ऑस्ट्रेलियन ओपनचे कोर्ट्स जोकोविचला जिंकण्यासाठी मदत करतायत? घ्या जाणून कसं ते

उद्या (२१ फेब्रुवारी) जोकोविच आणि मेदवेदेव यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना रंगणार आहे. जोकरसाठी ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळण्याची ही नववी वेळ असणार आहे. यातल्या आधीच्या आठही वेळेस त्याने विजेतेपद पटकावले आहे. त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनचा रेकॉर्ड ७८-५ एवढा मजबूत आहे. मेदवेदेवसाठी मात्र हा ऑस्ट्रेलियन ओपनचा पहिलाच अंतिम सामना असणार आहे. याआधी २०१९ मध्ये त्याने यूएस ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी राफाने त्याला पराभूत केले होते.

यावेळी मात्र मेदवेदव ‘फॉर्म ऑफ हीज लाईफ’ मध्ये आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या नोव्हेंबरपासून त्याने दुखापतीमुळे काहीसा बाजूला गेलेला फेडरर सोडल्यास एटीपी टॉप-१० मधल्या सगळ्या खेळाडूंना एकदातरी पराभूत केले आहे.

हे दोघे एकमेकांच्या विरोधात एकूण ७ सामने खेळले आहेत. यापैकी ४ जोकर (जोकोविच) तर ३ मेदवेदेवने जिंकले आहेत.

यावर्षीसुद्धा जोकरचं पारडं जड आहे. त्याला कारण म्हणजे यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनचे वेगवान कोर्ट. या वेगवान कोर्टचा जोकरला भरपूर फायदा झालेला दिसतोय.

वेगवान कोर्ट म्हणजे नक्की काय?
या कोर्टवर समोरच्या खेळाडूने मारलेला बॉल जास्त वेगात स्कीड होऊन येतो. त्यामुळे बॉल परतवणाऱ्या खेळाडूला बॉल बघून त्यानुसार फटका निवडायला आणि तो परतवायला मिळणारा वेळ कमी असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर रिऍक्शन टाईम कमी असतो. याचा फायदा कोणाला होतो? ज्यांची सर्व्हिस वेगवान आहे अशा खेळाडूंना या गोष्टीचा भरपूर फायदा होतो.

मग याचा जोकरला फायदा होतोय का?
तसं पहायला गेल्यास जोकर काही पॉवर सर्व्ह करणारा खेळाडू नाही. तो कोर्टवर जिथे असेल तिथून चेंडू परतवून लावण्यात माहीर असलेला खेळाडू आहे. त्यामुळे सर्व्हिस तशी त्याची फारशी जमेची बाजू नाही. आकडेवारी द्यायची तर, ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याआधी जोकरने आपल्या कारकिर्दीत एकूण ५९२३ एसेस म्हणजे बिनतोड सर्व्हिस केल्या होत्या. म्हणजे साधारण एका सेटला २.०८ एसेस आणि एका सामन्यात ५.४ एसेस.

यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मात्र जोकरची सर्व्हिस अचानक चांगली होऊ लागली आहे. या स्पर्धेतल्या एकूण सहा सामन्यांत त्याने एकूण १०० एसेस मारल्या आहेत. म्हणजे एका सेटला ४.३४ एसेस आणि एका सामन्यात तब्बल १६.६६ एसेस!! जोकरनंतर साशाने ८६ आणि राओनीचने ८२ एसेस मारल्या आहेत. मेदवेदेवने अंतिम फेरीत जोकरचा हा रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे जोकर आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेत सर्वात जास्त एसेस करणारा खेळाडू ठरू शकतो.

मेदेवेदवला सुद्धा याच वेगवान कोर्टचा फायदा मिळू शकतो. पण आजवर जो जोकरचा तुलनेने कच्चा दुवा होता, तो या वेगवान कोर्टमूळे जवळपास नसल्यासारखा आहे. त्यामुळे हा सामना जोकरसाठी फारसा अवघड नसेल असे वाटते.

ऑस्ट्रेलियन ओपनचे कॉर्ट्स याच वर्षी वेगवान आहेत का?
दरवर्षी ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याआधी इथले सगळे १६ कॉर्ट्स रिसरफेस केले जातात. याचे हे सगळे कोर्ट धुवून, पॉलिश केले जातात. त्यांनंतर कोर्टवर ऍक्रेलीक पेंटचा कोट मारला जातो. या पेंटमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या मातीचे छोटेछोटे गोळे असतात. पेंटमधील या गोळ्यांचे प्रमाण किती यावरून कोर्टचा वेग ठरतो. मातीचे गोळे जास्त असतील तर कोर्टचा स्पीड कमी असतो.

आता हा कोर्टचा स्पीड किती असावा? याला काही स्टॅंडर्ड आहे का? तर हो, आहे. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन यासाठी कोर्ट पेस इंडेक्स म्हणजेच CPI ही संज्ञा वापरते. CPI रेटिंग २९ किंवा त्याहून कमी असल्यास ते कोर्ट स्लो आहे, असे म्हटले जाते. तर हिकज रेटिंग ४५ हून जास्त असेल, तर ते कोर्ट फास्ट आहे असे म्हटले जाते. गेल्या पाच वर्षात ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टचा CPI ४१ एवढा होता. म्हणजे हे कोर्ट साधारणपणे ‘मिडीयम फास्ट’ म्हणू शकतो. यावर्षीच्या कोर्टचा CPI मात्र ५० आहे. यावरून हे कोर्ट किती वेगवान आहेत याचा अंदाज येऊ शकेल.

याला अजून एक कारण म्हणजे यावर्षी कोव्हिडमुळे ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधीच्या स्पर्धा सुद्धा मेलबर्न कोर्टवरच पार पडल्या आहेत. त्यामुळे या कोर्टवर नेहमीपेक्षा तुलनेने जास्त सामने झाले आहेत. जशीजशी सामान्यांची संख्या वाढत जाईल तसा कोर्टचा वेग वाढत जातो. त्यामुळे हे कोर्ट्स नेहमीपेक्षा जास्त वेगवान आहेत.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या गेल्या चारपैकी तीन अंतिम सामने पाचव्या सेटपर्यंत रंगले आहेत. या तीनपैकी दोन वेळा जोकर जिंकलेला आहे. शिवाय या वर्षी त्याला वेगवान कोर्टची साथही मिळेल. त्यामुळे उद्याच्या अंतिम फेरीत तोच जिंकण्यासाठी फेवरेट असेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.