नोव्हाक जोकोविच आणि व्हिसावाद

जोकोविच भारी प्लेयर आहे –  हो

 

जोकोविच वादग्रस्त प्लेयर आहे – हो

 

जोकोविचची व्हॅक्सिनबाबतची भूमिका योग्य आहे – हो

 

जोकोविच आपलं व्हॅक्सिनेशन स्टेट्स उघड करून हा सगळा तमाशा टाळू शकला असता – हो

 

‘मी व्हॅक्सिन घ्यायचं की नाही हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे.’ असं जोकोविच सुरुवातीपासून सांगत होता. त्याने व्हॅक्सिन घेतलंय की नाही हेही त्याने अजून उघड केलेलं नाही. प्रायव्हसीचा विचार केला तर जोकोविचचा मुद्दा रास्त आहे. कोणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबाबत कुणावरही जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. याच जोकोविचने सगळ्या जगात लॉकडाऊन असताना मागच्या वर्षी एक स्पर्धा घेतली होती. तिथे मास्क लावणे बंधनकारक नव्हते. अखेर काही खेळाडूच पॉझिटिव्ह आल्यावर हा सगळा गाशा गुंडाळावा लागला.

 

यातून जोकोविचने बोध घेणं अपेक्षित होतं. पण तसं झालं का? – नाही

 

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला व्हॅक्सिनच्या अटींतून सूट द्यावी अशी विनंती जोकोविचने केली होती. ती मान्यसुद्धा झाली होती. यासाठी कारण म्हणून आपल्या नुकताच करोना होऊन गेला आहे असे कारण दिले होते. त्याबाबत जी टेस्ट केली त्याचा रिझल्ट १६ डिसेंबरला आला. त्याआधी आणि त्यानंतर जोकोविच ४-५ कार्यक्रमांमध्ये विनामास्क उपस्थित होता. यातल्या एका कार्यक्रमात लहान मुलेदेखील सहभागी होती. जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचे हे वागणे बेजबाबदार नाही का?

 

ऑस्ट्रेलिया सरकारने देशात प्रवेश करताक्षणी त्याचा व्हिसा रद्द केला. त्यावर जोकोविचए अपील केले. त्या केसचा निकाल आज लागला आणि कोर्टाने जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्याचा मार्ग खुला केला. ऑस्ट्रेलियन सरकार अजूनही त्याचा व्हिसा रद्द करू शकते. पण तसे होईल का? झाले तर उत्तम. नाही झाले तर मग आजतागायत ऑस्ट्रेलियन हेल्थ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर यांनी लाईव्ह टीव्हीवर नियम सगळ्यांना सारखेच आहेत अशी जी वक्तव्ये केली त्याला काय अर्थ उरतो? अखेरीस एक आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याच्यामुळे त्यांच्या देशातील स्पर्धेचा रेव्हेन्यूच धोक्यात येऊ शकेल त्यासाठी सरकारने पडती भूमिका घेतली असा अर्थ यातून निघेल. आज झालेली ही केस पुढे बेंचमार्क म्हणून वापरली जाऊ शकते. परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे बूट, त्याला लागलेली माती याचीसुद्धा तपासणी करणारे ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन याचा विचार करेल का?

 

बाकी जोकोविचने या सगळ्यातून काय साध्य केलं हे त्याचं त्याला माहित झालं तरी खूप आहे. बाकी जग तरी याकडे वेडेपणा म्हणूनच पाहत असेल. तुम्ही जागतिक स्पर्धा खेळताय. त्या स्पर्धेत सहभागी होण्याचे काही नियम आहेत. ते नियम पाळणे तुम्हाला बंधनकारक आहे. एवढं हे सगळं सोपं आहे. मग अशी आडमुठी भूमिका घेऊन जोकरने काय साधलं? त्यापेक्षा तुमची भूमिका सर्वसमावेशक नाही असे म्हणत निषेध म्हणून तो स्पर्धेपासून बाहेर राहू शकला असता. स्पर्धेत खेळायचंसुद्धा, नियमही नाही पाळायचे हे दोन्ही कसं चालेल?

 

सध्या ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन असं सांगतंय की ते अजूनही जोकरचा व्हिसा रद्द करू शकतात. तो होईल किंवा नाही हे लवकरच कळेल. पण या सगळ्या वादातून जोकोविचची आधीच वादग्रस्त असलेली इमेज आणखी डागाळली असेच वाटते. जोकरला आणखी अनेक ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी शुभेच्छा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.