बुटातून बिअर पिण्याचे असेही सेलिब्रेशन

ऑस्ट्रेलियातील लोक एखाद्या गोष्टीचा आनंद साजरा करताना आपल्या बुटातून शॅम्पेन/बिअर पितात. त्या लोकांनी याला ‘शुई’ असे नाव दिले आहे.

क्रीडाजगतात बऱ्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या विजयाचा आनंद शुई करून साजरा केला आहे. यामध्ये मोटो जीपी ड्रायव्हर जॅक मिलर, फॉर्म्युला वन ड्रायव्हर डॅनिएल रिकार्डो यांचा समावेश आहे.

शुई करताना बिअर किंवा शॅम्पेन त्या माणसाच्या किंवा त्याच्या मित्राच्या बुटात ओतली जाते. त्यानंतर तो बूट वर धरून ती बिअर तोंडात रिचवली जाते.

बऱ्याच जणांना माहीत असलेला व्हॅलेंटीनो रॉसी यानेही एकदा शर्यत जिंकल्यावर २०१६ मध्ये शुई केली होती.

फॉर्म्युला वन मध्ये शुईची प्रथा डॅनिएल रिकार्डो या ऑस्ट्रेलियन ड्रायव्हरने २०१६ च्या जर्मन जीपीमध्ये आणली. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याने पोडियम फिनिश केला तेव्हा त्याने शुई केली होती.

यावर्षीच्या फॉर्म्युला वन हंगामात त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. मात्र आयफेल जीपीमध्ये त्याने पोडियम फिनिश केला तेव्हा सगळ्याना तो आता शुई करेल असे वाटले होते. डॅनिएल मात्र हे विसरून गेला. रेसनंतर जेव्हा त्याला याबद्दल विचारले तेव्हा त्याने आपण चक्क विसरून गेलो असे सांगितले होते.

आज पार पडलेल्या इमोला जीपीमध्ये त्याने तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे आता तो शुई करणार का? असा प्रश्न फॉर्म्युला वन च्या सगळ्याच चाहत्यांना पडला. डॅनिएलनेही चाहत्यांना नाराज केले नाही. उलट त्याने शर्यत जिंकलेल्या लुईस हॅमिल्टनलासुद्धा आपल्या साथीला घेतले. हॅमिल्टननेसुद्धा त्याची ऑफर नाकारली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.