बुवाबाजीचे अर्थकारण

“आपली तारीख किती आहे? २३ एप्रिल ना??
कॅबमध्ये बसल्या बसल्या ड्रायव्हरचा फोनवर बोलतानाचा आवाज कानावर पडला.
“सर ट्रिप स्टार्ट करतो.” एवढं मला सांगून तो पुन्हा फोनमध्ये गुंतला.
“चालतंय ना मग. मी माझ्या बाजूनी सगळं घेतो उरकून. २३ ला सकाळी ९ ते ११ ची वेळ ठरवू. मी महाराजांना पण तसं सांगून ठेवतो. ओके,ओके. तुम्ही नका काळजी करू.” असे म्हणत त्याने फोन ठेवला.
उबरवर त्याचं रेटिंग ४.८ बघून मी त्याच्याशी बोलायला उत्सुक होतो. सुरुवात करायची म्हणून मी विचारलं,
“उबर फुल टाइम बिझनेस का?”
“नाय ओ सर. उबरमध्ये मजा नाय राहिली आता. मी साईड बिझनेस म्हणून करतो.”
“अरे!!! मग मेन बिझनेस कोणता तुमचा?” मी आश्चर्यचकित होत विचारलं.
“हे काय हेच आत्ता फोनवर बोलत होतो ते.”
“मला समजलं नाही नक्की कशाबद्दल बोलत होतात तुम्ही ते. काहीतरी नियोजन चाललं होतं इतकंच लक्षात आलं.” मी त्याला सांगितले.
“आता बघा, हा फोन तळेगावरून होता. तिथं एका पार्टीच्या मुलाचा बड्डे आहे. त्यानिमित्त त्यांना किर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे.”
“मग तुम्ही किर्तन करता की काय?” मी हसत विचारले.
“नाय ओ. मी किर्तन त्यांना अरेंज करून देतो.”
“म्हणजे नक्की काय?” माझा पुढचा प्रश्न तयार होता.
“म्हणजे मी ह्या सगळ्याचं इव्हेंट मॅनेजमेंट करतो असं म्हणा ना.” त्याने माझी मदत केली.
“वाह!! छानच की. मग तुम्ही अरेंज करून देणार म्हणजे काय काय करणार?” असं विचारत मी पुन्हा चर्चेचा चेंडू त्याच्याकडे तटवला. तोही तयारच होता.
“म्हणजे बघा आत्ता फोन केलेल्या पार्टीने मला सांगितलं की त्यांचं बजेट ३० हजार आहे. मग आता मी तेवढयात सगळं बसेल अशी व्यवस्था करून देणार. २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता महाराज आणि त्यांचा लवाजमा तिथं पोहोचणार. त्यांचं काय हाये ते किर्तन बिर्तन उरकणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार.”
“मग तुम्ही हे महाराज कुठून शोधणार?” मी पुढचा प्रश्न विचारला.
“अहो आता झालेत कॉन्टॅक्ट बरेच. मी गेली चार पाच वर्षं हे करतोय. म्हणजे तुमची जशी गरज असंल तसं. तुम्ही म्हणाले आम्हाला सप्ताह करायचा तर आपण ते करतो. तुम्ही म्हणाले सात दिवस सकाळ संध्याकाळ कीर्तन पाहिजे तर आपण ते पण करून देतो.”
“पण ह्याचा खर्च जास्त असेल ना?”
“तुमचं बजेट असंल तसं सगळं करतो आपण. आता कधी कधी एखाद्या गावाचा कार्यक्रम असतो. मग गावकरी म्हणतात, आमचं ५ लाखाचं बजेट आहे. आम्हाला अमुकच महाराज पाहिजे. मग त्यानुसार आम्ही कामाला लागतो.”
“पण हे महाराज लोक कधी कुठं जाणार हे कोण ठरवतं?”
“अहो बुकिंग असतंय सर. आता बघा की एप्रिलच्या कार्यक्रमासाठी गड्यानी मला फेब्रुवारीतच फोन करून बुकिंग केलंय.आता मी महाराजांना सांगितलं की ते त्यांच्या डायरीत नोंद करून ठेवणार. सर एकेक दीडदीड वर्षं आधी लोकं बुकिंग करून ठेवतात.”
“पण मग यातून तुम्हाला कितपत शिल्लक पडते?” मी जरा नाजूक प्रश्न विचारला.
“आता बघा हे सगळे कार्यक्रम, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था, काही ठिकाणी सप्ताह असं सगळं धरून महिन्याकाठी ५०-६० हजार रुपये शिल्लक पडतात मला.”
“अरे वाह!! चांगले पैसे मिळतात.”
“हां बरं चाललंय आपलं. त्यानिमित्ताने आपल्या हातून देवाची सेवा पण होती.. नाय का?”
मी नुसतेच हं म्हटले.
“हे बुवा लोकं किती पैसे घेतात मग?”
“रेट असतात सर यांचे. म्हणजे जो बुवा फेमस त्याचा रेट जास्त. एका प्रवचनाचे लाख लाख रुपये घेणारे पण बुवा आहेत.”
“हे बुवा लोक कुठंही जायला तयार होतात का?” मी अजून एक प्रश्न विचारला.
“अहो सर पैसा मिळतोय म्हटल्यावर कोण नाही जाणार. जायला यायला गाडी, खायप्यायाची चंगळ असल्यावर कुणीपण जाईल की. जुन्नर,आंबेगाव आणि खेड तालुक्यांनी ह्याचं जास्त प्रस्थ आहे. पार येडी झालीत लोकं. दशक्रिया आली की बोलव महाराज, वाढदिवस आला की बोलव महाराज हे असंच चालू आहे. तुम्हाला सांगतो सर ह्याच्यातून काहीकाही महाराज लोकं मोक्कार गबर होऊन बसलेत. आपण त्येपण काम करतो.”
“म्हणजे काय करता?” मी थांबणार नव्हतो.
“अहो ह्यांना सगळं पेमेंट कॅशमधी होतं. त्याला काय टॅक्स नाय, काय नाय. मग पुण्यात फ्लॅट,बिट घ्यायचा झाला तर इन्कमचा प्रूफ नको का? मग आपण ५-६ महाराजांचं ते पण काम बघतो. म्हणजे त्यांच्या नावानी एक एन्टरप्राइज फर्म करायची आणि टॅक्सेशन करायचं. त्यांचपण काम होतं आणि चार पैसे आपल्याला पण मिळतात.”
“पण ह्या लोकांचं उत्पन्न असतं तरी किती असं?”
“सर एक माणूस मृदंग वाजवतो. म्हणजे तो तसं बघायला गेलं तर साईड हिरो म्हणा ना. पण मृदंग लई भारी वाजवतो. त्याच वार्षिक उत्पन्न किती असंल?”
“किती?” मी विचारले.
“अंदाज करा.”
“असेल आठ दहा लाख रुपये.” मी अंदाज लावत म्हटलं.”
“सर तो माणूस एक वर्षाला एकवीस लाख रुपये कमावतो. फक्त मृदंग वाजवून.”
“काय सांगता?” मी आ वासत म्हटलं.
“एकूणएक शब्द खरा आहे सर. देव समोर आहे.” गाडीत लावलेल्या गणपतीच्या फोटोकडे बोट दाखवत तो म्हणाला.
“चांगला धंदा आहे हा.” मी गमतीने त्याला म्हणालो.
“चांगलाच म्हणायला पाहिजे सर. माझं घर चालतंय त्यावर.”
“मग तुम्ही का नाही करत हे सगळं? किंवा मुलांना का नाही शिकवत हेच?”
“सर आळंदीत, पंढरपुरात ह्या सगळ्याचं शिक्षण देणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत. तिथं दिवसरात्र हेच चालू असतं. एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आळंदीला नदीच्या तीरावर चक्कर मारा. ही सगळी भविष्यात महाराज होऊ घातलेली पोरं तिथं असतात. ह्यांचे आईबाप खुशाल ह्यांना शाळा न शिकवता ह्या शिकवणीला पाठवतात. अहो ह्याच्यात कसलं आलंय भविष्य सर? चाललं तर ठीक. पण नाय चाललं तर ह्या पोरांच्या आयुष्यातली उमेदीची वर्षं वायाला जातात हो. बरोबर का नाय?” त्याने माझं मत घेण्याचा प्रयत्न केला.
“हो बरोबरच आहे. शिक्षणाला पर्याय नाही. शाळा न शिकवता आपल्या मुलांना बुवागिरीचे शिक्षण देणारे पालक मूर्खच म्हणावे लागतील.” मीही सहमती दर्शवली.
“मी ठरवलंय सर. माझ्या दोन्ही मुलींना चांगल्या शाळेत टाकलंय. त्यांना आत्ताच सांगून ठेवलंय, काय पाहिजे तेवढं शिका. खर्च मी करतो. त्यांना चांगलं शिकवायचं आणि मगच त्यांची लग्नं लावून द्यायची.”
“हा निर्णय मात्र उत्तम घेतलाय तुम्ही. मला बरं वाटलं ऐकून.चला तुम्हाला शुभेच्छा.”  गाडी एअरपोर्टवर आली होती. मी उतरून माझ्या वाटेला लागलो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.