असा ठरला दादांचा वाढदिवस

मी अधून मधून काहीतरी लिहित असतो. चांगलं वाईट देव जाणे. आज अचानक दादांनी त्यांच्या जन्मतारखेबद्दल लिहिलेला एक कागद हाताशी आला. त्यातला मजकूर इथे मांडावासा वाटला. 
 

माझा वाढदिवस 

 
१ मार्च १९४८ रोजी अस्मादिकांचा जन्म झाला. म्हणजे आपलं म्हणायचं. म्हणायचं एवढ्यासाठी की ती काही खरी जन्मतारीख नव्हे. शाळेत घालताना जन्मतारीख लागते हे कळण्याएव्हढं घरचं कोणी ‘सज्ञान’ नव्हतं. गुरुजींनी अनेकांप्रमाणे आमचीही जन्मतारीख मनानेच लिहिली. 
 
मोठा झाल्यावर जन्मतारीख शोधायचे खूळ डोक्यात शिरलं. एका मित्राबरोबर (साहेबाबरोबर) तालुक्याच्या गावी घोडेगावला गेलो. तो येईना म्हटल्यावर “अरे तुझीसुद्धा जन्मतारीख पाहिजेच” असेही त्याला पटवले. गेलो दोघे. कचेरीच्या  गदारोळात जन्मतारखेचा साहेब शोधला. त्याला दक्षिणा कबुल केली. पण कसलं काय. मी आणि माझा परममित्र जन्माला आल्याचा दाखला काही मिळाला नाही. नवलच ना? माणूस तर जिता जागता पण जन्माचा दाखलाच नाही. वैतागवाडी झाली आणि काय महाराजा!! 
 
आणि थोडा मोठा झाल्यावर म्हणजे नोकरी करताना वहिकरसाहेब एक दिवस म्हणाले, “अण्णा, तुमची जन्मतारीख काय?” (दादांना बरेच लोक अण्णा अशी हाक मारतात)
 
“१/३/१९४८” इति आम्ही वदलो. साहेबांचा पुढचा प्रश्न तयार होता. 
 
“ते झाले हो. नक्की तारीख?”
 
“माहीत नाही.” 
 
“मग असं करा, मुंबईला गेल्यावर अमूक ठिकाणी अमूक माणसाला भेटा. तो सांगेल.”
 
नवलच म्हणायचं! जन्मदाता बाप सांगू शकत नाही तिथे तो महाभाग काय सांगणार? तरीपण एकदा गेलो त्याच्याकडे. पण त्यालाही जमले नाही. पाहताक्षणी तुम्ही कशाला आला आहात हे समजणारा माणूस मला मात्र काही प्रसन्न झाला नाही. 
 
पुढे मुलांचे वाढदिवस सुरु झाले. मला फारसं पटत नव्हते पण बायकोचे म्हणणे, ” तुम्हाला काही कळतच नाही.” हे त्रिकालाबाधित सत्य समोर आले.
 
पुढे कोणीतरी पोट्ट्याने जन्मतारीख ध्यानात ठेवली आणि अभिष्टचिंतन केले. माझ्या मात्र काळजात काही हलले नाही. “कसलं काय!” असं त्याला म्हणालो. 
 
अलीकडे तर रिवाजच झालाय. १-३ आली की मुलांचा अगदी अमेरिकेतून, जर्मनीहूनसुद्धा  फोन येतो. यंदा तर कहरच झाला. १-३ आली. घरी आम्ही दोघे आणि सुनबाई. पण नाही. सुनबाई संध्याकाळी धडपडत गाडीवर गेली, केक आणला. आता बोला. 
 
मधून मधून आता मात्र मीसुद्धा कोणाची जन्मतारीख माहीत पडली तर आवर्जून फोन करतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याइतका दुसरा आनंद नाही. परमानंद!! अशी ही वाढदिवसाची कहाणी. सुफळ संपूर्ण!!
 
जीबी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.