नाव आहे, ‘येना’
एक दिवस सहज गेलो गेट उघडून आतमध्ये. आत शिरताच बांधून ठेवलेला कुत्रा इतक्या जोरात भुंकला की आलो तसा गेटबाहेर निघालो. खिडकीतून कुणीतरी डोकावून पाहत असल्याचं दिसलं म्हणून मग बाहेरूनच ओरडलो,
“बंगल्याचं नाव बदलून येनाऐवजी जाना का नाही करत तुम्ही?”
अर्थात त्यांच्या प्रतिक्रियेची वाट न पाहता मी पळ काढला हे सांगायला नकोच.