“आपण खो-खो आरामात जिंकतोय. फायनलला बारकी पोरं आहेत. पण कबड्डी फायनल काहीही करून जिंकलीच पाहिजे.”
९ ब विरुद्धची खो खो ची सेमी फायनल जिकल्यानंतर मी टीमबरोबर बोलत होतो. कबड्डी फायनल ९ ड बरोबर होती. त्यांच्याकडे जंप्या, आमले सारखे खेळाडू होते. त्यांचा खेळ आडदांड असे तर आम्ही तंत्रावर विश्वास असलेले खेळाडू होतो. शाळेच्या कबड्डी संघातले ४-५ जण आमच्याच वर्गातले होते. तरी आम्हाला ९ ड ची भीती होती. नेहमीच्या रितीरिवाजाप्रमाणे ८ अ, ९ अ आणि १० अ एका बाजूला तर उरलेली आख्खी शाळा एका बाजूला होती. अ तुकडीचा इतरांना इतका का राग असे हे कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही. माईकवर सामन्याची घोषणा झाली तसे आम्ही सगळे मैदानाकडे जाऊन वॉर्मअप करू लागलो.
मी डावा तर गणेश चिमटे उजवा सातवा लावत असे. एखंडे,कुलकर्णी पाचव्याला असत. माझ्या हाताला कर्पे सहावा असे. आमची टीम चांगलीच होती पण का कोण जाणे त्या दिवशी सगळेच जरा टेंशनमध्ये होते. ९ ड ने नाणेफेक जिंकली आणि पहिल्या एंट्रीलाच जंप्या आला. तो खरं तर रायडर नव्हता. पहिली एंट्री सेफ टाकून तो परत गेला. आमच्याकडून पहिली एंट्री एखंडेने मारली. तोही सेफ परत आला. मग ९ ड चे आक्रमण सुरु झाले. काही कळायच्या आत त्यांनी आमच्यावर लोण चढवला. गुणसंख्या ०-७. परत सगळे खेळायला आले.
“मला आता सेफ एंट्री नकोय. पॉईंट पाहिजे.” आमचा कर्णधार गण्या एव्हाना तापला होता.
आमच्या वर्गातल्या मुली हिप हिप हुर्रे करत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होत्या. ह्यात भक्ती कायम पुढे असे. मी तिला खुणेनेच चिअरिंग करू नका असं सांगितल्याच मला आठवतंय. उरलेले सगळे प्रेक्षक ९ ड ला प्रोत्साहन देत होते. अशात एखंडे एंट्रीला गेला. एखंडे म्हणजे आमचा भरवशाचा रायडर. शांत डोक्याने खेळणारा. आपल्या मजबूत शरीरयष्टीचा यथायोग्य वापर करणारा. त्याने त्या एंट्रीला दोन पॉईंट काढले. गुणसंख्या २-७.
एव्हाना मध्यांतर जवळ आले होते. त्यामुळे ९ ड ने सावध पवित्रा घेऊन सेफ एंट्री मारली. परत एखंडे एंट्रीला गेला. तो जाण्याअगोदर पंच ढमाले सरांनी शिट्टी वाजवून लास्ट एंट्री असा इशारा केला. मध्यंतराला आपली पिछाडी थोडी तरी भरून काढावी असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे एखंडेने एक पॉईंट काढला आणि आमची गुणसंख्या ३ वर नेली.
सामन्याच्या मध्यांतरात आमची चर्चा चालू होती. काय केलं पाहिजे? कोणी पाणी पीत होतं, कोणी खरचटलेल्या गुडघ्याची काळजी घेत होतं. इतक्यात माझं लक्ष जंप्याकडे गेलं. त्याने शर्ट बदलला होता. मूळचा टी शर्ट काढून त्याने डेनिमचा शर्ट घातला होता. त्याला तो शोभतदेखील होता. पण जंप्याची वेळ चुकली होती. मी पोरांना लगेच कोंडाळं करायला सांगितलं.
“जंप्याचं मॅचमध्ये लक्ष नाहीये. ही मॅच आपली आहे. त्याच्या एंट्रीला फक्त त्याला उचला की आपण ही मॅच घेतोय.”
मी भक्तीला माझ्याजवळ बोलावलं आणि तिच्या कानात सांगितलं,
“तिला पुढे बसव.”
तिच्या पुढच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मी परत टीमकडे गेलो. आमच्या वर्गातली एक मुलगी जंप्याला आवडत असे. तिला इंप्रेस करायला म्हणा किंवा अजून काही पण त्याने तो डेनिमचा शर्ट घातला आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. ठरल्याप्रमाणे भक्तीने “तिला” आपल्याबरोबर अगदी मैदानाला लागूनच बसवले. सामना सुरु झाला. जंप्या एंट्रीला आला. त्याने माझ्या बाजूने खोलवर चढाई करायला सुरुवात केली. मी मागे जात राहिलो. जंप्या खेळाडू म्हणून चांगलाच होता. कव्हर नाचवणे हा प्रकार त्याला चांगला जमत असे. पण आज तो एकाच बाजूने खोल चढाई करायचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा तो माझ्या बाजूला आला आणि काही कळायच्या आत एखंडे, कुलकर्णी ने त्याला चेन लावली. गण्याने मागून अजून एक तडाखा दिला आणि जंप्या मैदानाबाहेर फेकला गेला. प्रेक्षकांमध्ये एकच गलका झाला. पुन्हा एकदा हिप हिप हुर्रे चा आवाज दुमदुमला. जंप्याच्या पकडीने मनोबल उंचावलेले आम्ही आता मॅच जाऊ द्यायची नाही अशाच निश्चयाने खेळू लागलो. तर आपला म्होरक्याच गारद झाला म्हणून ९ ड चा संघ दडपणाखाली आला.
पुन्हा एकदा आमचा हुकमी एक्का एखंडे एंट्रीला गेला. आता मात्र त्याने दाणादाण उडवायची असंच ठरवलं असावं. २ पॉईंट्स घेऊन एखंडे परतला. सामन्याचा नूर अचानक पालटला होता. एकीकडे सूर्य मावळतीला जात होता आणि एकीकडे एकेक करत आम्ही ९ ड चे खेळाडू बाद करत होतो. जंप्या, आमले सारखे खेळाडू आमच्या या तडाख्यापुढे निष्प्रभ ठरत होते. कर्णधार आणि उपकर्णधारच धारातीर्थी पडल्याने इतरांचेही उरलेसुरले बळ निघून गेले होते. सामन्याच्या उत्तरार्धामध्ये ९ ड ला एकही गुण घेता आला नव्हता. एक लोण, दोन लोण करत आम्ही शेवटचा घाव घालत त्यांच्यावर तिसराही लोण चढवला आणि सामना संपल्याची शिट्टी वाजली. गुणसंख्या होती २१-७. मैदानात एकच जल्लोष झाला. कबड्डीची फायनल आम्ही जिंकली होती.
प्रतिस्पर्ध्याचा कच्चा दूवा वेळीच ओळखून त्याबरहुकूम खेळ केल्याचा आम्हाला फायदा झाला होता. माझी क्लृप्ती काम करून गेली होती. सामन्यानंतर मी जंप्याला जवळ जाऊन तू शर्ट बदलालास तेव्हाच तू सामना गमावला होतास असं सांगितल्याचं आठवतं. अजूनही शालेय जीवनातील एक ठळक आठवण म्हणून हा सामना माझ्या मनात घर करून आहे.