आंब्या

गेल्या वर्षी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने एका प्रकल्पांतर्गत शॉर्ट फिल्म महोत्सव भरवला होता. या महोत्सवासाठी मित्र संजय ढेरंगे याच्या ‘आंब्या’ ह्या शॉर्ट फिल्मची निवड झाली. निवडीचा आनंद साजरा करतोय तोच या महोत्सवात ‘आंब्या’ ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची बातमी आली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, २५ हजार आणि भरभरून कौतुक एवढं सगळं आंब्याच्या वाटेला आलं.
फिल्म पाहिल्यावर एका मित्राचे नाही तर एका दिग्दर्शकाचे कौतुक करावेसे वाटले. बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात लहान मुले पडण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. कित्येकदा बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाची अमुक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. आपणही त्या वाचतो आणि सोडून देतो. पण अशाच एखाद्या खड्ड्यात पडलेल्या मुलाच्या आईवडीलांची काय अवस्था होत असेल हा विचार क्वचितच आपल्या मनाला शिवतो. सरकारी पातळीवरदेखील याकरता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग एखाद्या फिल्मच्या माध्यमातूनच हा विषय का मांडू नये अशा विचाराने संजयने ही फिल्म बनवली आहे.
ऊसाच्या शेतात काम करताना चार सहा ऊसच एकत्र करून त्याची आपल्या बाळासाठी झोळी बनवणे, मुलाला यात्रेत खर्च करण्यासाठी १० रुपये दिले म्हणजे आपण खूप पैसे दिल्यासारखे वाटणे, मुलाच्या दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला असणे, यात्रेत गेल्यावर त्याने भेळीच्या गाडीवर ठेवलेल्या शेव, कुरमुऱ्यांच्या पिशवीवर फक्त हात फिरवणे असो, गोडीशेव खरेदी न करता फक्त ती केवढ्याला आहे असे विचारणे असो, या सगळ्या फ्रेम्समधून ऊसकामगारांची सध्या अवस्था किती बिकट आहे हेही संजयने दाखवले आहे.
एक दिग्दर्शक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा किती बारकाईने विचार केला असेल हे जाणवत राहते. फिल्मच्या शेवटच्या फ्रेममध्ये वापरलेले पार्श्वसंगीत अंगावर काटा आणते. कमी वेळात जास्तीत जास्त परीणामकारक संदेश देणे हा मुळात कुठल्याही शॉर्ट फिल्मचा गाभा असतो. संजयच्या ह्या फिल्मने ते योग्यप्रकारे साधले आहे. नुकतीच ही शॉर्ट फिल्म युट्युबवर उपलब्ध झाली आहे. तुमच्या बिझी शेड्युलमधून ८ मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा. नक्की आवडेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.