फक्त २० रुपयांत चालवा ही भन्नाट ई-स्कुटर 

काल एथर इलेक्ट्रिक कंपनीच्या एथर ४५० एक्स या स्कुटरची टेस्ट राईड घेतली. आजवर पाहिलेल्या इलेक्ट्रिक स्कुटर बघूनच त्या चालवायची इच्छा मरून जायची. एथरच्या बाबतीत ही सुरुवातच पॉझिटिव्ह होते. गाडीकडे बघूनच गाडी चालवण्याची इच्छा होते. चावी फिरवली की गाडीचा डिस्प्ले सुरू होतो. त्यात गाडीचे सगळे डिटेल्स दिसतात. हा डिस्प्ले टचस्क्रीन आहे.

गाडीला इको, रोड, स्पोर्ट आणि वार्प असे चार मोड आहेत. गाडी १००% चार्ज असेल तर इको मोडवर साधारण ८५-९० किमी अंतर जाऊ शकते. वार्प मोडवर गाडी अगदी ७० च्या स्पीडने जाऊ शकते (मी चालवली). इको मोडवरसुद्धा गाडी ४०-५० च्या स्पीडने चालते. शहरातील रस्त्यांवर फिरताना एवढा स्पीड पुरेसा होतो. गाडीचा टॉर्क २६ न्यूटन मीटर इतका आहे. बुलेटचा टॉर्क २८ न्यूटन मीटर असतो यावरून हा टॉर्क किती जास्त आहे याची कल्पना यावी.

गाडी घेतली तर कंपनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला चार्जर फिट करून देते. (तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिशियन कडून हे फिटिंग करून घेण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. असे केलेत तर कंपनी तो खर्च तुमच्या गाडीच्या किमतीतून वजा करते.) तुम्ही जर एखाद्या बिल्डींगमध्ये १० व्या मजल्यावर रहात असाल तर त्याचीही काळजी कंपनीकडून घेतली जाते.  तुमच्या घराच्या मीटरच्या जवळपास थेट कनेक्शन देऊन चार्जिंगची व्यवस्था केली जाते. गाडी चार्जिंगला लावल्यावर ०% ते ८०% चार्जिंग साठी तीन तास आणि पुढील २०% साठी अडीच तास असे एकूण साडेपाच तास लागतात. गाडी पूर्ण चार्ज करायला विजेची तीन युनिट्स पुरेशी होतात. पुण्यातील विजेच्या दरानुसार याचा खर्च साधारण २० रुपये इतका होतो. रोज ऑफिसला जाण्यासाठी गाडी वापरलीत तर महिन्याचा खर्च ६०० रुपये!

गाडीच्या सिस्टीममध्ये गुगल मॅप इंटिग्रेटेड आहे. त्यामुळे हातात फोन धरून त्यावर मॅप लावणे ही झंझट नाही. गाडी सर्व्हिसिंगला दिली आणि ती पुन्हा घेऊन येणे तुम्हाला जमत नाही. अशावेळी गाडी तुम्हाला परत करण्यासाठी शोरूमच्या एखाद्या माणसाला घरी यायचे असेल, तर तुम्ही स्वतःच्या फोनवरून गाडीला आपले लोकेशन सेंड करू शकता. ते डिस्प्लेवर आले आणि स्वीकारले की थेट मॅप सुरु होतो आणि तो माणूस तुम्ही दिलेल्या लोकेशनवर येऊ शकतो.

गाडीला असणाऱ्या इंडिकेटर्सचा आवाज चालू बंद करण्याचा पर्याय दिला आहे.  सगळ्यात आवडलेलं फिचर म्हणजे गाडी रिव्हर्स जाते. पार्किंग करताना वगैरे या फिचरचा चांगला उपयोग होऊ शकेल. डिस्प्लेवर एक बटन आहे ते उजवीकडे स्वाईप केलं की हा रिव्हर्स मोड ऍक्टिव्ह होतो. गाडीला २० लिटर क्षमतेची डिक्की आहे. यात अगदी तुमचं स्पोर्ट्स हेल्मेटसुद्धा आरामात बसू शकते. डिक्कीत एलईडी लाईटसुद्धा दिलेला आहे.

गाडी तुमच्या मोबाईलला कनेक्टड असते. त्यामुळे गाडीचे रिअल टाईम लोकेशन तुम्हाला कळू शकते. समजा घरच्यांना न सांगता कुठे जायचे असेल तर गाडीमध्ये चक्क ‘इनकॉग्निटो’ मोडसुद्धा आहे. सगळ्यात शेवटचे आणि महत्वाचे फिचर म्हणजे शट डाऊन! या गाडीला चक्क शट डाऊनच बटन आहे. तुम्ही शहरातून बाहेर जात असाल तर हे फिचर वापरून गाडी बंद करून ठेवू शकता. परतल्यावर गाडी सुरू केली की बॅटरी आधी होती तेवढीच किंवा पाच टक्के उतरलेली असते.

सध्या पुणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या ४-५ चार्जिंग पॉईंट्स तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात एक चार्जिंग पॉईंट आहे. ही संख्या वाढत जाईल यात शंका नाही.

आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किंमत! गाडीची ऑन रोड किंमत साधारण १ लाख ७२ हजार एवढी आहे. यामध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन, चार्जर फिटिंग हे सगळं धरलेलं आहे. गाडीचे रजिस्ट्रेशनचे दर वर्षाला नुतनीकरण करावे लागणार आहे. त्याचा खर्च साधारण ५०० रुपये प्रतिवर्षं इतका असणार आहे.

आजवर पाहिलेल्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या तुलनेत एथर खूपच उजवी ठरते. ज्यांना खरोखर वेगवान ई स्कुटरची हौस आहे त्यांनी ही डोळे झाकून ही स्कुटर घ्यायला अजिबात हरकत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.