स्टॉक मार्केट जुगार आहे म्हणणारे जुगाराच्या कंपनीत पैसा लावणार का?

काही दिवसांपूर्वी नजारा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ त्याच्या बंपर लिस्टिंग मुळे चर्चेचा विषय ठरला. आयपीओला ११०१ रुपये किंमत असलेल्या या कंपनीचा शेअर लिस्टिंगच्याच दिवशी तब्बल २०२४ पर्यंत जाऊन आला. नजारा ही ऑनलाईन गेमिंग बिझनेसमध्ये असलेली आणि शेअर मार्केटला लिस्टिंग होणारी दुसरी कंपनी आहे. याआधी या सेक्टरमधील डेल्टा कॉर्प लिमिटेड ही एकमेव कंपनी शेअर मार्केटमध्ये होती. भारतात ऑनलाईन गेमिंगचा जवळपास ६०% बिझनेस हा डेल्टा कॉर्प या कंपनीकडे असल्याने या कंपनीचे निर्विवाद वर्चस्व आहे.

थोडंसं या कंपनीबद्दल

या कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत हा गेमिंग असून एकूण उत्पन्नाच्या ७७% महसूल ऑफलाईन गेमिंग मधून तर १७% ऑनलाईन स्किल गेमिंग आणि ६% हॉस्पिटॅलिटी मधून येतो.

या कंपनीचे गोव्यात ४ आणि सिक्कीम, दमण आणि काठमांडू, नेपाळमध्ये प्रत्येकी १ कॅसिनो आहेत. गॉसियन नेटवर्क (अड्डा५२रमी ची पॅरेंट कंपनी) ही ऑनलाईन गेमिंग ची कंपनी सुद्धा २०१७ साली डेल्टाने विकत घेतली. कंपनीचा अड्डा५२ हा ऑनलाईन पोकर गेम प्रसिद्ध आहे. कंपनीने हाला प्ले या फॅंटेसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म मध्ये १५.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कंपनीमध्ये नजाराचीसुद्धा गुंतवणूक आहे. तसेच डेल्टाचे गोव्यामध्ये (डेल्टइन) २ आणि दमणमध्ये एक पंचतारांकित हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर कंपनीकडे रमाडा कारवेला बिच रिसॉर्टचीसुद्धा भागीदारी आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये कंपनीचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बंद होते. मात्र याच काळात घरी असणाऱ्या लोकांचा मोबाईल वापर वाढत गेला. या काळात एक विरंगुळा म्हणून म्हणा किंवा आणखी काही म्हणा लोक ऑनलाईन रमी आणि पोकर खेळू लागले. नेमका याचाच फायदा कंपनीला झाला आणि ते आपले नुकसान आटोक्यात ठेवू शकले. कंपनीने २०१७ साली अड्डा५२ कंपनीला २०० कोटींहून अधिक रक्कम मोजत विकत घेतले. याच कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य ४५० कोटींपेक्षा अधिक आहे. केवळ या एका कंपनीनेच डेल्टाला २०२० मध्ये तब्बल १६२.१४ कोटींचा महसूल मिळवला.

मागील ३ वर्षाचा कंपनीचा बिझनेस खालील प्रमाणे – 
मार्च २०२०
एकूण उत्पन्न – ८०७ कोटी
एकूण नफा – १८५.६३ कोटी

मार्च २०१९
एकूण उत्पन्न – ८३३ कोटी
एकूण नफा – १९६ कोटी

मार्च २०१८
एकूण उत्पन्न – ६३७ कोटी
एकूण नफा – १५५ कोटी

२०२०-२०२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन क्वार्टर्समध्ये अनुक्रमे २८.२ कोटी आणि ५५ कोटींचा तोटा जाहीर केल्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये कंपनीनें तब्बल १.३ कोटींचा नफा कमावला आहे. चौथ्या क्वार्टरचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे. मात्र कॅसिनो पुन्हा सुरु झाल्याने या क्वार्टरच्या निकालावर त्याचीच छाप असेल असे वाटते.

मागील ५ वर्षात कंपनीच्या महसूलात वर्षाला सरासरी २१.२२% ने वाढ होत आहे तर इंडस्ट्रीचा १३.६२% ने वाढतो आहे. तसेच मागील ५ वर्षात कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो १०.८१% तर इंडस्ट्रीचा ४९.८३% आहे.
कंपनीच्या एकूण शेअरच्या ३३.२८% शेअर्स कंपनीच्या प्रमोटर्सकडे आहेत. मागील एका वर्षात प्रमोटर्सनेआपल्याकडे असलेल्या शेअर्समध्ये वाढ केली आहे. तसेच प्रमोटर्सने प्लेज केलेल्या शेअर्सची टक्केवारी देखील कमी होत आहे. जेव्हा प्रमोटर्स कंपनीमधील आपला स्टेक वाढवत असतात आणि प्लेज कमी करत असतात तेव्हा ती कंपनीच्या दृष्टीने चांगली गोष्ट समजली जाते. यातून प्रमोटर्सला आपल्या कंपनीवर, तिच्या व्यवसायावर, त्यातून होणाऱ्या नफावृद्धीबाबत विश्वास असल्याचा संदेश मार्केटमध्ये जात असतो. FPI कडेसुद्धा कंपनीचे ८.८% शेअर्स आहेत.

एखाद्या कंपनीत कोण पैसा लावतोय यावरूनही बरेच रिटेल इन्व्हेस्टर्स आपला गुंतवणूकीचा निर्णय घेत असतात. नजारामध्ये राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे हे माहित झाल्याने अनेक रिटेल इन्व्हेस्टर्सने त्या कंपनीच्या आयपीओला अप्लाय केले होते. याच झुनझुनवाला यांची डेल्टामध्ये जवळपास ४.३१% मालकी आहे. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची ३.१९% मालकी आहे. डी मार्टचे राधाकिशन दमानी यांनी मार्च २०२० मध्ये कंपनीचे १५.५ लाख शेअर्स खरेदी केले होते. त्यांनी ते विकले किंवा नाही याची अद्ययावत माहिती मिळू शकली नाही. ऑनलाईन गेमिंग हे फ्युचर आहे हे ‘आरजेने’ खूप आधी ओळखलं होतं. त्याने नजाराचा आयपीओ येण्याआधीपासून त्या कंपनीत पैसा लावला. डेल्टामध्येही पैसा लावला. यावरून काय ते समजा.

आणखी काही गोष्टींकडे कंपनीच्या व्यवस्थापनाने लक्ष दिल्याचे लक्षात येते.

१. गेल्या काही वर्षांत कंपनी जवळपास डेट फ्री झाली आहे.

२. कंपनीने नेपाळमध्ये सुरु केलेला कॅसिनो नुकताच सुरु झाला आहे. नेपाळमधील या डिव्हिजनकडून कंपनीला वर्षाला ६०-७० कोटींचा महसूल मिळू शकेल असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाला आहे. असे असले तरी लगेच थायलंड, फिलिपिन्स या देशांमध्ये व्यवसाय विस्ताराच्या मागे कंपनी जाणार नाही. सध्या कंपनीचा फोकस फक्त आणि फक्त इंडियन मार्केटवरच आहे. भारतात कॅसिनो इंडस्ट्री वर्षाला २०-२५% वेगाने वाढणार आहे याचा मार्केट लीडर म्हणून कंपनीला फायदा होऊ शकतो.

३. कंपनीने ‘जलेश क्रुझेस’ या लक्झरी क्रूझ कंपनीत २५% टक्के स्टेक विकत घेतला होता. यासाठी कंपनीने तब्बल ७०-७२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र भारतात क्रूझ बिझनेसला असलेल्या मर्यादांमुळे तसेच लॉकडाऊनमुळे जलेश व्यवस्थापनाने ऑक्टोबर २०२० मध्ये आपण आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचे जाहीर करत कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्याचा ठराव केला होता.  त्यामुळे ही गुंतवणूक डेल्टासाठी तशी तोट्याचीच ठरली. असे होऊनही कंपनीकडे जवळपास ४७० कोटींचा कॅश बॅलन्स आहे.

४. गोवा सरकारची आगामी कॅसिनो लँड पॉलिसी जर प्रत्यक्षात आली तर मार्केट लीडर म्हणून डेल्टाला त्याचा जोरदार फायदा होऊ शकतो. गोव्यामध्ये नव्या एअरपोर्टचे काम सुरु झाले आहे. डेल्टाचे नवीन रिसॉर्ट या एअरपोर्टपासून २०-२५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचा मोठा फायदा कंपनीला होणार आहे.

वर नमूद केलेल्या गोष्टी कंपनी व्यवस्थापनाने वेळोवेळी नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी चांगली कामगिरी करू शकते.

गुंतवणूक आपली आपण आपापल्या आर्थिक सल्लागाराशी बोलून करायची आहे हे सांगायला नकोच.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.